Join us

किकुलॉजी : ढगांचा एक्सरे काढणाऱ्या रडार तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील शेतकरी कधी समृद्ध होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 1:59 PM

(किकुलॉजी, भाग २) सर्वसामान्य शेतकऱ्यांना हवामान तंत्रज्ञान सजगता व्हावी, या उद्देशाने हवामानाविषयी समग्र माहिती देणारे हे लेखन!

अर्थव्यवस्था व उत्पादन जीवनरेखा असलेल्या मान्सूनचा पॅटर्न लक्षणीयरित्या बदलला आहे. जगातील एक नंबर शक्तीशाली मनुष्यबळ असलेल्या देशाची भुक भागवत व जगाच्या अन्नसुरक्षिततेचे लक्ष्य गाठण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम म्हणजे एक्स बँड डॉप्लर रडार होय. प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर (पीएलसी), पर्यवेक्षी नियंत्रण आणि माहिती अधिग्रहण (स्काडा), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर) आदींच्या वापराने 'राष्ट्रीय एक्स बँड डॉप्लर रडार नेटवर्क' हे हवामानाची बिनचूक माहिती घराघरातील  शेतकऱ्यांपर्यंत पोहचवेल असा सशक्त भारत लवकरच सत्यात साकारलेला असेल.

'चिक्कूचे बी पेरून झाडाला सफरचंद येतील का?' अगदी तसेच, कुठलेही रडार हे आकाशातून पाऊस पाडू शकत नाही किंवा पडणारा पाऊस देखील थांबवू शकत नाही हे खरे! परंतु रडार यासाठी बनलेलेच नाही हे समजून घेत आपली दिशाभूल होणार नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे. खरंतर अवकाळी पाऊसासह हवामानाची अत्यंत अचूक माहिती देण्यासाठी एक्स बँड डॉप्लर रडारची निर्मिती झाली आहे. त्यामुळे सुबत्तेचा आणि पैशाच्या पावसासाठी 'एक्स बँड डॉप्लर रडार'चा रामबाण उतारा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. शेतीच्या विविध टप्प्यांमध्ये देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना जिल्हा आणि तालुका पातळ्यांवर अचूक कृषी हवामान विषयक सल्ल्यासाठी आणि एकंदर शेती-अर्थकारण-नियोजन करीत सुयोग्य पिकांच्या निवडीसाठी 'राष्ट्रीय एक्स बँड डॉप्लर रडार नेटवर्क' आवश्यक आहे.

ढगांचा एक्स रे...

१८१ वर्षापूर्वी म्हणजे १८४२ साली ऑस्ट्रीयाचे भौतिकशास्त्रज्ञ ख्रिश्चन डॉप्लर यांनी 'डॉप्लर इफेक्ट' चा शोध लावला आणि त्यातून साकारलेली यंत्रणा म्हणजे डॉप्लर रडार! इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी ढगांकडे सोडत ढगांचा एक्स रे काढणारी इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा म्हणजे एक्स बँड डॉप्लर रडार होय. बोटाच्या पेराएवढ्या आकारमान असलेल्या भागातील बाष्प, पाणी व बर्फ कण यांची इंत्यंभूत व अचूक माहिती 'एक्स बॅंड डॉप्लर रडार' देते. परिणामी ढगात एकूण किती पाणी आहे (टोटल लिक्विड वॉटर कंटेट: टिएलडब्लूसी) याची माहिती आपल्याला सहज मिळते. मग पाऊस किती, कसा, कधी होईल व ढगातले पाणी संपून थांबेल हे सहज समजते. इतके साधे सरळ विज्ञान आहे.

यामुळेच अक्षांश-रेखांशानुसार किती वाजता किती पाऊस आपल्या डोक्यावर पडेल हे खात्रीशीर सांगणारी जगभर वापरली जाणारी अद्यावत यंत्रणा म्हणून एक्स बँड डॉप्लर रडारचा नावलौकिक आहे. इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम म्हणजे पीएलसी, स्काडा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आदींच्या वापराने  वारा व तापमान या माहिती बरोबर सुयोग्य विश्लेषणाने आज हे शक्य झाले आहे. सर्वसामान्यपणे ५०० किलोमीटर परीघ एवढी रेंज असलेल्या एका डॉप्लर रडारची किंमत ४० कोटी रुपये इतकी असते. यामुळेच 'एक्स बँड डॉप्लर रडार' हे अत्यंत किफायतशीर व वेगवान जीवनरक्षक यंत्र व तंत्र आहे. घटना घडण्याच्या आधी तसेच घटना घडताना देखील, तातडीने ढगफुटी, महापूर, गारपीट, पाऊस, वादळवारा, दुष्काळ, धुके, उष्णता व थंडीची लाट, मेघगर्जनांसह पाऊस, चक्रीवादळ तसेच वातावरण बदल यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती टाळण्यासाठी माहितीचे पृथक्करण एक्स बँड डॉप्लर रडार करते. शेतीचे नुकसान टाळणे यामुळे शक्य होते. हवामान माहिती व अचूक अलर्ट आठतास आधीपर्यंत देणे हे यामुळे जगभर शक्य बनले आहे. शेती व उद्योगाचे संभाव्य नुकसान टाळण्यास जगभर वापरात येणारी अद्यावत व स्वदेशी यंत्रणा आता भारतात उपलब्ध आहे. उपयुक्त व खात्रीशीर यंत्रणा अशी एक्स बँड डॉप्लर रडारची ख्याती आहे.

भारतात एक्स बँड डॉप्लर रडार!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहितासाठी एका शास्त्रज्ञाने केलेल्या ‘राष्ट्रीय एक्स बँड डॉप्लर रडार नेटवर्क'च्या मागणीची गांभिर्याने दखल घेतली व कार्यवाहीचे आदेश दिलेत, हे अभिमानास्पद आहे. राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनासह जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्णच आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करीत जनतेच्या मोबाईलवर थेट सतर्कता संदेश पाठविण्यासाठी देखील 'राष्ट्रीय एक्स बँड डॉप्लर रडार नेटवर्क'ची आवश्यकता आहे, हे विज्ञान-तंत्रज्ञान प्रशासन जाणून आहे. यामुळेच देशात सर्वसामान्य शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती देण्यासाठी सर्व राज्यांत 'एक्स बँड डॉप्लर रडार' बसवण्याचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत.परीणाम स्वरूप २०१७ पासून आजपर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये एकंदर १३ डॉप्लर रडार स्थापन करण्यात आले आहेत.

भारतात उपलब्ध ३७ डॉप्लर रडारची संख्या वाढवून लवकरच ७२ होईल. २०१७ सालापासून तामिळनाडू, उत्तराखंड, दिल्ली, लद्दाख, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर असे नव्या १० एक्स बँड डॉप्लर रडार बसविले गेलेत.

महाराष्ट्रात रडारची स्थिती काय?

शेतकऱ्यांना मदत‌ व्हावी यासाठी ५५,६७३ चौरस किलोमीटर हिमाचल प्रदेश क्षेत्रफळ असलेल्या राज्यात तीन आणि जम्मू-काश्मीर मध्ये दोन एक्स बँड डॉप्लर रडार कार्यरत आहेत. हिमाचल प्रदेशच्या साडेपाचपट म्हणजे ३,०७,७१३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या महाराष्ट्रात मुंबई वेरावली येथे मात्र ३१ डिसेंबर २०२१ रोजी एक्स बँड (८ ते १२ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी) ऐवजी मोबाईल व सॅटेलाईट सिग्नलला अडथळा निर्माण होऊ शकेल अशा कमी फ्रिक्वेन्सीचे म्हणजे सी बँड (४ ते ८ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी) डॉप्लर रडार बसविले गेले आहे.

रडार कव्हरेज नसल्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. अत्यंत तातडीने एक्स बँड डॉप्लर रडार बसवून ते टाळणे शक्य आहे. आजमितीला कोकण किनारपट्टीसाठी गोवा व मुंबई, विदर्भासाठी नागपूर तर पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर व महाबळेश्वर येथे अशा चार रडार यंत्रणा महाराष्ट्रात आहेत. याशिवाय मंजूरी मिळालेले चार एक्स बॅंड रडार एकट्या मुंबईसाठी लवकरच दाखल होत आहे. यामुळे महाराष्ट्रात ही संख्या वाढून आठ होईल. सह्याद्री पर्वतरांगामुळे मुंबईतील रडारचा उर्वरित महाराष्ट्राला उपयोग नाही हे सत्य आहे. उत्तर महाराष्ट्रात एक्स बँड डॉप्लर रडार बसविल्यास महाराष्ट्र व गुजरातच्या शेतकऱ्यांना देखील फायदा होईल.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंचीवरील चांदवड तालुक्यातील चंद्रेश्वर डोंगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. चंद्रेश्वर डोंगरावर उंचीवरील ठिकाणी रडारसाठी लागणार अखंड विद्युत पुरवठा येथे शक्य आहे. येथून रडारद्वारे खान्देश आणि दक्खन या दोन्ही प्रदेशावर देखरेख शक्य आहे. तसेच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ३ वरून मोबाइल रडार वाहतूक सुलभपणे शक्य आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी चांदवड तालुक्यातील येथील चंद्रेश्वर डोंगरावर डॉप्लर रडार बसविणे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल. जनहितासाठी मराठवाड्यासाठी औरंगाबाद येथील सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी गावाच्या अजिंठा लेणी जवळ बौद्धलेण्यांजवळील उंच भागात एक्स बँड डॉप्लर रडार बसविल्यासाठी शेतकरी श्री. अंबांदास लोखंडे यांनी आपली जागा देऊ केली आहे. ही दोन्ही ठिकाणे वैज्ञानिकदृष्टीने सुयोग्य आहेत.

राष्ट्रीय एक्स बँड डॉप्लर रडार नेटवर्क!

डॉप्लर रडारच्या परिघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कुठे कुठे होणार ढग वाऱ्यावर स्वार होत कोणत्या दिशेला जात आहेत याचे चित्र स्पष्ट होते. किमान एक तास आधी १०० टक्के खात्रीपूर्वक अचूक सांगता येते ज्यामुळे शेतीनुकसान टाळण्यासाठी ही यंत्रणा जगभरात देवदूत ठरली आहे.

विशेष म्हणजे मोठा निधी देत जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) ने आशियाखंडातील देशांत होणाऱ्या 'ढगफुटीं'चा सहा तास आगाऊ 'अलर्ट' देण्याची जबाबदारी 'नोडल एजन्सी' या नात्याने भारताकडे दिली आहे. देशात 'फ्लॅशफ्लड (ढगफुटी) निर्देशन यंत्रणा (एफएफजीएस)' उभारल्या गेल्या आहेत. आशियातील इतर देशांतील नागरिकांना ढगफुटी होण्याआधी सुचना अहोरात्र देत भारत मदत करतो आहे. इतर देशांना होण्याआधी 'फ्लॅश फ्लड म्हणजे ढगफुटीचा अलर्ट' देऊन नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी दाखविली जाणारी तत्परता महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वाटेलाही आली तर सोन्याहून पिवळे भविष्य असलेली झळाळी महाराष्ट्रातील शेतकरी अनुभवेल.

शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळवून देत तिचा पिकनियोजनासाठी एक्स बँड डॉप्लर रडारचा वापर करणाऱ्या देशांत अमेरिका, जपान, इस्राइल, तैवान, दक्षिण कोरिया, चीन, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, कॅनडा, ब्राझील, अर्जेंटिना, इटली, स्पेन, रशिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, मेक्सिको, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती अशा जगभरातील जवळपास सर्वच देशांचा समावेश होतो. अशावेळी 'राष्ट्रीय एक्स बँड डॉप्लर रडार नेटवर्क'चा महाराष्ट्र देखील भाग होवो! 'अंदाजे नव्हे तर अचूक हवामान माहिती' मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या उद्योगधंद्यांची भरभराट होवो, घरात सुख-संपन्नता येवो हीच प्रार्थना!

 प्रा. किरणकुमार जोहरे(आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ आणि हवामान शास्त्रज्ञ)संपर्क :9168981939,  ई-मेल : kirankumarjohare2022@gmail.com

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजशेतकरीमोसमी पाऊस