अनिस शेख
अकोला व मूर्तिजापूर शहरासह ६४ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांची तहान भागविणारे येथील काटेपूर्णा धरणाचा जलसाठा १ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता ८० टक्क्यांवर पोहोचल्याने धरणाचे चार वक्रद्वार ३० सेंटीमिटरने उघडण्यात आले.
त्यातून नदी पात्रामध्ये प्रतिसेकंद ९२.२३ घनमीटर (३२५७ क्युसेक) पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अमोल वसूलकर यांनी दिली. धरणातील जलसंचयाच्या परिचलन आराखड्यानुसार पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पावसाळ्याच्या चार महिन्यांत पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार जलाशय परिचालन आराखडा तयार केलेला असतो. जलाशय परिचालन आराखड्यानुसार धरणात आरक्षित जलसाठा ठेवून त्यावरील अतिरिक्त पाण्याचा नदी पात्रात विसर्ग केल्या जातो. चालू पंधरवड्याच्या जलाशय परिचालन आराखड्यानुसार नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यासाठी आवश्यक जलसंचय काटेपूर्णा प्रकल्पात झाल्यामुळे गुरुवारी रात्री पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किंवा मालेगाव, काटा कोंडाळा, जऊळका, अमान वाडी, मुसळवाडी, थानोरा, फेट्रा या भागात जोरदार पाऊस झाल्याने धरणाची पातळी वाढली. वाढत्या जल साठ्याकडे उपकार्यकारी अभियंता विशाल कुळकर्णी, शाखा अभियंता ऋषिकेश इंगोले, कर्मचारी मनोज पाठक, नाना शिराळे, सुखदेव आगे, अमोल पालखडे, प्रतिक खरात है धरणावर तळ ठोकून नियोजन करीत आहे.
गत वर्षी एकदाही विसर्ग नाही
● गेल्यावर्षी पुरेसा पाऊस न आल्याने काटेपूर्णा धरण पावसाळ्याअखेर ८२ टक्केच भरले होते. त्यामुळे जलाशय परिचालन आराखड्यानुसार धरणाचे चक्रद्वार एकदाही उघडण्यात आले नव्हते.
● वर्ष २०२२ मध्ये मात्र अनेक वेळा धरणाचे वक्रद्वार उघडून अतिरिक्त पाण्याचा नदी पात्रात विसर्ग करण्यात आला होता.
असा आहे जलाशय परिचालन आराखडा
• १६ ते ३१ जुलै दरम्यान धरणात ८० टक्के जलसाठा आरक्षित ठेवून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग,
• १ ते १५ ऑगस्ट दरम्यान ८५ टक्के पाणी आरक्षित ठेवून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग.
• १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान ९५ टक्के पाणी आरक्षित ठेवून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग.
• १ ते १५ सप्टेंबर दरम्यान ९८ टक्के पाणी आरक्षित ठेवून अतिरिक्त्त पाण्याचा विसर्ग,
• १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान १०० टक्के पाणी आरक्षित ठेवून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग.