छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील ६ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी ५ टक्क्यांनी वाढली आहे.
जायकवाडीचे पाणलोट क्षेत्र व वरील बाजूला काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. ज्यामुळे बुधवारी धरणात ६ हजार ५६७ क्युसेकने आवक झाली. तर गुरुवारी यात वाढ होऊन सायंकाळी ६ पर्यंत धरणात ९ हजार ८५० क्युसेकने पाणी येत होते.
धरणाचा जिवंत पाणीसाठा १९६.०५३ दलघमी आहे. तर धरणाची पाणी पातळी ९.३ टक्क्यावर गेली आहे. यातुलनेत गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये धरणात ३२ टक्के पाणी होते.
मागील वर्षी धरण केवळ ५० टक्के भरल्यामुळे यंदा भरण्यास उशीर होत आहे. २७ जुलै २०२३ रोजी धरणातून १० हजार क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यावेळी २०८ टीएमसी पाणी धरणाच्या २७ दरवाजांतून गोदापात्रात सोडण्यात आले होते. आज रोजी धरणात ५ टक्के पाणी आल्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा आता ९ टक्के झाला आहे.