Jayakwadi Dam : पैठण येथील जायकवाडी नाथसागर धरणाचीपाणीपातळी यावर्षी जूनमध्ये ३ टक्क्यांवर पोहोचली होती. यामुळे मराठवाड्यावर जलसंकटाची भीती निर्माण झाली होती. मात्र जायकवाडी धरण १३ ऑक्टोबर रोजी १०० टक्के भरल्यामुळे सिंचनासह उद्योगधंद्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला.
धरण भरल्यानंतर १६ दरवाजे उघडून गोदावरी पात्रात तब्बल २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र आता वरील धरणांमधून येणारी आवक थांबल्यामुळे जायकवाडी
धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून विसर्ग थांबविण्यात आला.
जायकवाडी धरणाचीपाणीपातळी ३ टक्क्यांवर आल्यानंतर अवस्था यावर्षी बिकट झाली होती. मागीलवर्षी २०२३ मध्ये हे धरण ४७ टक्क्यांवर होते. यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने धरण
१३ ऑक्टोबरलाच शंभर टक्के भरले. जायकवाडी धरणात जूनपासून जवळजवळ १११ टीएमसी पाणी धरणात आले. तर धरणातून गोदापत्रात ८६२.९६१६ दलघमी पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले.
यंदा सुमारे ३०.४७४४ टीएमसी पाणी गोदापत्रात सोडले आहे. गोदापात्रात वेळोवेळी ९ ते १३ सप्टेंबर दरम्यान जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला होता.
त्यानंतर २४ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर गुरुवारपर्यंत धरणाचे दरवाजे सुरु होते. यातील शेवटच्या टप्प्यात सुरू असलेले दोन दरवाजे २५ दिवसांनंतर गुरुवारी बंद करण्यात आले. त्यामुळे धरणातून केला जाणारा विसर्ग पूर्णपणे थांबला आहे.
पाणीपाळीचे नियोजन रखडले
जायकवाडी धरण १०० टक्के भरल्यामुळे यावर्षी मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. रब्बी हंगामाच्या पाणी पाळ्यांचे मात्र अद्यापही पाटबंधारे विभागाने नियोजन केलेले नाही. शेतकऱ्यांना गहू, हरभरा, भुईमूगसह ऊस लागवडीचे नियोजन करायचे आहे. मात्र पाटबंधारे विभागाने अद्यापही पाणी पाळ्यांचे नियोजन केले नाही.
गोदापात्रात जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पैठणपासून ते नांदेडपर्यंत असलेले सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. वरील धरणांमधून पाण्याची आवक थांबल्याने गुरुवारी सकाळी १० वाजता सुरू असलेले दोन दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले. यंदा जायकवाडी धरणातून ३०.४७४४ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. - विजय काकडे, शाखा अभियंता