रमेश शिंदेपाचेगाव : नगर आणि नाशिक जिल्ह्यावर मान्सूनने कृपादृष्टी केल्याने गोदावरी, प्रवरेवरील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. काही भरण्याच्या मार्गावर आहेत. दोन्ही जिल्ह्यातील धरणातून गेल्या दहा दिवसांपासून गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गोदावरीतून बावीस, तर प्रवरा नदीतून जायकवाडीच्या दिशेने चार टीएमसी पाणी झेपावले आहे. आतापर्यंत एकूण दोन्ही नद्यांचे मिळून २६ टीएमसी पाणी वाहिल्याने जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा २७ टक्क्याच्या पुढे सरकला आहे. समन्यायी पाणी वाटपाचे संकट टाळण्यासाठी आणखी पाण्याची गरज आहे.
नाशिक आणि नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या गोदावरी आणि प्रवरा या प्रमुख नद्यांसह छोट्या नद्याही खळखळून वाहत आहेत. गेल्या सप्ताहात या नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिले.
नगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे ही प्रमुख धरणे भरली असून, मुळा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, पालखेड, कडवा, भावली, भाम आदी धरणेही भरली आहेत. त्यामुळे कमी-अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यामुळे जायकवाडीचा उपयुक्त जलसाठा वाढण्यास मदत होत आहे. गेल्या आठवड्यात नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील गोदावरी, प्रवरा नद्यांवरील धरणे भरली. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला.
रविवारच्या (दि. ११) सकाळच्या आकडेवारीनुसार दोन्ही नद्यांमधून तब्बल २६ टीएमसीहून अधिक पाणी जायकवाडीत दाखल झाले. त्यात गोदावरीतून २२, तर प्रवरेतून ४ टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने गेल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे आहे.
धरणाच्या पाणलोटात सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणातून विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, उपयुक्त पाणीसाठा २७ टक्क्याच्या पुढे सरकला आहे.
रविवारच्या सकाळी गोदावरीवरील कमलपूर (ता. श्रीरामपूर) येथील जलमापक केंद्रावरील नोंदीनुसार ५ हजार २०७ क्युसेक, तर गोदावरीची उपनदी असलेल्या प्रवरेच्या मधमेश्वर (नेवासा) येथील जलमापक केंद्रावरील नोंदीनुसार १ हजार ८९७ क्युसेक पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे.
आणखी पंचवीस ते तीस टीमएसी पाणी हवेजायकवाडीचा उपयुक्त्त पाणीसाठा ६५ टक्क्याच्या पुढे गेल्यानंतर समन्यायीचे संकट टळते. त्यासाठी आणखी पंचवीस ते तीस टीएमसी पाण्याची गरज आहे.