Jayakawadi Dam Water :
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात मुबलक पाऊस पडल्याने जायकवाडी प्रकल्पासह अन्य लघु आणि मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले. जायकवाडी प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांतील १ लाख ५० हजार हेक्टर जमिनीवरील रब्बी आणि उन्हाळी पिकांना पाणी देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
सोमवारी (२५ नोव्हेंबर) रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागातील अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतही जोरदार पाऊस पडल्याने जायकवाडी धरण शंभर टक्के भरले.
नांदूर, मधमेश्वर धरणही चांगले भरले. याशिवाय मराठवाड्यात ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत चांगला पाऊस झाला. निम्न दुधना प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, उर्ध्व पैनगंगा, सिद्धेश्वर, येलदरी धरण, निम्न तेरणा आणि धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळेगाव प्रकल्पही पाण्याने काठोकाठ भरले.
या प्रकल्पात असलेल्या पाणीरब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांसाठी देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. 'कडा'चे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार म्हणाले की, यंदा जायकवाडी प्रकल्पात मुबलक जलसाठा आहे. यामुळे आम्ही रब्बी हंगामासाठी आवर्तने देण्यास सुरुवात केली आहे.
रब्बीसोबतच उन्हाळी पिकांसाठीही पाणी देण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी जायकवाडी प्रकल्पातून सुमारे १ लाख ५० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मांजरा प्रकल्पातील पाण्याचे रब्बीचे पहिले आवर्तन २० डिसेंबर रोजी सोडण्यात येणार आहे. नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्पातील रब्बी हंगामातील दोन पाणी आवर्तने डिसेंबरअखेर सुरू होतील. निम्न दुधना प्रकल्पातील रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे तीन पाणी आवर्तन प्रस्तावित आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे चार पाणी आवर्तने प्रस्तावित आहेत.
सूक्ष्म नियोजन करा : विभागीय आयुक्त
सोमवारी आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला त्यांनी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मुख्य अभियंता जयवंत गवळी, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव आणि राकेश गुजरे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
तीन जिल्ह्यांना फायदा
रब्बी हंगामाच्या पिकांसाठी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता जायकवाडीतून १०० क्युसेकने डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांतील १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.
जायकवाडी धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. रब्बी पिकांसाठी पाणीपाळीचे नियोजन पंधरा दिवसांपूर्वी करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे डाव्या कालव्यात पाणी सोडता आले नाही. अखेर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता उपकार्यकारी अभियंता बलभीम बुधवंत यांच्या हस्ते जायकवाडीतून डाव्या कालव्यात १०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे.
डाव्या कालव्यांतर्गत छत्रपती संभाजीनगरसह जालना आणि परभणी हे तीन जिल्हे येतात. या तीन जिल्ह्यांत १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्र रब्बीचे आहे. या पिकांसाठी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले असून, पहिले २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर, दुसरे १ ते २८ जानेवारी आणि तिसरे आवर्तन १ ते २६ फेब्रुवारी दरम्यान राहणार आहे, अशी माहिती प्रशांत जाधव यांनी दिली.
उजव्या कालव्यातही सोडणार पाणी
उजवा कालवा परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याबाबत अद्यापपर्यंत मागणी केलेली नाही. त्यामुळे या कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. या कालव्यांतर्गत छत्रपती संभाजीनगर, बीड आणि अहिल्यानगर हे तीन जिल्हे येत असून, या भागात रब्बी पिकांचे ४१ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. या कालव्याच्या आवर्तनाचे वेळापत्रक ठरले असून, त्यात पहिले ५ ते २० डिसेंबर, दुसरे ६ ते २१ जानेवारी आणि तिसरे आवर्तन ७ ते २६ फेब्रुवारी दरम्यान राहणार आहे, अशी माहिती प्रशांत जाधव यांनी दिली.