Join us

कर्नाटकने भीमा नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्याने महाराष्ट्राच्या शेतीला मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 11:47 AM

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर भीमा नदीच्या पात्रात कर्नाटक सरकारने १३३ कोटी रुपये खर्चुन नवीन बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यात उभय राज्यातील शेतीसाठी पाण्याचा साठा करण्यात येणार आहे.

नारायण चव्हाणसोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर भीमा नदीच्या पात्रात कर्नाटकसरकारने १३३ कोटी रुपये खर्चुन नवीन बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यात उभय राज्यातील शेतीसाठी पाण्याचा साठा करण्यात येणार आहे. येत्या पावसाळ्यात हा बंधारा कार्यान्वित होणार असल्याची माहिती कर्नाटक पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

कर्नाटक सरकारने नियमित पाणीपुरवठ्यासाठी भीमा नदी पात्रात उमराणी येथे हा बंधारा बांधला आहे. कर्नाटक सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या महामंडळाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधला आहे.

गेली दोन वर्षे या बंधाऱ्याचे काम सुरू होते. यंदा बंधारा पूर्ण झाला असून पावसाळ्यात पाणी साठ्यासाठी सज्ज झाला आहे. सादेपूर येथील बंधाऱ्याच्या खालील बाजूला ७०० मीटर अंतरावर हा बंधारा बांधण्यात आला आहे. बंधाऱ्यात स्वतंत्रपणे पाणी साठवण्यात येणार आहे.

१३३ कोटींचा खर्चया बंधाऱ्यासाठी संपूर्ण खर्च कर्नाटक सरकारने केला आहे. १३३ कोटी रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षे या बंधाऱ्याचे काम सुरू होते. बंधाऱ्याला मेकॅनिकल ऑपरेटेड गेट असून स्वयंचलित यंत्रणेद्वारे संचलन करण्याची व्यवस्था आहे. इलेक्ट्रिक बटन दाबताच एकाच वेळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडझाप करता येणार आहेत. त्यामुळे नदीपात्रात अचानक पाण्याचा प्रवाह आल्यास तीन तासात संपूर्ण पाणीसाठा रिकामा करता येईल, अशी या बंधाऱ्याची रचना आहे. दरवाजे उघडझाफ करण्यासाठी २४ तास विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास त्याला जनरेटरची सुविधा पुरवण्यात आली आहे.

१०,१२० एकराला सिंचनउमराणी बंधाऱ्यातून चडचण तालुक्यातील ९२१५ एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून महाराष्ट्रात ८१५ एकर क्षेत्र सिंचन होणार आहे. जुना सादेपूर बंधारा आणि नवीन उमराणी बंधाऱ्याच्या दरम्यान ०.६४ टीएमसी पाणीसाठा अपेक्षित आहे. चडचण शहराच्या पाणीपुरवठ्याचे जॅकवेल बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रात असून त्याला २४ तास वीज पुरवठा होणार आहे.

कर्नाटक सरकारने बांधलेला हा बंधारा दोन्ही राज्यातील शेतीच्या पाण्याची गरज भागवणार आहे. कर्नाटकातील गावांचा पाणीपुरवठा याच बंधाऱ्यावर अवलंबून असणार आहे त्यामुळे २४ तास वीज पुरवठा शक्य आहे. - आनंद कुंभार, सहा. कार्यकारी अभियंता, कृष्णा भाग्य जलनिगम, कर्नाटक

अधिक वाचा: Water Scarcity पाणी टंचाई मधून आपण बोध कधी घेणार?

टॅग्स :धरणनदीकर्नाटकसरकारसोलापूरमहाराष्ट्रपाटबंधारे प्रकल्पशेतकरीशेती