Lokmat Agro >हवामान > किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या

किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या

Kikulogy- how monsoon lightnings gives Weather Information revels Pro Kiruankumar Johare | किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या

किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या

(किकुलॉजी, भाग ७)- शेतकऱ्यांनी हवामान आणि तंत्रज्ञान सजग व्हावे या उद्देशाने समग्र माहिती देणारे Kikulogyचे हे लेखन!

(किकुलॉजी, भाग ७)- शेतकऱ्यांनी हवामान आणि तंत्रज्ञान सजग व्हावे या उद्देशाने समग्र माहिती देणारे Kikulogyचे हे लेखन!

शेअर :

Join us
Join usNext

पृथ्वीवर प्रत्येक सेकंदाला ५० ते १०० विजा कोसळत असतात, तसेच २००० पेक्षा जास्त विजांनी भरलेली वादळे घोंगावत असतात व दर सेकंदाला किमान ४४ विजा पृथ्वीवरील जमिनीवर पडतात. वीज कधी आणि कोठे कोसळेल, याचे पूर्वानुमान करता येत नाही. विजांचे कडाडणे थोपविणे किंवा त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे अद्यापही शक्य झालेले नाही. मात्र विजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे केवळ विध्वंस ठरू शकतो. 'इलेक्ट्रॉन्स आणि आयन' यांचे समुह हे‌ विजांच्या तांडव नृत्यासाठी जबाबदार आहेत. तसेच वातावरणातील 'इलेक्ट्रॉन' फारच माहितीपूर्ण भूमिका देखील पार पाडतात.

असा करा विजांपासून बचाव
दोन ढगांची टक्कर नव्हे तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण होणारा विद्युतभार हे विजा चमकण्याचे वैज्ञानिक सत्य आहे.  एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी ढगांतून जेव्हा विद्युतभार वाहून जातो, तेव्हा वीज चमकते. तुलना करता असे आढळते, की जेव्हा ढगाकडून ढगाकडे जाणाऱ्या १० विजा चमकतात तेव्हा केवळ एक वीज ढगाकडून जमिनीवर पडते. विजांचा गडगडाट ऐकू आला किंवा विजा चमकताना दिसल्या तर शेवटचा गडगडाट ऐकू आल्यापासून किंवा शेवटची चमकणारी वीज दिसल्यापासून आसरा घेतलेल्या सुरक्षित ठिकाणीच किमान तीस मिनिटे थांबून आपला बचाव करणे शक्य आहे.

मान्सूनदूत विजा!
वीज ही एक नैसर्गिक आपत्तीच मानायला हवी. वीज म्हणजे मॉन्सूनदूतच! मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर वातावरण संतुलित बनते. त्या वेळी विजा चमकत नाहीत. मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनोत्तर काळातच असंतुलित वातावरणाने विजा चमकतात. हवेतील वाढलेले बाष्प, वरच्या बाजूस जाणारा हवेचा प्रचंड झोत आणि उष्णतेने होणारे अभिसरण यामुळे बनणाऱ्या 'क्युमुलोनिंबस' प्रकारच्या ढगांतून विजांची निर्मिती होते. उष्णतेने मुख्यतः दुपारनंतर विजांच्या वादळांना सुरवात होते. परंतु अनेकदा वातावरणातील थंड हवा रात्रीच्या वेळी खाली येऊ लागल्याने रात्री उशिरा किंवा पहाटे देखील विजांची वादळे होतात.

मॉन्सून काळातही विजा आढळतात. भारतात मार्च, एप्रिल व मे महिन्यांत क्रमाने वाढत जाणारी वादळांची संख्या चांगल्या मॉन्सूनचा पाऊस दर्शवितात. जास्त विजा म्हणजे चांगला पाऊस. म्हणून मॉन्सूनपूर्व विजा या मॉन्सूनच्या स्वरूपाबद्दल माहिती देणाऱ्या 'दूत' आहेत. स्थानिक हवामानातील बदलामुळेही मॉन्सून नसताना अचानक, अवेळी विजा क्वचितच दिसून येतात. 

विजांचे वेगवेगळ्या रंगछटा वा शेडमध्ये तांडव दिसणे ही मान्सूनपूर्व तसेच मान्सूनउत्तर काळातील पाऊस ओळखण्याची साधी सोपी लक्षणे आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना, जनतेलाही या लक्षणांवरून पावसाचा अंदाज लावणे शक्य आहे.


विजा म्हणजे विद्युत उदासीनीकरण!
वीज चमकणे ही एक विद्युत उदासीनीकरणाची(न्यूट्रलायजेशनची) नैसर्गिक प्रक्रिया होय. क्युमुलोनिंबस ढग जमिनीपासून दोन किलोमीटरवर अंतरापासून सुरू होऊन बारा किलोमीटरपेक्षा अधिक उंचीपर्यंत वाढत जातात. हे राक्षसी काळे ढग, त्यांच्या उंचीपेक्षा अनेक पट विस्तीर्ण असतात. अर्ध गोठलेले पाणी, बाष्प आणि बर्फाचे कण यांच्या परस्पर घर्षणातून धनव ऋण विद्युतभार (चार्ज) निर्माण होतो. ढगांतील वेगवेगळ्या भागांत हा विद्युतभार संचयित होऊन एखाद्या 'बॅटरी-सेलसारखी रचना बनते. सामान्यतः दुर्वाहक मानली जाणारी हवा भेदत मग हा विद्युतभार उदासीनीकरणासाठी (न्यूट्रलायजेशन) स्थानांतरित होतो. यालाच आपण वीज म्हणतो. 

'अप-ड्राफ्ट' आणि 'डाऊन-ड्राफ्ट'
सायंकाळी वातावरणातील 'अप-ड्राफ्ट' आणि पहाटे निर्माण होणारा 'डाऊन-ड्राफ्ट' आणि क्युमोलोनिंबस ढगांची वेगवान निर्मिती हे शास्त्रीय कारण आहे. सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बाष्प उपलब्धता आहे, पावसाळा संपून हिवाळ्यातील धुके ही पहाटे पहायला मिळते आहे. परिणामी भौगोलिक परिस्थितीनुसार वातावरणातील अस्थिरता, हवेचा उर्ध्वझोत (अप ड्राफ्ट) तसेच पहाटेचा अंध: झोत (डाऊन ड्राफ्ट) यामुळे महाराष्ट्रात क्युमोलोनिंबस ढग तयार होत आहेत आणि विजांच्या कडकडाटासह विस्कळीत स्वरुपात पाऊस देखील होत आहे.

किकुलॉजीचे हेही भाग वाचा


म्हणून तयार होतात अप आणि डाऊन ड्राफ्ट
दिवसा सूर्यप्रकाश आणि वाढलेल्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे वरच्या दिशेने जाणारा हवेचा उर्ध्व झोत म्हणजे 'अप ड्राफ्ट' निर्माण होत आहे. तर रात्री तसेच पहाटे वातावरणातील थंडाव्यामुळे जड झालेले हवेच तर वरून खालच्या दिशेने आल्याने अंध: झोत म्हणजे 'डाऊन ड्राफ्ट' तयार होत विजांच्या कडकडाटासह गारा आणि गारपीटीसह हलका पाऊस देखील महाराष्ट्र व भारतात कोसळत आहे.

विजांचे अद्भुत विश्व!
क्युमुलोनिंबस ढगांतूनच नव्हे, तर ज्वालामुखीच्या मुखाशी, राखेच्या ढगांत, वणव्याच्या आगीत, अणुबाँबच्या स्फोटानंतर उसळणाऱ्या मशरूम आकाराच्या ढगाच्या छत्रीत, वाळूंच्या वादळात, चक्रीवादळांमध्ये आणि हिमवादळातही (स्नो स्टॉर्म्स) विजा चमकतात. शुक्र, गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांवरही विजांची वादळे होतात.

सन १७५० मध्ये बेंजामिन फ्रँकलिन यांनी सर्वप्रथम शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन करून विजा म्हणजे विद्युतशक्ती असल्याचे सिद्ध केले. शेतकरी हितासाठी, राष्ट्रीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, जागतिक अन्नसुरक्षिततेचे ध्येय गाठण्यासाठी तसेच हवामानाची अचूक माहिती मिळविण्यासाठी विजांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम वातावरणावर तसेच अंतराळात अभ्यासने ही काळाची गरज आहे.

प्रा किरणकुमार जोहरे, 
मो. नं. 9168981939, 9970368009,
kirankumarjohare2022@gmail.com

Web Title: Kikulogy- how monsoon lightnings gives Weather Information revels Pro Kiruankumar Johare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.