कोपरगाव : कोपरगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता गोदावरी नदीतपाणी सोडण्यात आले आहे.
रविवारी रात्री ५२ हजार क्युसेकने सोडण्यात आलेले पाणी सोमवारी सकाळी सहा वाजता ६२ हजार आणि नऊ वाजल्यापासून ६९ हजार ३६७ क्युसेक करण्यात आले.
नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीत ७० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी पात्राबाहेर पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. कोपरगाव शहरातील छोट्या पुलाला हे पाणी खेटले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गोदावरी नदी वाहत असल्याने पाणी पाहण्यासाठी शहरातील सूर्यभान पाटील वहाडणे घाटावर नागरिकांनी दिवसभर गर्दी केली होती.
याशिवाय वारी येथील पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच हिंगणी, बक्तरपूर, कानळद, हिंगणी, माहेगाव देशमुख येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे.
कोपरगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. नाशिक जिल्ह्यातील १७ धरणातून सुमारे ७० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.
आतापर्यंत २५ टीएमसी पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात जमा झाले असून जायकवाडीचा साठा ४५ टक्क्याच्यावर पोहोचला आहे
सावधानतेचा इशारासोमवारी (दि. २६) नांदूर मध्यमेश्वर धरणातून ७० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातील विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. तेव्हा गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सावधानता बाळगत नदीच्या प्रवाहात जाऊ नये, संबंधित यंत्रणांनी देखील दखल घ्यावी, असे आवाहन गोदावरी डावा तट कालवा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी केले आहे. महसूल प्रशासनाने देखील नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामसेवक, पोलिस पाटील, तलाठी यांनी आपत्तीची घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी.