Join us

किकुलॉजी: थंडीत पिकांना बसतोय ‘कोल्ड शॉक’, काय होऊ शकतात परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 12:45 PM

(किकुलॉजी, भाग २१): शेतकरी बांधवांनी तंत्रज्ञान सजग व्हावे यासाठीचे हे सदर.

मानवी शरीर म्हणजे बायोमॅकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणाच आहे. अचानक तापमानातील घट हे मानवी शरीर किंवा आपले पाळीव‌ प्राणी व पक्षीच नव्हे तर वनस्पती आणि शेतातील पिकांमध्ये विद्युत यंत्रणेत लक्षणीय बिघाड करीत सजीवांसाठी प्राणघातक ठरते, हे साधे सोपे विज्ञान व मानवी शरीराचे इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान आहे. कोल्ड स्ट्रोक'चा झटका हा शेतीचे नुकसान करीत राष्ट्रीय कृषी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करीत आहे. तसेच अन्नसुरक्षेसाठी धोका निर्माण होत आहे. परिणामी अन्नधान्याची टंचाई व महागाई वाढ यांचा थेट सामना सामान्य जनतेला करावा लागतो आहे. यामुळे तापमानातील बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच उपाय योजना आणि ठोस कृतीआराखडा बनवित तो राबविणे देखील आवश्यकता‌ आहे.

 काय घडते आहे? संपूर्ण भारतात थंडीची लाट आली आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, सिमला व देशाच्या राजधानीसह देशातील राज्याराज्याच्या ठिकाणी तापमानात मोठी घट झाली आहे. दिल्लीचे तापमान देखील आता ३ अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे. दिल्लीचा पारा ३ अंशाखाली घसरलेला असतांनाच आता संपूर्ण महाराष्ट्रभर थंडीचा कडाका जाणवतो आहे. महाराष्ट्राची वाटचाल शरीरातील रक्त व हाडे गोठविणाऱ्या थंडीकडे सध्या सुरू आहे. अशावेळी आपल्या स्वतः: बरोबरच आपली जनावरे आणि पिकांची काळजी‌ आवश्यक आहे. तापमानात कमी वेळात दहा अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात घसरण होते त्याला 'कोल्ड स्ट्रोक' असे म्हणतात.

 कशामुळे घडते आहे? हिमालयाला वळसा घालून भारतात शिरणारे आणि पश्चिमी वारे अशी ओळख असणारे वारे आता उत्तर महाराष्ट्रासह संपुर्ण महाराष्ट्रावर आपला थंडीचा टॉर्चर देत आहे. परिणामी थंडीच्या गारठ्यासह धुके आणि उत्तर भारतात हिमालयातून आलेल्या अचानक बाष्पयुक्त वाऱ्यामुळे काही भागात पाऊस तसेच गारपीट देखील झाली आहे.

 कसे असेल नजिकचे भविष्य? उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे. पाऱ्यातील घसरणीमुळे महाराष्ट्राला अशरक्षः हुडहुडी भरणार आहे; येत्या काळात थंडीच्या लाटेने 'द्राक्ष पंढरी' गोठतच नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीनुसार पारा ७ अंशाखाली घसरू शकतो. इतकेच नव्हे तर देव गोठून बर्फाची चादर देखील पहाता येईल. तसेच महाराष्ट्रात पावसासह गारपिट देखील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्यात भौगोलिक परिस्थितीनुसार विखुरलेल्या स्वरूपात होऊ शकते.

 महाराष्ट्राचे काय? महाराष्ट्रातील वातावरणात सध्या कोरडे असून हवेची आर्द्रता ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे, परिणामी हाडे गोठविणाऱ्या थंडीचा अनुभव, प्रचंड गारवा, दिवसाही बोचणारा थंडगार वारा जाणवेल. 'कोल्ड स्ट्रोक' च्या झटक्याने मोठ्या प्रमाणात लोकांच्या आजारापणात वाढ होते आहे. चढ उतार होत पुढील किमान २० दिवस महाराष्ट्रातील जनतेला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. ढोबळमानाने बदल होत महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा थंडीचा उतरता क्रम राहणार आहे.

नाशिक सह नागपूर, पुणे, मुंबई, नागपूर आदी ठिकाणी पारा ७ अंशाच्या खाली जाऊ शकेल. महाराष्ट्रातील विविध शहरात ‘रेकॉर्ड ब्रेक’ थंडी पुढील काही दिवसात पडल्याचे दिसून येईल. राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात तापमानात घट होणार आहे. यामध्ये मुंबईचा पारा १० अंशाच्या खाली तापमानात घसरू शकेल. तर नाशिक ७, पुणे ७, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती  ५, नागपूर, भंडारा, गडचिरोली ६, सांगली, सातारा, कोल्हापूर  ८ सेल्सिअस खाली जाऊ शकेल. मात्र असे असले तरी घाबरून न जाता आणि अफवा न पसरविता आवश्यक काळजी घ्यायला हवी.

किकुलॉजी भाग २०: पनामा कालवा कोरडा होतोय, त्याचा शेतीवर काय होणार परिणाम

 परिणाम काय? सुयोग्य काळजी न घेतल्यास मानवी तसेच आपल्या जनवरांच्या रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावल्याने रक्तदाब वाढतो तसेच रक्त गोठत अचानक हृदयविकाराचा म्हणजे 'हार्ट अॅटॅक'चा झटका बसू शकतो. तसेच अनेकदा हृदयासाठी 'कार्डियाक अरेस्ट' झटका बसून व्यक्ती अचानक गतप्राण होऊन शकते. 'कार्डियाक अरेस्ट' मध्ये हृदयाचे कार्य, श्वासोच्छवास आणि चेतना अचानक आणि अनपेक्षितपणे कमी होते. परिणामी सजीवांच्या शरीरातील इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा पशू पक्षांमधील हृदयाची विद्युत प्रणाली बिघडते तेव्हा हृदयाची धडधड अचानक थांबते. वनस्पतीं बाबत त्यांच्यातील जलवाहिन्यांमध्ये आकुंचन हे वनस्पती मधील इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा बिघडवून‌ टाकते. केळी, द्राक्ष आदी विविध प्रकारच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे.

 उपाय काय? उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा (वेस्टर्न डिस्टर्बन्स) थंडीचा 'रेड अलर्ट' महाराष्ट्रातील नागरीकांनी गांभीर्याने घेत  'हेल्थ अलर्ट'वर तातडीने कृती आवश्यक आहे. विशेषत: सर्दी-खोकला-ताप, सांधेवात, रक्तदाब, वयस्क नागरिक, गरोदर महिला, लहान मुलांनी तसेच मधुमेह, अस्तमा, हृदयविकार आदी रुग्ण नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी गरजेची आहे.

 शेतीवरील तसेच सजीवांच्या शरीरातील इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा कोलमडून टाकत विपरीत परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना करणे शक्य आहेत. 'कोल्ड स्ट्रोक' मध्ये अचानक तापमानातील होणारा फरक हा सजीव शरीराची यंत्रणा झेलू न शकल्याने जीवघेणा परिणाम घडतो. तापमान‌ नियंत्रणासाठी गरम पाणी पिणे, उबदार कपडे वापरणे, वेळेवर आहारविहार व औषधपाणी गरजेचे आहे. अचानक तापमान बदलाचा परिणाम टाळण्यासाठी मनुष्य, पाळीव जनावरे, पशूपक्षी तसेच वनस्पती व पिकांची काळजी घेणारी कृती करणे आवश्यक आहे.

🌱लोकमत ॲग्रो व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा⭐👇🏻https://chat.whatsapp.com/C4PI000UzoO6Nxvnhfn8q1

 थंडीच्या लाटेमुळे द्राक्षपंढरी गोठली असून उत्पादक धास्तावले आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांनी  घाबरून न जाता थंडीचा कडाका जास्त वाढल्यास कोल्ड स्ट्रोक पासून पिकांचे रक्षण करण्यासाठी पारंपरिक उपाय स्वानुभवाने करणे शक्य आहे. केळीच्या पिकांना गोनपाट किंवा बारदान गुंडाळणे तर शेतात पाणी भरत द्राक्ष पिकांची काळजी असे साधे उपाय आपल्या अनुभवानुसार करता येऊ शकते. पहाटे पडणाऱ्या दवबिंदूंमुळे द्राक्षबागांना धोका वाढतो. धुके व थंडीत होणारी वाढ आणि द्राक्षमणी फुटण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी सुयोग्य काळजी घेत द्राक्षबागेत शेकोट्या पेटवितात किंवा हॅलोजन बल्ब लावत, तर काही शेतकरी द्राक्षांना कागद किंवा कापड गुंडाळण्याचा उपाय करतात जो लाभ दायक ठरतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

 -प्रा. किरणकुमार जोहरे,आंतरराष्ट्रीय हवामान संशोधक,के.टी.एच.एम. कॉलेज, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग, नाशिक ,संपर्क : 9168981939, 9970368009,ईमेल: kirankumarjohare2022@gmail.com

टॅग्स :गारपीटहवामानपाऊसशेतीपीक व्यवस्थापन