Katepurna Dam : पाण्याची आवक सुरूच असल्याने महान येथील काटेपूर्णा धरणातील पाणीपातळी ८५ टक्क्यांवर गेल्यामुळे सोमवारी (५ ऑगस्ट) रात्री दोन स्वयंचलित दरवाजे एक-एक फुटाने उघडून नदीपात्रात प्रतिसेकंद ४६.११ घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा उघडले आहेत. दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता धरणाची पाणीपातळी ८५.०७ टक्क्के झाली होती. धरणात येणारे पाण्याचा येवा आणि पूरपरिस्थिती लक्षात घेता, रात्री ११ वाजता धरणाचे दोन दरवाजे प्रत्येकी एक-एक फुटाने उघडण्यात आले आहेत. मालेगाव भागातून वाहत येणारी काटा कोंडाला नदीचे पात्र भरल्याने त्या भागातील पावसाचे पाणी थेट काटेपूर्णा धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होणे सुरूच आहे. धरणात येणारा पाण्याचा येवा आणि पाऊस लक्षात घेऊन धरणातून सुरू असलेला विसर्ग कमी-जास्त करण्याचा निर्णय वेळेवर घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या पाऊस नसल्याने धरणाच्या जलसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. धरणातील जलसाठा पाहूनच विसर्ग बंद करण्यात येईल. जलसाठ्याकडे उप कार्यकारी अभियंता विशाल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता ऋषिकेश इंगोले, मनोज पाठक, अमोल पालखडे, नाना शिराळे, सुखदेव आगे, प्रतिक खरात हे बारकाईने लक्ष ठेऊन व्यवस्थित नियोजन करीत आहेत.
मुख्य भिंतींवर प्रवेशबंदीवाढता जलसाठा पाहून सुरक्षा वाढविण्यात आली असून, धरणाच्या मुख्य भिंतींवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आय. बी. विश्राम गृह ते धरणापर्यंत सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याने मुख्य भिंतींवर फिरणाऱ्यांवर वचक बसला आहे.
अशी आहे स्थितीपाणी पातळी : ३४६.८६ मीटरपाणीसाठा: ७२.७७४ दलघमीटक्केवारी : ८४.८७ टक्केधरणस्थळी पाऊस : ४४४ मिली
धरणाच्या जलसाठ्यात वाढ होते
धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत असल्याने धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठावरील येणाऱ्या सर्वच गावांना वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देऊन खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.- विशाल कुळकर्णी, उप कार्यकारी अभियंता, काटेपूर्णा धरण.