Join us

Jayakwadi Dam: जायकवाडीतून दुसरे आवर्तन कधी सोडले जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 2:20 PM

रब्बीसह उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा 

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी दोन पाणी आवर्तनाचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येते. यंदा पहिले आवर्तन नोव्हेंबर २०२३ मध्ये सोडण्यात आले. मात्र अद्यापही दुसऱ्या पाणी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले नसल्याने रब्बी हंगामातील पिकांना फटका बसू लागला असून उन्हाळी हंगामातील उसालाही पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे साहेब, पिकांना दुसरे आवर्तन कधी सोडणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढली नसल्याने शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणी स्त्रोताचे पाणी कमी झाले आहे. या भागामध्ये जायकवाडीच्या डावा कालवा आणि गोदावरी नदी पात्रातील उच्च पातळीचे तीन बंधारे असले तरी सध्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. बंधाऱ्यातही १५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे.

पहिले आवर्तन नोव्हेंबरमध्ये..

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामाला दोन पाणी आवर्तन सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले होते. पहिले आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या आवर्तनाचे मात्र नियोजन झाले नसल्याने रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. यावर्षी रब्बी हंगामातच पाण्याची अशी अवस्था आहे तर उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.

संबंधित वृत्त- जायकवाडीतून रब्बीसाठी सोडले पहिले आवर्तन

या भागात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे उसासाठी डाव्या कालव्यातील पाणी शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी तशी परिस्थिती दिसून येत नाही. पर्यायाने याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे दुसरीकडे डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले असले तरी ते परळीच्या थर्मल पॉवरसाठी सोडण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.

कालवा सल्लागार समितीची बैठकच नाही

• रब्बी हंगामातील पिकांना पाणी सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची मंजुरी आवश्यक असते मात्र अद्यापही कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्यामुळे पाणी कधी सुटणार हा प्रश्न आहे. • जायकवाडी धरणात पाणी कमी असल्याने अरबीचे दूसरे आवर्तन सुटते की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

टॅग्स :जायकवाडी धरणधरणपाणीमराठवाडा