Join us

किकुलॉजी: 'हामून' नंतर 'मिथिली' येतेय.. चला समजून घेऊ चक्रीवादळांचे शास्त्र !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 12:48 PM

(किकुलॉजी, भाग १३): शेतकऱ्यांनी हवामान तंत्रज्ञान सजग व्हावे, या उद्देशाने समग्र माहिती देणारे हे लेखन.

भारतीय उपखंडात एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण झाली आहेत. भारताने नामकरण केलेले 'तेज' हे चक्रीवादळ अरबी समुद्रात आणि दुसरे इराण या ‌देशाने नामकरण केलेले 'हामून' चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले. अशी एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती झाली आहे. मात्र तेज प्रमाणेच 'हामून' चक्रीवादळाचा कुठलाच धोका महाराष्ट्राला नाही.

 'हामून' (Hamoon) या फारसी शब्दाचा अर्थ  विस्तीर्ण पटांगण, वन किंवा जंगल असा होतो. 'हामून' हा शब्द ओसाड, उजाड वाळवंटासाठी देखील वापरला जातो. 

'हामून' नंतर 'मिथिली''हामून' चक्रीवादळानंतर मिधिली, मिचौंग, रेमल, आसना, दाना, फेंगल, शक्ति, महिना, सेयर, दितवाह अशी पुढील दहा चक्रीवादळांची नावे असतील. विशेष म्हणजे ही सर्व चक्रीवादळांची नावे साधारणतः जून २०२६ पर्यंत आपल्याला पाहायला मिळतील.

शेतकरी बांधवांनी वादळांचा वेग आणि त्यापासून होणारे नुकसान याबाबत माहिती करून घेतली, तर भविष्यात होणाऱ्या नुकसानीसाठी ते सावध राहू शकतील.

चक्रीवादळांचे विज्ञान आणि नुकसानवाऱ्याचा वेग ताशी १७ ते ३० किलोमीटर असल्यास लघुभार किंवा कमी दाबाचा पट्टा (लो प्रेशर),वाऱ्याचा वेग ताशी ३१ ते ३९ किलोमीटर असल्यास कमी दाब (डिप्रेशन),वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५९ किलोमीटर असल्यास खोल कमी दाबाचे क्षेत्र (डिप डिप्रेशन),वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ८९ किलोमीटर असल्यास चक्रीवादळ(सायक्लोनिक स्ट्रॉर्म),वाऱ्याचा वेग ताशी ९० ते ११९ किलोमीटर असल्यास तीव्र चक्रीवादळ (सिव्हीअर सायक्लोनिक स्ट्रॉर्म),वाऱ्याचा वेग ताशी १२० ते २२० किलोमीटर असल्यास अतितीव्र चक्रीवादळ (एक्सट्रीम सिव्हीअर सायक्लोनिक स्ट्रॉर्म), वाऱ्याचा वेग ताशी २२० किलोमीटरच्या पुढे असल्यास सुपर सायक्लोन, अशा चढत्या क्रमाने विध्वंस वाढत जाणाऱ्या वादळाच्या अवस्था आहेत.

जेव्हा वाऱ्याचा ताशी वेग हा ९० ते १२४ किलोमीटर इतका असतो तेव्हा अत्यंत नाममात्र नुकसान होते, जेव्हा हा ताशीवेग १२५ ते १६४ किलोमीटर तेव्हा लक्षात येण्याइतपत नुकसान होते.  

जेव्हा हा ताशीवेग १६५ ते २२४ किलोमीटर असते तेव्हा घरांचे छप्पर उडते व वीज पुरवठा खंडीत होतो. वाऱ्याचा वेग जेव्हा ताशी २२५ ते २७९ किलोमीटर असतो, तेव्हा मालमत्तेचे नुकसान होते.

ताशी २८० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त वेग असल्यास योग्य काळजी घेतली नाही, तर जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण होते असे चक्रीवादळांचे विज्ञान आहे.

प्रा. किरणकुमार जोहरेआंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ व हवामान संशोधक मो. नं. 9168981939, 9970368009kirankumarjohare2022@gmail.com

टॅग्स :चक्रीवादळहवामानशेतकरी