पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात ३४ हजार ३१८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून धरणातील पाणीसाठा ८५.५३ टक्के झाला आहे.
त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात सायंकाळपर्यंत ३४ हजार ३१८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.
धरणातील एकूण पाणीसाठा २५९४.८६७ दलघमी (८५.५३ टक्के) झाला आहे. धरणाची एकूण पाणी पातळी लेवल १५२२ फूट असून रविवारी धरणाची पाणी पातळी १५१९.२५ फुटावर पोहोचली आहे. तसेच माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाणी सोडले आहे.
यामुळे कुठल्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडू शकतात. या अनुषंगाने रविवारी दिवसभर जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची दिवसभर ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत दरवाजे उघडण्यावर चर्चा झाली.