राज्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. कमाल तापमान ४० अंशांपर्यंत पोहचले असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. मराठवाड्याचे प्रमुख मोठे धरण समजले जाणाऱ्या जायकवाडी धरणात आता केवळ ११.११ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
राज्यातील धरणांचा साठा वेगाने घटत असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुढील पंधरा दिवसांत पाणीपातळी आणखी कमी होईल. त्यामुळे धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्याची तयारी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून केली जात आहे.
जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात आता सरासरी ३०.९७ टक्के पाणीसाठा राहिला आहे. औरंगाबाद विभागात आता १४.६७ टक्के पाणीसाठा उरला आहे.
संबंधित वृत्त-जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने घेतला जातोय निर्णय
मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण आता केवळ ११.११ टक्क्यांवर पोहोचले आहे. मागील वर्षी याच तारखेला हा पाणीसाठा ५२.३६ टक्के शिल्लक होता. आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८च्या सुमारास जायकवाडी धरणात केवळ २४१.२७ दलघमी जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.
राज्यातील एकूण २९९४ लघू, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आज ३०.९७ टक्के पाणीसाठा राहिला असून मागील वर्षी हा पाणीसाठा ४२.७५ टक्के एवढा होता.
राज्यात बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा खंड वाढू लागला असून वाडी वस्त्यांमध्ये टँकर वाढले आहेत.