पैठण येथील जायकवाडी प्रकल्प ९६ टक्के भरला आहे. रविवारी ऊर्ध्व भागातून १५१४१ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. शिवाय पावसाळ्याचा अजून एक महिना शिल्लक असल्याने प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.
कोणत्याही क्षणी गोदापात्रात पाणी सोडले जाईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धरणातील पाणीसाठा रविवारी सायंकाळी ६ वाजता ९६.३७ टक्के झाला असून, ९८ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली होती.
धरणाची क्षमता १५२२ फूट आहे. धरणात सध्या २०९२.१२४ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा आहे. धरणात पाण्याची १८ हजार ७२ क्युसेकने आवक होत असून उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणासाठी ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. धरणातील पाणी ९८ टक्के झाल्यानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास धरणाचे दरवाजे कुठल्याही क्षणी उघडू शकतात पाण्याची आवक १५ हजार १४१ क्युसेकने सुरू आहे. २०२२ मध्ये धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला होता.
आज सोमवार (दि.९) रोजी ठिक १२.०० वा. ते १३.०० वाजे दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात ३१४४ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
गोदाकाठच्या गावांनी सतर्क राहावे
■ जायकवाडीतून गोदापात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते. यामुळे नदीला पूर येईल.
■ तेव्हा गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंतांनी केले आहे.
आवक अजून वाढेल
ऊर्ध्व भागात पुन्हा जोरदार पाऊस होताच पाण्याची आवक वाढणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे (कडा) मुख्य प्रशासक विजय घोगरे आणि प्रशासक तथा अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी गोदापात्रात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. सध्या प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे पाणी सोडले आहे.