Join us

Jayakwadi Dam Discharge : जायकवाडी धरणात किती आले पाणी; किती प्रकल्प भरले? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 10:29 AM

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी किती वाढली? ते पाहुया सविस्तर (Jayakwadi Dam Discharge)

पैठण  येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी ६७.९० टक्क्यांवर जाऊन पोहोचली असून धरणात ६७ हजार २४० क्युसेक वेगाने पाणी येत असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितली. 

जिल्ह्यातील ४४ मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही ५०.६६ टक्क्यांवर पोहोचल्याने या पाण्याचा शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. जायकवाडी धरण परिसरात मागील पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याने वरच्या धरणातून पाण्याचा गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. 

धरणाची पाणीपातळी १५१५.३८ फूट आहे. बुधवारी सायंकाळी धरणातील जिवंत पाणीसाठा १४४८.६६२ दलघमी झाला होता. सायंकाळी सहानंतर धरणातील पाणी पातळी मंदावली आहे, असे शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील धरण ओव्हर फ्लो झाल्याने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे विविध प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. 

जिल्ह्यात ४४ मोठे प्रकल्प असून या प्रकल्पांमध्ये बुधवारपर्यंत सरासरी ५०.६६ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच काळात या प्रकल्पांमध्ये ३७.५६ टक्के पाणीसाठा होता. तसेच जिल्ह्यातील ८१ मध्यम प्रकल्पात बुधवारपर्यंत ३९.८० टक्के पाणीसाठा होता. 

गेल्यावर्षी २८ ऑगस्ट रोजी या बनोटी धरण ओव्हर फ्लो; सांडव्याद्वारे विसर्ग सुरू

• सोयगाव : तालुक्यातील बनोटी येथील धरण बुधवारी पहाटे शंभर टक्के भरले असून, या पाण्याचा सांडव्यातून एक सेमीने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तालुक्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १०८.५० टक्के पाऊस झाला असून,  सर्वाधिक म्हणजे ६३६.३० मिमी पाऊस सोयगाव महसूल मंडळात, तर सर्वांत कमी म्हणजे ४७६.१० मिमी पाऊस बनोटी महसूल मंडळात झाला आहे.

• जरंडी मंडळात ५८४.४० मिमी, तर सावळदबारा महसूल मंडळात ५७३.७० मिमी पाऊस झाला आहे.  सोयगाव तालुक्यात एकूण ११ धरण असून, त्यापैकी सोयगाव, जरंडी, देव्हारी पाठोपाठ आता बनोटी धरण ओव्हर फ्लो झाले आहे.

• त्यामुळे परिसरातील शेतीला सिंचनासाठी फायदा होणार असून, बनोटी वाडी, पळशी, नायगाव या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जिल्ह्यात ९२० सर्वसाधारण प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सरासरी ४२.६८ टक्के पाणीसाठा सध्या आहे. 

• गेल्या वर्षी २८ ऑगस्ट रोजी या सर्वसाधारण प्रकल्पांमध्ये ३१.४५ टक्के पाणीसाठा होता. प्रकल्पांमध्ये २३.७१ टक्के पाणीसाठा होता. जिल्ह्यात ७९५ लघु प्रकल्प असून या प्रकल्पांमध्ये मात्र फक्त २३.४५ टक्के पाणीसाठा आहे.  गेल्या वर्षी या लघु प्रकल्पांमध्ये यावेळेला २०.१८ टक्के पाणीसाठा होता.

टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणपाणीकपातपाणीपाऊस