अनीस शेख
अकोला शहराची तहान भागविणाऱ्या येथील काटेपूर्णा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून, मंगळवार, ३० जुलै रोजी धरणातील जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने येत्या काही दिवसांत जलसाठा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वर्षी पावसाळ्याआधी धरणात केवळ १२ टक्के जलसाठा होता. सुरुवातीला अत्यल्प पाऊस झाल्याने पातळीत वाढ झाली नव्हती. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत गेली व ३० जुलै रोजी जलसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला. काटा कोंडाळा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाणलोट क्षेत्रातील पाणी धरणात येऊन मिसळण्यास कोणतीही अडचण राहिली नाही हे विशेष.
पाचवा व्हॉल्व्ह पाण्यापासून चार फूट दूर
अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह बसविलेले आहेत. त्यापैकी चार व्हॉल्व्ह पाण्याखाली बुडाले असून, पाचवा व्हॉल्व्ह पाण्याखाली येण्यास केवळ चार फूट पाण्याची आवश्यकता आहे. मालेगाव परिसरात दमदार पाऊस पडल्यास महान धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास फारसा वेळ लागणार नाही.
साडेअकरा फूट पाण्याची गरज
• उन्हाळ्यात धरणातील पाणी मुख्य गेटपासून खूप खाली गेले होते. आता धरणाच्या जलसाठ्यात पाण्याची आवक वाढल्याने मुख्य गेटवर साडेचार फुटांपर्यंत पाणी येऊन पोहोचले आहे.
• जलसाठा १०० टक्के होण्याकरिता आणखी साडेअकरा फूट पाण्याची आवश्यकता महान धरणाला आहे.
• गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी महान धरणात १० टक्के जलसाठा कमी आहे. वाढत्या जलसाठ्याकडे उपकार्यकारी अभियंता विशाल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात शाखा अभियंता ऋषिकेश इंगोले, मनोज पाठक, अमोल पालखडे, नाना शिराळे, सुखदेव आगे, प्रतीक खरात हे लक्ष ठेवून आहेत.
३० जुलै रोजी जलसाठा
३४४.३३ - मीटर
४३,२४० - दशलक्ष घनमीटर
५०,०७ - टक्के
३६२.०० - मिमी. पावसाची नोंद