राज्यात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. राज्यातील धरणांमध्ये आता २५.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दरम्यान, मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात आता ६.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाड्यात चिंताजनक पाणीसाठा शिल्लक राहिला असून जायकवाडी धरणावर अवलंबून असणारे शेकडो गावे तहानली आहेत.
पावसामुळे तापमानात काही प्रमाण घट झाली असली तरी उन्हाचा पारा अजून चढाच आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग साधारण असून धरणसाठा कमी होत आहे. आज दि 15 मे रोजी जायकवाडी धरणात १४०.२६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उरला आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा ४४.०१ टक्क्यांवर होता. तो यंदा ६.४६ टक्क्यांवर गेला आहे.
नाथसागरावर मराठवाड्यातील पाच प्रमुख जिल्हे
नाथसागरावर मराठवाड्यातील पाच जिल्हे अवलंबून आहेत. यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांचा पाण्यापुरवठा थेट जायकवाडीवर अवलंबून असून परळी येथील थर्मल वीजकेंद्रही याच पाण्यावर अवलंबून आहे.