Join us

Jayakwadi Dam : खुशखबरः जायकवाडीत ४० हजार क्युसेकने पाण्याची आवक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 11:32 AM

Jayakwadi Dam : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने संभाजीनगर, जालन्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

Jayakwadi Dam :  नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने विविध प्रकल्पांतून सोडलेल्या पाण्याची जायकवाडी प्रकल्पात आवक वाढली आहे. परिणामी, दोन दिवसांत जायकवाडीत आणखी १३ टक्के जलसाठ्याची भर पडल्याने छत्रपती संभाजीनगरसह जालना शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. त्यामुळे परिसरात आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी सायंकाळपर्यंत जायकवाडीत २२.६८ टक्के जलसाठा झाला होता. ४० हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू असल्याने पुढील तीन दिवसांत हा साठा ३० टक्के होण्याची शक्यता जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी व्यक्त केली.

जायकवाडीवर छत्रपती संभाजीनगर जालना, बीड व परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. छत्रपती संभाजीनगर जालना शहराची तहानही भागविली जाते. विविध औद्योगिक वसाहती, दोन नगर परिषद व विविध ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना जायकवाडी प्रकल्पावर आहेत. 

दहा दिवसांपूर्वी होता अवघा ५ टक्के साठा• मागील दोन वर्षाच्या तुलनेत सर्वात कमी जलसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला नाही. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातही गेल्या आठवड्यापर्यंत विशेष पाऊस झाला नव्हता. त्यामुळे मागील दहा दिवसांपर्यंत या धरणांत केवळ ५ टक्केच जलसाठा उपलब्ध होता. नाशिक आणि अहमदनगरात जोरदार पाऊस सुरू झाल्याने पाण्याची आवक वाढली आहे. 

पिण्याच्या पाण्याची गरज भागली

पुढील चार दिवसांत जायकवाडीचा जलसाठा ३० टक्केपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना शहरासह अन्य सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांना लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाईल. वर्षभर पुरेल एवढा जलसाठा उपलब्ध झाला आहे.- समाधान सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा 

 

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाऊसपाणीकपातशेतकरी