ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणी जोत्याखाली जाईल की काय? अशी भिती निर्माण झाली होती. परंतू गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हाजेरी लावल्याने धरण पाणीसाठयात आवक वाढण्यास सुरूवात झाली आहे.
पैठण येथील जायकवाडी पाणलोट क्षेत्रासह नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे मंगळवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी ६०.१७ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. धरणात ८४ हजार ४४१ क्युसेकने पाण्याची आवक होत असून मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये धरण केवळ ५५ टक्के भरले होते. मात्र, यावर्षी ऑगस्ट महिन्यातच या धरणात ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आणखी एक महिना पावसाळा आहे.
असा होतोय विसर्ग
नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीत पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील गंगापूरमधून ५२० क्युसेक, भावली ४८१, भाम २ हजार ९९०, वालदेवी १८३, वाकी ८५३, कडवा ३ हजार २९२, आळंदी २४३, नांदूर मधमेश्वर ३९ हजार १६९, भोजापूर ९१०, होळकर ब्रीज २ हजार २१, पालखेड ३ हजार ९०८, वाघाड २ हजार २७५, तीसगाव ३२२, पुणेगाव १ हजार ३०० आणि ओझरखेड धरणातून १ हजार ३२० क्युसेक
पाणी हे नागमठाण धरणात येत आहे. तेथून त्याचा गोदावरी पात्रात विसर्ग केला जात आहे.
१७ गावांना सतर्कतेचे आदेश
वैजापूर तालुक्यातील १७ गावांना सतर्कतेचे आदेश गोदावरी नदीकाठावरील वैजापूर तालुक्यातील बाबतरा, डोणगाव, नांदूरढोक, लाखगंगा, पुरणगाव, बाभूळगावगंगा, सावखेडगंगा, अव्वलगाव, हमरापूर, नागमठाण, बाजाठाण, चेंडूफळ, भालगाव, चांदेगाव, डागपिंपळगाव, शनिदेवगाव व वांजरगाव या १७ गावांना महसूल प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नगर जिल्ह्यातील धरणातून असे येते पाणी
नगर विभागातील भंडारदरा ६ हजार ९५०, निळवंडे ८ हजार ७४४, मुळा १० हजार, ओझर वेअर ९ हजार ७६९, आडाळा ७८ आणि मजमेश्वर केटीवेअरमधून ३ हजार ६०० क्युसेक पाणी देवगड बंधारा येथे आल्यानंतर ते गोदावरी नदीत सोडले जात आहे. तेथून हे पाणी जायकवाडी धरणात येते.
यापूर्वी असे भरले धरण
■ १९७५ पासून धरण शंभर टक्के बारा वेळेस, ५० टक्क्यांच्या पुढे १६ वेळेस आणि २००५ ते २००८ हे तीन वर्षे शंभर टक्के धरण भरले होते.
■ २०१८ ते २०२२ हे सलग ३ वर्षे धरण शंभर टक्के भरले होते.
मराठवाड्यातील प्रमुख प्रकल्पांतील जलसाठा
प्रकल्प | जलसाठा | टक्केवारी |
जायकवाडी | १२५२ दलघमी | ५७.७०टक्के |
निम्न दुधना | ५६.९४८ दलघमी | २३.५१टक्के |
येलदरी | ३२८.६३ दलघमी | ४०.५८ टक्के |
सिद्धेश्वर | ६०,५३६ दलघमी | ७४.७७ टक्के |
माजलगाव | ०० दलघमी | ०० टक्के |
मांजरा | ५८.७५ दलघमी | ३३.२० टक्के |
पैनगंगा | ६२५.४४ दलघमी | ६४.८६ टक्के |
मानार | १३८.२२१ दलघमी | १००.००टक्के |
निम्न तेरणा | २९.३४ दलघमी | ३२.१६ टक्के |
विष्णुपुरी | ६९.९१०दलघमी | ८६.५३३ टक्के |