पैठण येथील जायकवाडीच्या उर्ध्व भागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत असल्याने मागील १० दिवसात ७ टक्के जलसाठा वाढला. रविवारी जायकवाडीमध्ये १.२० टक्के जलसाठा होता. गतवर्षी आजच्या दिवशी ३३ टक्के साठा होता.
छत्रपती संभाजीनगरसह लहानमोठ्या ३०० हून अधिक पाणीपुरवठा योजना, मराठवाड्यातील सुमारे १ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्र जायकवाडीमुळे सिंचनाखाली आले आहे. अशा या महत्त्वाच्या प्रकल्पात केवळ ११.२० टक्के जलसाठा आहे. गतवर्षी मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडला होता. अशीच अवस्था यंदाही आहे. परिणामी विभागातील लहान, मोठ्या धरणांनी तळ गाठलेला आहे.
मागील आठ ते दहा दिवसांपासून वरच्या भागात बऱ्यापैकी पाऊस पडत असल्याने गोदापात्र वाहते झाले. १० दिवसांपूर्वी जायकवाडी प्रकल्पात केवळ ४.५० टक्के जलसाठा होता. रविवार (दि.४) तो ११.२० टक्के झाला. आगामी काळात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला असल्याने जायकवाडीची आवक वाढेल, असा अंदाजही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
गतवर्षी आजच्या दिवशी होता ३३ टक्के पाणीसाठा
जायकवाडी प्रकल्पात गतवर्षी आजच्या दिवशी ३२.८०% जलसाठा होता. मागील चार वर्षातील आजचा सर्वात कमी जलसाठा आहे.
रविवारी सायंकाळी ६ वाजता धरणात १५ हजार १८५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. सध्या धरणाची पाणीपातळी ११.२० टक्क्यांवर पोहोचली आहे. रविवारी दुपारी १२ वाजता नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून जायकवाडी धरणाकडे ४४ हजार ७६८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून हे पाणी सोमवारी सकाळपर्यंत नासागर धरणात पोहोचणार आहे. - गणेश खरडकर, जायकवाडी धरणाचे अभियंता.
जायकवाडीवरील धरणांतून होणारी पाण्याची आवक (क्युसेकमध्ये)
दारणा | २२,९६६ |
भावली | १,५०९ |
कडवा | १०,९८ |
भाम | ४,३७० |
पालखेड | ५,२५५ |
नांदूर मधमेश्वर | ४४,७६८ |
गंगापूर | ६,००० |
नागमठाण | ३६,६८० |
भंडारदरा | २८,२४४ |
निळवंडे | ३०,७७५ |
ओझर वेअर | १२,६९ |
नांदूर मधमेश्वरमधून ४४ हजार क्युसेकने पाणी झेपावले
नाशिक परिसरात रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे रात्री ८.३० वा. गंगापूर धरणातून ८हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरी धाटातील बहुतांश मंदिरे पाण्याखाली गेली असून गोदावरीला महापूर आला आहे. मागील काही दिवसांपासून जायकवाडीत पाण्याची आवक सुरू झाली होती. मागील दोन दिवसांपासून नाशिकसह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.