खरंतर 'एल निनो' चे 'ला नीना' मध्ये रूपांतर आणि परत ‘ला नीना’ चे काही कालावधीनंतर एल निनो मध्ये रूपांतर ही आलटून पालटून घडणारी नैसर्गिक प्रक्रिया होय. हे पृथ्वीवर सातत्याने कमी-अधिक तीव्रतेने होत असते. पृथ्वीवरील सागरी प्रवाहांचा सूर्यावर घडामोडींशी देखील संबंध आहे आणि याबाबत अधिक खोलवर अभ्यास होणे गरजेचे आहेत. असे असले तरी अधिकृत यंत्रणेतील काही संशोधक सूर्याचा आणि मान्सूनचा काहीही संबंध नाही, अशी अंधश्रद्धा बाळगत आपली संशोधन व्याख्याने देतात. तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होत असेल याची कल्पना शेतकरी करू शकतात.
नेमके काय घडते आहे?थंड पाणी हे जास्त घनता किंवा वजन जड असते, तर गरम पाणी तुलनेने कमी घनता किंवा वजन हलके असते. जड व थंड पाणी (तसेच हवा देखील) हे नेहमी गरम व हलक्या पाण्याच्या दिशेने वाहू लागते व पाणी तसेच हवेत प्रवाह निर्माण होतात. दिवस-रात्र, तसेच पृथ्वीचा कललेला आस यामुळे हजारो नव्हे तर लाखो वर्षांपासून ही नैसर्गिक प्रक्रिया सुरू आहे. सूर्याच्या उष्णतेने पाणी व जमीन तापते व थंड होते. पाणी उशीरा तापते व उशीरा थंड होते तर तुलनेत जमीन लवकर तापते व लवकर थंड होते.
काय आहे 'एल निनो'? ‘एल् निनो’ हा स्पॅनिश शब्द आहे. एल निनो हे ‘ख्रिस्ताचा मुलगा’असे मच्छिमारांनी दिलेले स्पॅनिश नाव होय. ‘एल निनो’हा पेरूच्या पश्चिम किनारपट्टीपासून २०० किलोमीटर दूर उत्तरे कडून दक्षिण दिशेला वाहणारा व विषववृत्ताला समांतर होत जाणारा उष्ण पाण्याचा सागरी प्रवाह आहे. 'ला नीना' देखील तेथेच निर्माण होतो. सर्वप्रथम १९२३ साली सर गिलबर्ट थॉमस वॉल्कर यांनी एल् निनोचा अभ्यास केला.
भारतापासून पेरू देश हा एकरेषीय अंतर मोजले तर सुमारे १७ हजार किलोमीटर इतका दूर आहे. ताशी ४० किलोमीटर या वेगाने प्रवास केला, तर वाऱ्यांना आणि पाण्याच्या थेंबाना थांबायला विरोध न होता सरळ यावे लागले असे गृहित धरले, तरी दिवस रात्र असा प्रवास करीत कुठलाही बदल न होता ४२५ तास म्हणजे सुमारे १८ दिवस इतका कालावधी घेत भारतभुमीवर पोहचावे लागेल असे अग्निदिव्य आहे. जे समुद्रात खरोखर घडत नाही असे गृहित धरून शास्त्रीय निष्कर्ष काढणे कितपत योग्य आहे?
'ला नीना' म्हणजे काय? ‘एल निनो’ चा प्रभाव संपला कि समुद्रात तयार होणारा थंड प्रवाह म्हणजे ‘ला निना’ होय. ‘ला निना’ हा देखील स्पॅनिश शब्द असून याचा अर्थ ‘लहान मुलगी’ असा होतो. ‘ला नीना’ प्रक्रियेत प्रशांत महासागराचे तापमान घटते.
किकुलॉजी भाग- २६: यंदा एप्रिल व मे असणार हॉट कारण?
'एल निनो'चा एवढी भीती का पसरवली जाते? भारताबाबत बोलायचे झाले तर प्रशांत महासागरात पूर्वेला जाणारा ‘एल निनो’ हा पाण्याचा प्रवाह जास्त गरम झाला की बाष्पीभवन जास्त होते. बाष्पीभवन जास्त झाल्याने पाऊस आधीच समुद्रात कोसळून जातो. पाऊस आधीच कोसळल्यामुळे भारतात मॉन्सून खराब होत असावा अशा गृहितकावर भारतातील मान्सूनची भाकिते दिली जातात व दरवर्षी वृत्तपत्रातून मांडलेल्या मतांमुळे शेतकरी संभ्रमित होतो. किंवा जाणून बुजून संभ्रम निर्माण करीत आर्थिक फायदा उचलण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अज्ञात यंत्रणा काम करते की काय अशी शंका येण्यास जागा आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करता इतरही मते मांडली जातात. ‘एल निनो’ चा प्रभाव वाढला असल्याने पेरू, इक्वेडोर या देशांत नऊ महिने किंवा त्याहून अधिक काळ पाऊस कोसळून पूरसंकट येण्याचा धोका; तर इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियात दुष्काळ पडून ठिकठिकाणी आगी लागण्याचा धोका असल्याचे मानले जाते. मात्र प्रत्येक वेळी असेच घडलेले नाही. ही पण एक गंमत आहे.
जेव्हा 'एल निनो' भारतात, ऑस्ट्रेलियात दुष्काळ आणि वणव्यांची स्थिती वाढवतो, त्याचवेळी दक्षिण अमेरिकेला पाऊस आणि भरपूर समुद्रजीवांची रेलचेल करतो आणि अमेरिकेला भरपूर आर्थिक फायदा होतो म्हणून अमेरीकेत काही लोक 'एल निनो' चे स्वागत करतात.
तर 'ला नीना' येतो तेव्हा भारतात भरपूर पाऊस आणि दक्षिण अमेरीकेला प्रचंड बोचरी थंडी देतात असे ही गृहित धरले जाते, पण याबाबतही प्रत्येक वेळी असेच घडलेले नाही, ही पण गंमत होय.
बरं 'ला निना'चे हेच थंड वारे पुढे वरच्या दिशेने म्हणजे उत्तर अमेरिकेत पोहोचून बर्फमय करतात असे मानले जाते, पण दरवेळी असेही घडत नाही.
या शिवाय 'एल निनो' व 'ला नीना' या दोन्हीही सागरी प्रवाहांची एकत्र तापमान फरकामधील बेरीज-वजाबाकी शून्य होते. मग 'एल निनो' आणि 'ला नीना' वरून आग, पाऊस, बर्फवृष्टी एखाद्या भागात अशीच होईल असे निष्कर्ष काढत वेळ घालविणे हे निव्वळ काळाचा अपव्यय आहे असे देखील मत मांडले जाते. विशेष म्हणजे १९२३ ला शोध लागला तरीही भारताच्या उदार आर्थिक धोरणांनंतरच १९९० च्या दशकापासून 'एल निनो' व 'ला निना' च्या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या हा निव्वळ योगायोग मानावा की शेतकऱ्यांना वेठीस धरून आंतरराष्ट्रीय कृषी अर्थकारण सुरू झाले याबाबत शोध आवश्यक आहे.
खरं काय? खरंतर 'एल निनो'चा 'ला नीना' झाला तरी दुष्काळ दूर करणारा धोधो पाऊस होईल, हे सांगणे चुकीचे व आत्मघाती धाडसाचे ठरेल असे 'लॉजिकली' स्पष्ट आहे. त्यामुळे वास्तव सांगत जनतेला पाणी वाचविण्यासाठी जनजागृती, ग्रे पाईपलाईन द्वारा 'रिसायकल वॉटर' चार शेती, उद्योग, शौचालय आदीसाठी वापर करणे आवश्यक आहे. चांगला पाऊस पडेल अशी खोटी आश्वासने ही आपत्ती निर्माण करणारी ठरू शकतील हे वास्तव प्रशासन व राजकिय नेतृत्वाने लक्षात घ्यायला हवे.
जागतिक १८ टक्के लोकसंख्येसाठी भारतात जागतिक ४ टक्के पेयजल उपलब्ध असतानाच जलनियोजनासाठी लष्कर पाचारण करणे आवश्यक ठरेल.
सध्याच्या परिस्थितीत 'एल निनो' व 'ला नीना' याबाबत पुढील महत्वाचे 'सप्तपदी शास्त्रीय' मुद्दे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेने समजून घेणे कृषी व आर्थिक नियोजनासाठी गरजेचे आहे.
'एल निनो-ला नीना' शास्रीय सप्तपदी!१. 'एल निनो' चे 'ला नीना'त रूपांतर होण्याची शक्यता काही अभ्यासक कल्पनाविलास करीत वर्तवत आहेत असे स्पष्ट दिसते. जर तसे नसेल तर यासाठी कोणते मापदंड व घटक त्यांनी वापरले व यामागचा शास्त्रीय आधार काय? याबाबत सागरी प्रवाहात कसे व किती तापमान बदल किती सागरी क्षेत्रफळावर होत आहेत? ते कोणी व कसे मोजले याबाबत शास्त्रीय माहिती भिंती न पसरविता राष्ट्रीय हित व कृषी-जनहितासाठी सामान्य जनतेला स्पष्ट केली तर बरे होईल.
२. ‘एल निनो’ची (किंवा 'ला नीना'ची) तीव्रता, सागरी प्रवाहाच्या तापमानात फरक व मॉन्सूनचे बळ यांचा आलेख समजून घेतल्यास त्याचा काही एक संबंध नाही हे वैज्ञानिक सत्य कळते. 'एल निनो’आणि भारतीय मॉन्सूनचे पर्जन्यमान किंवा दुष्काळ यांच्यातला परस्परसंबंध एकास-एक असा तर मुळीच नाही. त्यामुळे 'एल निनो' हा 'ला नीना' बनला तरी धोधो पाऊस होईल हे सांगणे अशास्त्रीय व अतार्किक आहे.
३. सन २००० पासून एल निनो २००२, २००४, २००६, २००९ आणि २०१५ साली अवतरला. यात २००६ साली एल निनो असतांना देखील चांगला पाऊस झाला. भारतात गेल्या ११३ वर्षांच्या काळात फक्त १३ वर्षं सरासरीपेक्षा जास्त पावसाची ठरली आहेत. २०१९ च्या आधीच्या २० वर्षांत एकही सरासरीपेक्षा जास्त पावसाचे वर्ष अवतरलेले नाही हे शास्त्रीय वास्तव समजून घेणे धोरणे आखताना अत्यंत महत्वाचे आहे.
४. आतापर्यंत जितक्या वेळा 'एल निनो' तयार झाला त्यातील निम्म्या वेळा त्याचा मॉन्सूनवर काडीचा ही प्रभाव 'एल निनो'ने मॉन्सूनवर दाखविलेला नाही हे वैज्ञानिक सत्य आहे हे 'एल निनो'चा बागुलबुवा निर्माण करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. उलट १९९७ यावर्षी एल निनो सर्वात जास्त उष्ण होता आणि भारतात दुष्काळ पडणार अशी भाकिते फोल ठरलीत व उलट १९९७ साली मॉन्सून भरभरून चांगला झाला. १९९७-९८ मध्ये एल् निनो सर्वात उष्ण असतांना (+०.२ अंश सेल्सिअस सागरी प्रवाहाच्या तापमानात फरक) देखील भारतातील मॉन्सून चांगला बरसला होता.
५. 'एल निनो' सारखे नव्हे तर त्यापेक्षा अनेकदा कमी तर कधी तीव्र बदल घडणारे असे उष्ण सागरी प्रवाह आणि 'ला नीना’ बाबतही असेच थंड सागरी प्रवाह यांची किमान एक हजारापेक्षा जास्त सागरी प्रवाहसंख्या पृथ्वीवर ज्ञान आहेत. त्या सर्वांचा विचार सोडून केवळ 'एल निनो' किंवा 'ला नीना' सारख्या सागरी प्रवाहाला धरून ठेऊन व महत्व देत मान्सूनच्या पावसाळ्यात विभागनिहाय निष्कर्ष जाहीर करणे हे अयोग्य ठरणारे व अशास्त्रीय आहे.
६. भारतातील शेतीपैकी ६० टक्के शेती हि थेट मॉन्सूनच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे केवळ एकटक्का पाऊस जरी कमी झाला तरी भारतात ०.३५ टक्के इतका जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) कमी होतो. यामुळे शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. शेतीचे भारतीय जीडीपी मध्ये थेट योगदान १६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर शेतमालावर प्रकिया करीत त्यांचे एक्सपोर्ट करीत भारतीय जीडीपी मध्ये शेतकरी योगदान कितीतरी पट वाढते जे जाणून बुजून एकत्र लपविले जाते किंवा त्याची दखल घेतली जात नाही तर अनेकदा ते नाकारले जाते हे समजून घेणे गरजेचे आहे.
७. 'मॉन्सून' या प्रचंड मोठ्या असलेल्या ‘सिस्टीम’ पुढे तुलनेने अत्यंत लहान ‘एल निनो’ किंवा ‘ला नीना’ हे खरोखर प्रभाव पडतात का याचा शास्त्रीय अभ्यास केला तर लक्षात येते की, मान्सून व ‘एल निनो’ किंवा 'ला निना' च्या बातम्यांची पेरणी केली जाते. शेतकरी व सामान्य जनतेची तसेच राजकिय नेतृत्वाची जाणीवपूर्वक दिशाभुल केली जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्नधान्य व आर्थिक कृषी लाभ मिळविण्यासाठी काही अज्ञात शक्ती काम करीत असाव्यात अशी स्पष्ट शंका येण्यास वाव आहे. तेव्हा शास्त्रीय विश्लेषण समजून घेत सध्या तरी 'एल निनो' व 'ला नीना' घ्या बातम्या वाचत मेंदूत खिचडी निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. शेतकरी हा भोलानाथ आहे. पाण्याची उपलब्धता व आपल्या पुर्वानुभवानुसार डोके शांत ठेवून नियोजन व निर्णय केल्यास शेतकऱ्यांच्या घराघरात आर्थिक दुष्काळाच्या झळा नक्कीच कमी होतील व राष्ट्रीय कृषी क्षेत्रात मजबूती येईल हा विश्वास आहे. १७ हजार किलोमीटर वर घडणाऱ्या घटना भारतावर प्रभाव टाकतात असा कल्पनाविलास केला जातो हे आता लक्षात आले असेल. मग 'एल निनो'चा 'ला नीना' होत खरंच पाऊस पडेल का 'भोलानाथ'? याच्या 'उत्तर झळा' लवकरच आपण सर्व अनुभवणार आहोत.
- प्रा. किरणकुमार जोहरेआंतरराष्ट्रीय हवामान संशोधक,ढगफुटी तज्ज्ञ, कृषी व तंत्रज्ञान अभ्यासक, नाशिक ४२२००९संपर्क : 9168981939, 9970368009, ईमेल: kirankumarjohare2022@gmail.com
(लेखक भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) चे माजी हवामान शास्त्रज्ञ आहेत. शेतकऱ्यांसाठी गेल्या १८ वर्षापासून चालवित असलेल्या 'अंदाज नव्हे माहिती!' या विनामोबदला तसेच विनाअनुदानित जनहित राष्ट्रीय हवामान माहिती व अलर्ट सेवेचे प्रणेते आहेत.)