भानुदास पऱ्हाडपुणे जिल्ह्यात येत्या ८ सप्टेंबरपासून नैऋत्य मान्सून पाऊस पडण्याची शक्यता ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे. सद्य:स्थितीत राज्यातील १६ जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा कमी असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असून, खरीप हंगाम संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर बदलत्या हवामानासंदर्भात 'लोकमत'ने डॉ. रामचंद्र साबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चालू आठवड्यात बुधवारपर्यंत (दि. ६) महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००६ हेप्टा पास्कल, तर दक्षिण भागावर १००८ हेप्टा पास्कल हवेचा दाब राहणार आहे.
त्यामुळे या कालावधीत राज्यात अल्पशा स्वरूपात पावसाची शक्यता आहे. मात्र, ८ सप्टेंबर रोजी हवेच्या दाबात बदल होत आहे. उत्तर महाराष्ट्रावर १००४ हेप्टा पास्कल, तर दक्षिण महाराष्ट्रावर १००६ हेप्टा पास्कल इतका कमी हवेचा दाब होणार आहे. त्याचवेळी महाराष्ट्राच्या ईशान्यकडील भागावर १००२ हेप्टा पास्कल आणि बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागावर एक हजार हेप्टा पास्कल इतका हवेचा दाब राहणार असून, त्यावेळी ईशान्य मान्सून पाऊस बरसण्यास अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे.
एल निनोचा प्रभाव- आगामी कालावधीत प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमानात वाढ होत असून, ते ३१.१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार आहे. . मात्र, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३०.५ अंश सेल्सिअस व हिंदी महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश इतके कमी राहिल्यामुळे एल निनोचा प्रभाव सुरु राहील.- पुणे जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. १५ ते १७ किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार आहेत. पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहणार आहे.
कृषी सल्ला- करडई पेरणीसाठी जमिनीची पूर्व मशागत करावी.- रब्बी ज्वारी पेरणीसाठी जमिनीची पूर्व मशागत करावी.- ज्वारी व करडईसाठी बंदिस्त वाफे तयार करावेत. त्यामुळे पाऊस होताच पाणी जमिनीत मुरेल व जमिनीत ओलाव्याचे प्रमाण वाढेल.- संरक्षित पाण्याची सोय असल्यास पावसात खंड पडल्यास पाणी द्यावे.- रब्बी हंगामातील पिकांना ठिबक व तुषार सिंचन वापरावे.
१५ सप्टेंबरनंतर परतीचा पाऊसविदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान पाऊस वाढण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थानमधून परतीचा पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. पिके कोमजले असून येत्या आठवड्यात सर्वदूर पावसाची प्रतीक्षा आहे.