अनिस शेख
काटेपूर्णा धरणातून १ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान अशा ४० दिवसांत ९२.४११ दलघमी पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. या धरणाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी असून, ४० दिवसांत साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत धरणाची पाणी पातळी ९७.१४ टक्के आहे.
अकोला शहरासह, मूर्तिजापूर शहर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी, महान मत्स्यबीज केंद्र आणि खांभोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरील ६४ खेडी गावांची तहान काटेपूर्णा धरणावर अवलंबून आहे.
परवानाधारक शेतकऱ्यांना मिळणार पाणी
• धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ३१ ऑगस्टपासून आतापर्यंत अनेकवेळा धरणाची वक्रद्वारे उघडून नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे.
• पाणीपातळी १०० टक्क्यांच्या जवळ असल्याने यावर्षी धरणातून परवानाधारक शेतकऱ्यांना येत्या नोव्हेंबरपासून रब्बी हंगामासाठी नदीपात्रात पाणी सोडणार असल्याचे निश्चित झाले आहे.
• त्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात गहू, हरभरा आदी पिके घेता येणार आहेत.
■ गेल्यावर्षी पावसाळा अल्प प्रमाणात झाल्याने धरणाचा जलसाठा पावसाळा अखेर ८२ टक्क्यांपर्यंतच पोहोचला होता. त्यामुळे नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग लवकरच बंद करण्यात आल्याने नदीकाठावरील परवानाधारक शेतकऱ्यांना मोजक्याच प्रमाणात धरणातून पाणी सोडण्यात आले होते. यावर्षी सुरुवातीला कमी प्रमाणात पाऊस होता.
■ यंदाही धरणाची पाणीपातळी १०० टक्क्यांपर्यंत पोहोचणार की नाही, या चिंतेत नागरिक, शेतकरी होते; परंतु गेल्या १ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढतच असल्याने धरणाचा जलसाठा १०० टक्क्यांच्या उंबरठ्यावर आला आहे. धरणस्थळी आतापर्यंत एकूण ६६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद पाटबंधारे विभागात करण्यात आली आहे.