Jayakwadi Dam Water level : पैठण येथील जायकवाडी धरण शनिवारी(१९ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ६ वाजता १०० टक्के भरल्याने धरणाचे २७ पैकी १० दरवाजे उघडून त्यामधून ५ हजार २४० क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
जायकवाडी धरणाच्या परिक्षेत्रात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणात ५ हजार ६३९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाली. धरणात अगोदरच मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असताना नव्याने आलेल्या पाण्याची त्यात भर पडली.
त्यामुळे धरण १०० टक्के भरले. त्यामुळे सायंकाळी ६ वाजता धरणाच्या २७ पैकी १० दरवाजांमधून गोदापात्रात ५ हजार २४० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, या धरणातून यावर्षी आतापर्यंत गोदावरी पात्रात जवळपास २९.७ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
गेल्या ६० वर्षात हे धरण १४ वेळा १०० टक्के भरले आहे. हे धरण भरल्याने पुढील दोन वर्षे या धरणावर अवलंबून असलेल्या गाव व शहरांच्या पिण्याचा प्राण्याचा प्रश्न मिटला असून सिंचनाचाही या वर्षाचा प्रश्न मिटल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.
१ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली
या धरणामुळे उजव्या कालव्यावरील ४१ हजार हेक्टर क्षेत्र तर डाव्या कालव्यावरील १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शेतकऱ्याच्या मागणीनुसार पाणीपाळीचे नियोजन लवकरच करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांना रब्बीसाठी ३ पाणीपाळ्या व उन्हाळ्यात ४ पाणीपाळ्यांचे नियोजन करण्यात येईल, असेही कार्यकारी अभियंता जाधव यांनी सांगितले.
हिंगोलीतील 'सिद्धेश्वर'चे १४ दरवाजे उघडले
• औंढा नागनाथ : बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने येलदरी धरणात आवक वाढली आहे. त्यामुळे १९ ऑक्टोबर रोजी या धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले.• हे पाणी सिद्धेश्वर धरणात येत असल्याने या धरणाचेही दुपारी सर्व १४ दरवाजे उघडण्यात आले असून, १३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात होत आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून मागील आठ दिवसांपासून निरंतर पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.• १४ ऑक्टोबर रोजी सिद्धेश्वर धरणाचे दहा गेट एक फुटाने उचलून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. १८ ऑक्टोबर रोजी येलदरीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला.
'येलदरी'ही ओव्हर फ्लो, २३७०० क्युसेकने विसर्ग• येलदरी (जि.परभणी): खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने येलदरी धरण ओव्हरपलो झाले आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी येलदरीचे १० वक्र दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले.
• यातून २३,७०० क्युसेक एवढा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.• परभणी जिल्ह्यातील येलदरी धरण भरण्यासाठी संपूर्ण पावसाळा वाट पाहावी लागली. मात्र पावसाळ्या अखेर पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण तुडुंब तर भरले. • मात्र, खडकपूर्णा प्रकल्पातून १९ दरवाजे अर्धा मीटरने उघडून ४४,३९५ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी येलदरी प्रकल्पात पाण्याची आवक वाढली.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
• खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने येलदरी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे येलदरीतून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे.
• त्यामुळे नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.