एकवेळ कर्ज काढून अथवा कोणाकडून उसने घेऊन देखील पैशाचे सोंग आणता येते. मात्र पाण्याचे जलसाठे उपलब्ध आहेत असे खोटे आकडे देऊन किंवा छान पाऊस होईल असे आशावादी व खोटे अंदाज जाहीर करून समस्यांवर कधीही दीर्घ पल्ल्याचे उपाय करणे अशक्य असते. तात्पुरती मलमपट्टी अनेकदा आजार गंभीर बनविते. त्यामुळे प्रशासनाच्या मर्यादा लक्षात घेणे आवश्यक आहे. "बरे बोलावे की खरे? की गप्प रहावे?" असे पर्याय हे जनतेच्या मानसिकतेवर व सत्य स्वीकारण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतात.४० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठे शिल्लक असतांनाच आणि जनता हंडे कळशा घेऊन शासकिय कार्यालयांमध्ये आंदोलने करत असल्याचे चित्र आपण आज भारतात पहातो आहे. खरे ऐकून न घेतल्याने आणि सुयोग्य व्यवस्थापनाची अंमलबजावणी न केल्याने जगातील व भारतातील अनेक राजकिय नेतृत्वावर बिकट परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. अशावेळी सत्य स्वीकारून सुयोग्य उपाययोजना केल्या तर नंतरचा 'वज्राघात' टाळता येऊ शकतो असे वाटते.
'वज्रपाता'ची जिज्ञासा! खरंतर आकाशात लखलखत चमकणाऱ्या आणि कानठळ्या बसतील असा गडगडाट करणाऱ्या जीवघेण्या, विध्वंसक व घातक वीजा वर्षानुवर्षे नव्हे तर मानवी सभ्यता लाखो वर्षांपासून पाहते आहे. बालपणापासून भीती, कुतुहल आणि जिज्ञासा अशा भावनांची सरमिसळ होती. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटियोरोलॉजी (आयआयटीएम), पुणे मध्ये आशिया खंडातील व जगातील विजांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली हे खरंतर माझे भाग्य समजतो.
किकुलॉजी भाग २४ : शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे ‘या’ बुस्टरडोसची गरज
सार्कच्या स्टॉर्म [SAARC –STORM (Severe Thunderstorms: Observation and Regional Modelling)] प्रोजेक्टची हवामान अभ्यासातील भुमिका महत्वाची आहे. भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मालद्विप, पाकिस्तान, अफगाणिस्थान या आठ देशांचे सरकार एकत्र येऊन साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कार्पोरेशन अर्थात सार्क ची [South Asian Association for Regional Cooperation (SAARC)] स्थापना ८ डिसेंबर १९८५ साली झाली. सार्कच्या स्टॉर्म प्रोजेक्ट अंतर्गत देशभर यामुळे अभ्यास दौरे करत अजेंड्यापलिकडचे विजांचे 'रंग' पाहता आलेत.
...उपायांवर भर! टाटा फाउंडेशन व फकीर मोहन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'एडव्हान्समेंट इन लायटिंग सायन्स अँड सेफ्टी मेंबर्स: मॉनिटरिंग, मेटीगेशन अॅंड लास्ट मागील कनेक्शन इन साऊथ एशिया' (International Conference on Advancements in Lightning Science and Safety Measures: Monitoring, Mitigation, and Last Mile Connection in South Asia (ALSASM2024)) या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन झाले आहे.ब्राझिल, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका, बांग्लादेश आदी देशांसह जगभरातील विविध देशांतील शास्त्रज्ञ, इस्त्रो, एअरफोर्स, डिफेन्स, एग्रीकल्चर, क्लायमेट चेंज आदींसह भारतातील देखील विविध विद्यापीठातील संशोधक पृथ्वीवरील बदलत्या हवामानाच्या प्रभावाला समजून उपाययोजना करण्यासाठी तीन दिवसीय या परिषदेत आपले संशोधन निष्कर्ष मांडलेत.
ओडिशा राज्यातील बालासोर येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या परिषदेत 'क्रॅकिंग द लायटिंग ड्राऊट कोड' (“Cracking the Lightning Drought Code”) हा विजांवरील ४५ वर्षाच्या अभ्यासावरुन आपला रिसर्च पेपर प्रेझेंट करण्याची संधी नुकतीच मिळाली. विजा आपले रंग बदलत आहेत हा संशोधनातून मांडलेला माझा विचारच अनेक संशोधकांसाठी नाविण्यपूर्ण होता. २०२३ पेक्षा २०२४ मध्ये कोरड्या दुष्काळाची तीव्रता जास्त राहू शकते असे आपल्या संशोधनातील प्राथमिक संशोधन निष्कर्ष जनहितासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मला मांडता आलेत. यावर प्रश्नोत्तरे तसेच उपचारात्मक गंभीर चर्चा देखील झाली.
यापुर्वीही २०१८ मध्ये दुष्काळाचा अलर्ट मला देता आला जो तंतोतंत खरा ठरला होता,ज्याबद्दल दैनिक 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले होते. दुष्काळ, ढगफुटी, भुकंप आदी हवामानाबाबतच्या संशोधनाची अमेरिकेसह जगभरातील १०० देशांनी दखल घेत गौरव केला आहे.
विजा रे विजा रे ! मान्सून पॅटर्न लक्षणीयरित्या बदलला आहे. पृथ्वीवर दर सेकंदाला ४४ विजा कोसळतात. तर भारतात १ कोटी ३० लाखांपेक्षा जास्त विजा दरवर्षी जमिनीवर पडतात व त्यांच्या दुप्पट हवेत विरून जातात हे वास्तव आहे. विजा चमकण्याचे व जमिनीवर पडण्याचे प्रमाण सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. लाल विजा दुष्काळाचा अलर्ट देतात तर निळ्या आणि पांढऱ्या शुभ्र विजा या येणाऱ्या चांगल्या मान्सूनची आगाऊ सुचना देतात. यंदा मात्र विजा 'रेड अलर्ट' देत आहेत, त्यामुळे घबराट न पसरविता जनहितासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर तातडीने जल व शेती उद्योग व्यवस्थापन आवश्यक आहे.
या शास्त्रीय कारणामुळे...आपल्या घरात २३० व्होल्ट आणि तीन ते पाच अँपिअर इतका एसी (अल्टरनेट करंट) विद्युत प्रवाहावर उपकरणे चालतात. मात्र विज चमकते तेव्हा (लाइटनिंग फ्लॅश) दरम्यान प्रवाह 30 हजार अँपिअरपेक्षा जास्त विद्युत धारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट( डीसी=डायरेक्ट करंट ) सेकंदाच्या हजाराव्या भागापेक्षा लहान कालावधीत एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून जातो. विजा चमकताना ३ ते १० कोटी पर्यंत व्होल्टेज वाढू शकते. लाइटनिंग फ्लॅशचे वॅटेज हे विद्युत् प्रवाहाने व्होल्टेज व करंट यांचा गुणाकार करून मोजले जाऊ शकते. ढोबळमानाने एक विज चमकते तेव्हा सुमारे एक ट्रिलियन वॅट्स (1 TW) म्हणजेच एकावर बारा शून्य इतकी ऊर्जा शक्ती तयार होते.
... म्हणून यंदा दुष्काळ! प्रकाशाची उर्जा ही प्रकाशाचा रंग ठरविते. दृश्य व अदृश्य अशा दोन्ही प्रकाशाचा अभ्यास केला तर अनेक गुपिते उलगडू शकतात. केवळ दृश्य विद्युतचुंबकीय वर्णपटात जितकी ऊर्जा जास्त तितकी प्रकाशाची कंप्रता म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असा सरळ भौतिकशास्त्रीय नियम आहे. याचाच अर्थ लाल प्रकाशाच्या तुलनेत जास्त फ्रिक्वेन्सी असलेला निळा प्रकाश हा प्रति फोटॉन जास्त ऊर्जा वाहून नेतो.विविध वातावरणीय घटकांचा परिणाम हा विजांवर होतो हे सत्य असले तरी काही गृहितके धरून जटिल गणितीय आकडेमोड केली तर लक्षात येते कि विजांचा निळा प्रकाश निर्माण तेव्हा होतो जेव्हा लाल प्रकाशापेक्षा १.३८ पट जास्त ऊर्जा विजांमध्ये असते. थोडक्यात जेव्हा वातावरणात जास्त अॅटमॉस्फीरीक इलेक्ट्रिसिटी एनर्जी असते, तेव्हा आपल्याला निळ्या आणि पांढऱ्या विजा चमकताना दिसतात तर जेव्हा कमी ऊर्जा असते तेव्हा विजा 'रेड सिग्नल' देतात. अर्थात इतरही अनेक बाबींचा विचार अभ्यास करतांना करणे गरजेचे असते. जेव्हा वातावरणात जास्त अस्थिरता व ऊर्जा असते तेव्हा पाऊस व मान्सून चांगला होतो. जितकी कमी ऊर्जा तितका कोरडा दुष्काळ तीव्र असे ढोबळमानाने वैज्ञानिक सत्य आहे. या आधीही असा इशारा देऊन यंत्रणेला सावध करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे.
...ही आहे उपायात्मक 'सप्तपदी'! १८ टक्के जागतिक लोकसंख्या असलेल्या भारताच्या वाटेला एकंदर जागतिक उपलब्ध पेयजलाच्या केवळ ४ टक्क्यांपेक्षा कमी पेयजल उपलब्ध आहे हे वास्तव आहे. जलप्रदूषण बाबत आपली बेफिकीर वृत्ती व समज बदलणे आवश्यक आहे.
२०२४ च्या संभाव्य कोरड्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तसेच दुष्काळाच्या तीव्रतेनुसार मोठ्याप्रमाणात होणारी स्थलांतर आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थापनात प्रश्न हाताळताना येणाऱ्या गंभीर अडचणी कमी करण्यासाठी भारतातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशात तातडीने जल व्यवसथापनाचे उपाय योजून अमलात आणणे गरजेचे आहे. यासाठी पुढील 'सप्तपदी' उपाय तातडीने आवश्यक व अपरिहार्य आहेत.
१. घरगुती जलवापर, शेतीसाठीपाणी, औद्योगिक जलवापर यावर तातडीने मर्यादा आणत कठोर पावले उचलणे अत्यावश्यक आहे.
२. टॉयलेट मधील फ्लश टॅंक वापर, व्हेहीकल वॉशिंग, रस्ते धुणे, नळ व पाईपलाईन गळती यातून होणारा ४० ते ६० टक्के पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गंभीरपणे उपाय गरजेचे आहेत. शाळा महाविद्यालये व घराघरातून मोठी सजगता, जनजागृती सर्व माध्यमातून व सोशल मिडियातून होणे जीवदान देणारे ठरेल.
३. शेतकऱ्यांनी उपलब्ध जलसाठे याचा स्वानुभवाने नियोजन व निर्णय घेत शेतात कमी पाण्यात तयार होणारी डाळी, कडधान्ये किंवा भरड धान्ये यांना प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना पुरेसे पाणी प्यायला मिळणे आवश्यक आहे
४. ऊस, तांदूळ आदी जास्त पाण्याची पिके घेणे आणि ती करपली कि मोठे नुकसान सहन करणे आपल्याला किती झेपणार आहे याचा सारासार विचार करूनच सुयोग्य निर्णय शेतकरी घेऊ शकतात. सुधारित सिंचन पद्धती पीक विविधता आणि रोटेशन पद्धतीने पिकांना आवश्यक तेवढेच पाणी देणे आवश्यक आहे.
५. भुगर्भातील जलसाठे रिचार्ज करण्यासाठी जमिनीत पाणी भरण्यासाठी आधी केलेले सिमेंटीकरण काढणे अथवा पर्यायी मार्ग शोधणे आवश्यक आहे.
६. इस्राईल प्रमाणे समुद्रजलाचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी तातडीने योजनांची अंमलबजावणी अपरिहार्य गरज आहे.
७. समन्वय, सहकार आणि समजूतदारपणाने एकमेकांना मदत हे धोरण घराघरातून, तालुका तालुक्यातून, आंतर-जिल्ह्यांतून, राज्याराज्यातून आणि राष्ट्राराष्ट्रांतून सजग होत राबविल्यास प्रशासकिय ताणतणाव, भीती, घबराट, अफवा टाळत आपण दुष्काळाचा मुकाबला निश्चितपणे करु शकू हा विश्वास आहे.
जनहितासाठी, अन्न सुरक्षितता व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी आपण संशोधनाचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर करीत आहे. या प्राथमिक वैज्ञानिक निष्कर्षानुसार, २०२४ च्या संभाव्य तीव्र व कोरड्या दुष्काळाची शक्यता पाहता नागरीकांनी घाबरून न जाता, पाणी बचत करीत प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच आपल्या अनुभवानुसार शेतीत काम पाण्यात होणाऱ्या पिकांची लागवड करावी असे घराघरातून पाण्याची बचत करण्यासाठी प्रयत्न करावा अशी कळकळीची विनंती आहे.
प्रा. किरणकुमार जोहरेआंतरराष्ट्रीय हवामान संशोधक,ढगफुटी तज्ज्ञ, कृषी व तंत्रज्ञान अभ्यासक, संपर्क : 9168981939, 9970368009, ईमेल: kirankumarjohare2022@gmail.com
(लेखक भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटरोलाॅजी (आयआयटीएम) चे माजी हवामान शास्त्रज्ञ आहेत, शेतकऱ्यांसाठी गेल्या १८ वर्षापासून चालवित असलेल्या 'अंदाज नव्हे माहिती!' या विनामोबदला तसेच विनाअनुदानित जनहित राष्ट्रीय हवामान माहिती व अलर्ट सेवेचे प्रणेते आहेत.)