अन्न सुरक्षा, निरोगी पर्यावरण, कॅन्सर विरहीत रसायने असलेली शेती आणि एकंदर मानव कल्याणासाठी मातीच्या गुणधर्मांचे महत्त्व पटवून देणारे संदेश पसरवणे या उद्देशाने २०१४ पासून दरवर्षी ५ डिसेंबर हा ‘जागतिक मृदा दिन’ म्हणून पाळला जातो. 'निरोगी माती, निरोगी ग्रह' (Healthy soil erosion, Healthy planet) हे २०२३ चे बोधवाक्य आहे. नुकत्याच झालेल्या मृदा दिनाच्या पार्श्वभूमीवर याबद्दल सविस्तर समजावून घेऊ.
माय माती!
जागतिक पातळीवर ३३ टक्के मृदा आधीच नापीक झालेली आहे. भारतातील १० राज्यांमध्ये वाळवंट झालेले म्हणजे नापीक होत चाललेले क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या ६५ टक्के इतके आहे. या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून, आपले नापिक जमिनीचे क्षेत्र ४५ संटक्के आहे. रासायनिक खताच्या अती वापराने मातीचा मुलायमपणा निघून गेला आहे. इतकेच नव्हे तर कार्सिनोजनिक (Carcinogenic) घटक असलेले कीटकनाशके माती व अन्नधान्यातून घरोघरी कॅन्सर पोहचवत आहे. परिणामी आरोग्यावरील राष्ट्रीय खर्च वाढत आहे. तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य खराब होत एकंदर वसुंधरा या सुंदर ग्रहावरील क्रयशक्ती घटत आहे. मृदा प्रदूषणामुळे वातावरणात वेगवान बदल घडून संपूर्ण पृथ्वीचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळेच मृदा संरक्षण गरजेचे आहे. 'निरोगी माती, निरोगी ग्रह' हे ब्रीदवाक्य यंदा यामुळेच घेण्यात येऊन जगभर जनजागृती व माय मातीशी प्रामाणिक राहण्याचे आवाहन केले जात आहे.
मृदा बदलतेय हवामान
हवामान आणि जमिनीतील मृदा किंवा माती यांचा घनिष्ठ संबंध आहे. मातीस पृथ्वीची त्वचा म्हणतात. मृदामध्ये वातावरणाच्या तुलनेत तीन पटीने अधिक कार्बन असते. हवामानातील पाऊस, वारा, सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता आदी घटकांचा जमिनीवर सतत प्रभाव पडत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात जमिनीची सुपीकता वेगवेगळी आढळते. सेंद्रिय कर्ब, आवश्यक अन्नद्रव्ये, जिवाणूंचे प्रमाण उपलब्ध ओलावा आणि योग्य सामू (पीएच) इत्यादी बाबींच्या योग्य प्रमाणावर मातीची सुपीकता अवलंबून असते. हवामानातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे जमिनींच्या गुणधर्मांवर परिणाम होतो. अशा वेळी मृदा परीक्षण करत किमान नत्र, स्फुरद आणि पालाश यांची तपासणी करणे शेतीसाठी योग्य ठरते.
रंग मातीचा, गंध मातीचा!
शेतकरी जाणतो की, मातीचा रंग वेगवेगळा असतो आणि गंध देखील! हवामानाच्या विविधतेनुसार विविधतापूर्ण मातीचे प्रकार शेत जमिनीत पहायला मिळतात. भारतात मुख्यतः पाच मातीचे प्रकार आहेत. काळी माती, तांबडी माती, नदीतून निघणारी जलोढ माती (Alluvial soil), डोंगराळ भागात आढळणारी लैटेराइट (Laterite) (बलुई) माती, वाळवंटातील वालुकामय माती (Desert soil) असे मातीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. याशिवाय शुष्क मृदा (Arid soils), लवण अथवा क्षारीय मृदा (Saline soils), पीटमय मृदा (Peaty soil) तथा जैव मृदा (Organic soils) व वन मृदा (Forest soils) असे देखील मातीचे प्रकार आहेत. 'मृदा विज्ञान' (Pedology) ही भूगोलाची एक प्रमुख शाखा आहे.
मान्सून पॅटर्न बदलाबरोबर शेतीत बदल हवा!
मान्सून पॅटर्न बदलाबरोबर शेतीत देखील खरीप व रब्बी पिकनियोजन व निवड करतांना अमुलाग्र बदल गरजेचा आहे. मान्सूनच्या बदलेल्या पॅटर्न मुळे होणार्या हवामान बदलाचा थेट परिणाम शेतीवर होतो आहे. देशात ८ हजार ७६० तासांत पडणारा पाऊस आता केवळ १०० तासांत पडत आहे. एकूण पडणारा पाऊस तेवढाच असला तरी तो कमी काळात होत असल्याने हे पाणी अडवणे, मुरविणे आणि त्याचा वापर करणे हे मोठे आव्हान आहे.
जास्त आणि कमी अशा दोन्ही प्रकारच्या पावसाचा जमीन सुपीकतेवर निरनिराळा प्रभाव पडतो. जमिनीतील कर्बाच्या ऱ्हासामुळे सुपीकतेचे मोठे नुकसान होते. कमी पाऊस आणि आवर्षण यामुळे सेंद्रिय कर्बाचे विघटन होऊन त्याचा ऱ्हास होतो. जास्त पावसाच्या परिस्थितीत हा सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना चिकटून पाण्यासोबत वाहून जातो. अचानक कमी वेळात जास्त कोसळलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात पिकाचे आणि शेतीचे नुकसान होत आहे. मातीचा कमी झालेला कस भरून काढणे हे शेतकऱ्यांपुढचे आव्हान आहे.
मातीला चक्रीवादळांचा धोका!
२०२३ मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा तिन्ही महिन्यात चक्रीवादळे आलीत. चैनई आणि आसपासच्या शहरात डीप डिप्रेशन मुळे ढगफुटी होत ३०० मिली मीटर पाऊस कोसळला. परिणामी भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. २०१९ सालापासून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुक्यांपैकी ३२५ तालुक्यांत परतीच्या पावसाने अभूतपूर्व नुकसान होत आले आहे.
महाराष्ट्रातील लागवडी खालील शेतीक्षेत्र १७५ लाख हेक्टर आहे. खरीप हंगामात १४१ लाख हेक्टर पेरा झाला. पैकी परतीच्या अतिरिक्त पावसाने महाराष्ट्रातील ९४ लाख हेक्टर पेक्षाही जास्त जमिनीवरील पिके उध्वस्त झालीत. २०१९ पासून २०२२ पर्यंत सातत्याने भारतात असंख्य ठिकाणी तर जमिनीतील माती देखील ढगफुटीच्या पावसाने वाहून गेली आहे. मराठवाडा हा ढगफुटीची प्रदेश बनला आहे परिणामी शेतीतील माती वाहून जात शेतीचे नुकसान होत आहे हे वास्तव आहे.
यंदा जून मध्ये येणारा मान्सून फेब्रुवारी व मार्च मध्येच बरसत जूनमध्ये गायब आला. पावसाचे एकूण दिवस कमी होऊन दुष्काळ व पावसातील खंड वाढत आहेत. याचा गंभीर आणि धोकादायक प्रभाव एकंदर माती व शेतीवर, शेतकऱ्यांवर होत आहे. पावसाची ही अनियमितता पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीतील ओलाव्यात घट निर्माण करीत नुकसान करीत आहे. पिकांना पाण्याचा आणि उपलब्ध स्वरूपातील अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा होत नसल्याने शेतीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होतो. तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे देखील काही प्रमाणात जमिनीची धूप होते.
गारपीट, पाऊस आणि वारा यामुळे जमिनीची धूप होते. कमी कालावधीत एकदम जास्त तीव्रतेने होणाऱ्या पावसामुळे सुपीक जमीन पाण्यासोबत वाहून जाते. जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहत्या पाण्याच्या वेगामुळे सतत सुपीक माती वाहून जात असते. याशिवाय शेती पद्धती, सिंचन, खतांच्या मात्रा, सेंद्रिय खतांचा अभाव, फवारणी, पेरणी मशागत, पीक पद्धती इत्यादींचा परिणाम मातीच्या गुणवत्तेवर होतो. भुगर्भातील पातळी अत्यंत भयानक पद्धतीने खालावल्याने भारतातील महाराष्ट्रासह सात राज्ये आणि तेथील शेतकरी अत्यंत हलाखीच्या अवस्थेत धैर्याने तोंड देत आहेत.
पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम माती
'कोको पीट' नावाने ओळखले जाणारे तंत्रज्ञान इस्त्राइल देशात मातीला पर्याय म्हणून वापरले जाते. भारतात देखील माती विरहीत शेती म्हणून याचा वापर आता वाढतो आहे. नारळाच्या झावळ्या व पोष्टीक खनिजद्रव्यांच्या मिश्रणातून कोको पीट बनवले जाते. राजस्थान मध्ये याच्या वापराने शेतकर्यांना मोठा आर्थिक फायदा होतो आहे.
शहरात सिमेंटचे जंगल असल्याने, मातीचा अभाव जाणवतो. त्याला पर्याय म्हणून कागदापासून कृत्रिम माती बनविण्याचा पेटंट घेत अनोखा प्रयोग देखील महाराष्ट्रात केला गेला आहे. या मातीतून घरातही छोट्या-मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन व वृक्षसंवर्धन केले जाऊ शकते. कागदाच्या मातीचा चिखल होत नाही. यात एखादे छोटे रोप लावल्यास वृक्षाला पाणी देताना त्याची साठवण क्षमता टिकून ठेवते. या मातीचा वापर प्लॉट, घर, हॉटेलमध्ये केल्यास वृक्षसंवर्धन सहज होते. ही माती वजनाने अत्यंत हलकी आहे. एखाद्या उंच इमारतीवर, प्रत्येक प्लॉटमध्ये वृक्ष लागवड करण्यासाठी देखील कृत्रिम माती बहुउपयोगी आहे.
मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जास्त महत्त्वाच्या ठरतात. पिके आणि पीक पद्धती, जमिन उताराची असल्यास आडवी पेरणी, जास्तीचे पाणी निघून जाण्यासाठी केलेल्या उपाययोजना, शेतांची बांधबंदिस्ती, जमिनीवर आच्छादनाचा वापर, कव्हर क्रॉप्स म्हणजे जमीन झाकून टाकणारी पिके, धुप होण्यास प्रतिबंधक पिके यांसारख्या व्यवस्थापनाचा फायदा होतो. जमिनीचे व्यवस्थापन करण्यासाठी केलेल्या अशा पर्यायाचा वापर केलेला असल्यास नैसर्गिक संकटापासून होणारे नुकसान कमी करता येते.
मृदा संरक्षणासाठी जमिनीतील अन्नद्रव्यांचे संवर्धन आणि पुनर्भरण होईल असे उपाय अमलात आणण्याची गरज आहे. आपत्ती नियोजनासाठी फवारणीद्वारे अन्नद्रव्याचा वापर, निचरा व्यवस्थापन, पेरणीच्या वेळा, सुधारित सिंचन, गरजेनुसार बांधबंदिस्ती, खतांच्या मात्रातील बदल, बियाण्यांतील बदल, पेरणीच्या अंतरातील बदल इत्यादी आपत्ती व्यवस्थापन शिफारशी स्थानिक गरजेनुसार वापरण्याची गरज आहे.
आपला ग्रह वाचवितांना त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मातीचे आरोग्य निरोगी ठेवणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानात पर्यावरणाचा समतोल राखून त्याचे संवर्धन सहज टिकवून ठेवता येऊ शकते. त्यासाठीच मृदा संरक्षण अत्यावश्यक आहे.
-प्रा. किरणकुमार जोहरे
आंतरराष्ट्रीय हवामान संशोधक, ढगफुटी तज्ज्ञ,
के.टी.एच.एम.कॉलेज, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग, नाशिक
संपर्क : 9168981939, 9970368009, ईमेल kirankumarjohare2022@gmail.com