आजपासून पाच दिवस म्हणजे मंगळवार दि. १० जानेवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहून तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ गडगडाटीसह अवकाळी पावसाची शक्यता आएमडीचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. विशेषतः खान्देश व लगतच्या नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी ९ तारखेला पावसाची ही शक्यता अधिक जाणवते.
तर ह्या एके दिवशी केवळ ९ तारखेला पश्चिम मध्यप्रदेश उपविभागाबरोबरच महाराष्ट्रातील लगतच्या खान्देशातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्याच्या तुरळक भागात झालीच तर तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही.
ढगाळ व पावसाळी वातावरण ओसरल्यानंतर म्हणजे गुरुवार दि.११ जानेवारी, अमावस्येपासून, उत्तर भारतातून उत्तर व ईशान्य दिशेकडून थंड कोरडे वारे घुसण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात पुन्हा थंडीची शक्यता जाणवते. तर ६ ते १० जानेवारी पर्यंतच्या ५ दिवसात महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १६ डिग्री से.ग्रेड (म्हणजे सरासरीपेक्षा ४ डिग्रीने अधिक) व दुपारचे कमाल तापमान २८ डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरीइतके) दरम्यानचे असू शकते, असे वाटते.
- माणिकराव खुळे Meteorologist (Retd.) IMD Pune