Join us

किकुलॉजी: जागतिक हवामान दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे ‘या’ बुस्टरडोस'ची गरज!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 2:19 PM

(किकुलॉजी, भाग २४): २३ मार्च २०२४ जागतिक हवामान दिन विशेष. शेतकरी बांधवांनी तंत्रज्ञान सजग व्हावे यासाठीचे हे सदर.

दुष्काळाच्या तप्त झळा, गारपीट, ढगफुटी आणि मान्सून पॅटर्न लक्षणीय बदलल्याने केवळ पाऊसच नाही तर शेतकऱ्यांच्या ङोळयातून देखील बरसणारे अश्रू ही पाण्याची विविध रुपे आहेत. पृथ्वीवरील ८ अब्ज लोकसंख्येतील एकतृतीयांश जनता दररोज उपाशी पोटी झोपत आहे. लोकांना जगविणारा शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि त्याबाबत आपल्या संवेदना बोथट होत आहेत की काय अशी परिस्थिती आहे. भरमसाठ रासायनिक खतांचा वापर व परिणामी बाष्पीभवनाचा बदललेला दर, यामुळे कॅन्सर घरोघरी पोहचत आहे. बदलता मान्सून पॅटर्न हे आजचे वास्तव आहे. शेती बरोबर उध्वस्त होत असणारी अर्थव्यवस्था आणि भुकेल्या पोटांमुळे वाढत असलेली गुन्हेगारी हे पृथ्वीवरील १९३ देशातले सत्य आहे. आपल्या प्रत्येकाची अगदी लहानशी मात्र सकारात्मक कृती, ठोस व कठोर धोरणात्मक निर्णय अंमलबजावणी हे एकंदर मानवी सभ्यता व संस्कृती या वसुंधरेवर वाचवू शकेल हे अंतिम सत्य आहे.

२३ मार्च २०२४ हा १५० वा जागतिक हवामान दिन साजरा होत आहे. मानवजातीपुढे अस्तित्व टिकविण्यासाठी अन्नसुरक्षा आणि हवामान बदल या सर्वात महत्त्वाच्या समस्यांवर एकत्रपणे 'वसुधैव कुटुंबकम' धोरणाने उपाययोजना करण्याची गरज इंटरपोलने गेल्या वर्षी अलर्ट देत व्यक्त केली आहे. हवामान आणि हवामान बदलांच्या माहितीबाबत सजगतेच्या उद्देशाने जागतिक हवामान संघटननेने (WMO) १९५० मध्ये जागतिक हवामान दिनाची सुरूवात केली होती. भविष्यात पुढिल पिढ्यांसाठी दररोजचे आणि दीर्घकालीन हवामान आणि पाणी यांची परिस्थिती कशी असेल याची चिंता व उपाययोजनेसाठी कृतीशील आराखडा बनविण्याची गरज व्यक्त करीत हा जागतिक हवामान दिन साजरा होत आहे.

‘ॲट द फ्रंटलाइन ऑफ क्लायमेट ॲक्शन’(At the Frontline of Climate Action) म्हणजे ‘हवामान कृतीच्या अग्रभागी’ ही थीम घेऊन २३ मार्च २०२४ रोजी यंदाचा 'जागतिक हवामान दिन' पृथ्वीवर साजरा होत आहे. विशेषत: 'फ्रंटलाइन' हा शब्द लढाई किंवा संघर्षात अग्रगण्य स्थानाचा संदर्भ देतो. हवामान बदलांशी संघर्ष करतांना कृती व प्रयत्नांच्या अग्रभागी असणे गरजेचे आहे हे यातून सुचित होते.

हवामान बदलांशी लढताना आपण आज अशा आघाडीच्या सीमेवर पोहचलो आहोत की मानवी सभ्यतेच्या अस्तित्वाच्या या लढाईत आता केवळ पोकळ पोपटपंची किंवा ढोल नगारे वाजवून आपण हे युद्ध जिंकणार नाही. थोडक्यात आता प्रत्यक्ष कृती करीत असलेल्या नैसर्गिक व अनैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर आवश्यकतेनुसार जपून करणे आवश्यक आहे.

नैसर्गिक रिसोर्सेस म्हणजे संसाधनांमध्ये हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, शेती, आपली हिरवीगार संपत असलेली वनराई आदी गोष्टींचा समावेश होतो. तर अनैसर्गिक संसाधनांमध्ये मानवाने एका ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेत रुपांतर करीत बनविलेली विद्युत शक्ती आदी होत. विद्युत ऊर्जेचा वापर आपण गरजेपुरता करणे आवश्यक आहे. कारण सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणू ऊर्जा आदीं तयार करण्यात देखील मर्यादा आहेत.

पृथ्वीवरील खनिजांमध्ये सोने, चांदी, तांबे आदींचा वापर वाढतो आहे. विविध मानवी उत्पादने ही बॉक्साइट, क्रोमाइट आदींचा वापर करून बनविली जातात. तर मानवी सभ्यतेची अपरीहार्य गरज नव्हे तर जणू प्राणवायू ठरत असलेल्या विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी व विद्युत ऊर्जा साठविण्यासाठी बॅटरीज बनवतांना वापरलेली जाणारी खनिजे म्हणजे लिथियम, कोबाल्ट आदी मिळवण्याकरिता देखील मर्यादा आहेत. 

बांधकाम, दळणवळणाचे रस्ते बनवण्यासाठी आवश्यक सिमेंट, हवाई वाहतूक, अंतराळ संशोधनासाठी व विकासासाठी आवश्यक उत्पादने, प्लास्टिक, रसायन, अस्त्र-शस्त्र निर्मितीसाठी गरजेचे रिसोर्सेस आदींना देखील पृथ्वीवर मर्यादा आहेत हे समजून आपली सुयोग्य कृती आवश्यक आहे.

गरज 'अकांउटीबीलिटी व रिस्पॉन्सिबिलीटी' ची! 'अकांउटीबीलिटी व रिस्पॉन्सिबिलीटी' म्हणजे आपल्या कृतीची जबाबदारी घेणे व उत्तरदायित्व स्वीकारणे होय.‌ भारतात चांद्रयान २ साठी ९७८ कोटी, तर शेतकऱ्यांना प्राधान्य देत मान्सून मिशन साठी १२०० कोटी इतका खर्च होतो हे वास्तव आहे. बोटाच्या पेरा एवढ्या भागात किती पाणी, बाष्प व बर्फ कण आहेत यावरून ढगाच्या एलडब्ल्यूसी म्हणजे लिक्विड वॉटर कन्टेन्टच्या माध्यमातून आपल्या डोक्यावर पुढच्या मिनिटात किती शतांश मिलीमिटर पाऊस होईल एवढे अचूक माहिती देणारे एक्स बॅड‌ डॉप्लर रडार तंत्रज्ञान भारतात उपलब्ध आहे.

बहाणे बनविणे, 'ब्लेम गेम' सुरू करीत टिका करणे किंवा चिखलफेक करणे तसेच कारणे आणि समस्यांची जंत्री पुढे ठेवत पळपुटा मार्ग अवलंबणे यातून आज पर्यंत कुठलीही समस्या सोडविली गेलेली नाही. उत्तरे शोधण्यावर लक्ष्य केंद्रीत करणे ही त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत कृती करणे हे जगातील प्रत्येक समस्येबरोबरच हवामान बदलांशी मुकाबल्यासाठी लढाई जिंकण्याचे सुत्र ठरेल. 

आता खासगी हवामान संस्थांकडून पैसे मोजत हवामान माहिती विकत घेऊ लागले आहे. तरी हवामान खात्याच्या अचूक माहितीशिवाय जगातील व देशातील अर्थव्यवस्था पुढे जाऊच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. हवामान शास्त्रज्ञ हेच देशाचे खरे सैन्य नव्हे तर शेतकऱ्यांचे भाग्यविधाते आहेत, कारण 'किंमत' मोजावी लागते. संशोधनाची दिशा सुधारण्यासाठी दिशा महत्वाची ठरते. संशोधनातील केवळ समस्या मांडण्यापेक्षा उत्तरे शोधण्यावर संशोधन अपरिहार्यपणे आवश्यक आहे. 

हवामान बदलांना गांभिर्याने घेणारे व प्राधान्यक्रम ठरविणारे नेतृत्व महत्वाचे ठरते. नेतृत्वाची भूमिका व धोरणात्मक बदलांसाठी समर्थक मिळविणे हे विज्ञान-तंत्रज्ञान संशोधन, औद्योगिक, कृषी, राजकिय व सामाजिक पातळीवर येत्या काळात जागतिक स्पर्धेत देखील खूप महत्वाचे ठरणार आहे.

किकुलॉजी: मिशन 'नेट झिरो २०५०' काय आहे? त्याचा शेतीला काय फायदा होणार?

एखाद्या देशातील‌ हवामान बदलांशी मुकाबला करण्याची जबाबदारी केवळ सरकार अथवा प्रशासनावर ढकलून देऊन जनता आपली जबाबदारी झटकून शकत नाही. तर हवामान बदल ही नैसर्गिक गोष्ट आहे जनतेचा पुरेसा सहभाग मिळत नाही त्यामुळे हवामान बदलांशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक कृती आराखड्यातील लक्ष्य किंवा ध्येय मर्यादित वेळेत गाठणे शक्य झालेले नाही असे म्हणत विविध देशांतील सरकारी व गैरसरकारी प्रशासकिय अधिकारी किंवा राजकिय नेतृत्व जबाबदारी झटकून आपल्या देशाला नष्ट करण्याचा आत्मघाती निर्णय घेऊ शकत नाही हे वास्तव स्वीकारणे गरजेचे आहे. 

हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी थेट कृती करणे किंवा उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी 'टीम वर्क' ने अंमलबजावणी करणे शक्य आहे. सक्रियपणे सहभागी होत घराघरातून जल, ऊर्जा बचत, प्रदूषण नियंत्रण असा आपल्या प्रत्येकाच्या लहानसहान कृती या आपल्या सर्वांच्याच अस्तित्वासाठी व सुखकर जीवनासाठी गरजेच्या आहेत.

'एआय' वाढवेल ४०% जीडीपी! भारतातील शेतकऱ्यांसह १ अब्ज ५० कोटी जनतेला 'अक्षांश रेखांशनुसार रियलटाईम कस्टमाईज वेदर इन्फॉर्मेशन'ची गरज आहे. एक्स बॅड डॉप्लर रडायला जोड देत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), पीएलसी (प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर) तसेच स्काडा (सुपरवाईजरी कंट्रोल अॅंड डेटा एक्वेझिशन) यांचा वापर करीत 'अंदाज नव्हे तर हवामानाची अचूक माहिती' भारतात आज शक्य आहे. एआय वापरत शेतीद्वारे निर्यात वाढवत भारतीय अर्थव्यवस्थेत ४० टक्क्यांवर जीडीपी वाढ खात्रीने शक्य आहे. 

एक व्यक्ती ५० कोटी वर्षे जगला तर जेवढा विचार करु शकतो तेवढा विचार एका सेकंदात करणारा १० पेट्याफ्लाॅपी म्हणजे १०,००,००,००,००,००,००,००० (एकावर सोळा शुन्य) क्षमतेचा खास हवामानासाठी वाहिलेला सुपर कॉम्प्युटर (एचपीसी) पुण्यात आहे. जगातील १० नंबरचा अद्यावत असलेल्या या सुपर कॉम्प्युटरची क्षमता आता पाच पट वाढविली जात आहे. महाराष्ट्र वगळता भारतात साधारणतः २५० किलोमीटर एवढा पल्ला असलेल्या व ढगांचे एक्स रे काढत इत्यंभूत माहिती देणाऱ्या एक्स बॅड डॉप्लर रडारचे जाळे कार्यक्षम होत वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे. 'अंदाज नव्हे तर अत्यंत अचूक माहिती' देशातील प्रत्येक नागरिकाला मोबाईल वर दर दहा सेकंदात अपडेट होत मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या सर्वांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)ची जोड ही अनेकपट कार्यक्षमता वाढविणारी ठरणार‌ आहे.

मानवी शरीर आणि समस्या सोडवण्यासाठी माहितीचे सुयोग्य विश्लेषण अत्यंत कमी वेळात करण्यासाठी व कृती करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यास आवश्यक बुद्धी यांना मर्यादा आहेत. परिणामी नैसर्गिक इंटेलिजन्स (एनआय) ला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ची साथ मिळाल्यास वेगवान व हळूवार होणारे हवामान बदलांच्या परिणामांची मुकाबला निर्णायक विजय मिळवून देण्यास लाभदायी उपाययोजना सिद्ध होईल. चैतन्यदायी भविष्यासाठी, भुतकाळ पासून सुरु असलेल्या हवामान बदलांशी मुकाबला करतांना, वर्तमानातच ठोस कृतीचा 'बुस्टरडोस' गरजेचा अलर्ट पुन्हा जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने मिळतो आहे.

प्रा. किरणकुमार जोहरेआंतरराष्ट्रीय हवामान संशोधक,ढगफुटी तज्ज्ञ, कृषी व तंत्रज्ञान अभ्यासक, नाशिक ४२२००९संपर्क : 9168981939, 9970368009, ईमेल: kirankumarjohare2022@gmail.com

(लेखक भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी (आयआयटीएम) चे माजी हवामान शास्त्रज्ञ आहेत, शेतकऱ्यांसाठी गेल्या १८ वर्षापासून चालवित असलेल्या 'अंदाज नव्हे माहिती!' या विनामोबदला तसेच विनाअनुदानित जनहित राष्ट्रीय हवामान माहिती व अलर्ट सेवेचे प्रणेते आहेत.)

टॅग्स :हवामानशेतकरीशेती क्षेत्र