Join us

Jayakwadi Dam : मराठवाड्यातील धरणे भरली; रब्बी पिकांचा पाणी प्रश्न मिटला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 1:49 PM

जायकवाडी प्रकल्पामुळे यंदा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील सुमारे अडीच लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.(Jayakwadi Dam)

Jayakwadi Dam :

छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत मुबलक पाऊस पडल्याने जायकवाडी प्रकल्प तुडुंब भरला आहे. जायकवाडी प्रकल्पामुळे यंदा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील सुमारे अडीच लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

जायकवाडी प्रकल्प बांधला तेव्हा दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट होते. डाव्या कालव्यावर जालना छत्रपती संभाजीनगर, परभणी जिल्ह्यांतील १ लाख ४० हजार हेक्टर जमीन तर उजव्या कालव्यावर बीड जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टर जमिनीचा यात समावेश होता.

मागील वर्षी मराठवाड्यासह जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातही अत्यल्प पाऊस पडला होता. त्यामुळे मागील वर्षी जायकवाडी प्रकल्प केवळ ५८ टक्क्यांपर्यंतच जलसाठा होता.

२.५  लाख हेक्टर जमीन जायकवाडी प्रकल्पामुळे ओलिताखाली येणार.

१.८१  जायवाडी प्रकल्प बांधताना सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

१.४ लाख हेक्टर जमीन डाव्या कालव्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, आणि परभणी जिल्ह्यांत आहे.

४१  उजव्या कालव्यावर बीड जिल्ह्यात आहे.

५८  टक्के जलसाठा २०२३ मध्ये जायकवाडी प्रकल्पात जमा झाला होता.

१०० % जायकवाडी प्रकल्प २०२४ मध्ये भरला आहे.

१.१ लाख हेक्टर जमीन मराठवाड्यातील उत्तर प्रकल्पांमुळे सिंचनाखाली येणार आहे.

मराठवाड्यातील मोठे, मध्यम प्रकल्पही भरले यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने जायकवाडी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. यासोबतच मराठवाड्यातील अन्य मोठी, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे १ लाख १० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

१५ ऑक्टोबर रोजी बंधाऱ्यातील बॅरेजमध्ये दरवाजे टाकल्यानंतर बंधाऱ्यांचा जलसाठा शंभर टक्केपर्यंत वाढणार असल्याचे कडाचे अधीक्षक एस. के. सब्बीनवार यांनी सांगितले.

यावर्षी धरणे आणि बंधारे भरल्याने सुमारे अडीच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शिवाय जायकवाडी प्रकल्प भरल्याने छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींचा पाण्याची चिंता दूर झाली आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीपाऊसनाशिकमराठवाडारब्बी