नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणीजायकवाडी धरणात शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली असून, सध्या पाणी पातळी ५.७९ टक्क्यांवर पोहोचली आहे, अशी माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.
मागील तीन ते चार दिवसांपासून जायकवाडी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे गुरुवारी नांदुर मधमेश्वरमधून जायकवाडी धरणाकडे १२ हजार क्युसेकने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले होते. हे पाणी शुक्रवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जायकवाडीत पोहोचले.
शनिवारपर्यंत धरणातील पाणी पातळी दीड फुटाणे वाढली असून, ती आता ५.७९ टक्के झाली आहे. १ जूनपासून ते आजपर्यंत धरणात ८२.२९२० दलघमी पाण्याची आवक झाली आहे.
मराठवाड्यातील प्रमुख धरणांतील जलसाठा
जायकवाडी | ११३.२१ |
निम्न दुधना | १९.१० |
येलदरी | २४७.९४ |
सिद्धेश्वर | १३.६५ |
मांजरा | १.३७ |
पैनगंगा | ४०५.४९ |
मानार | ५६.७४ |
निम्न तेरणा | २५.१८ |
विष्णूपुरी | ६८.३६ |
(सर्व आकडे दलघमीत) |