सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, अशावेळी चंद्रग्रहण होते. पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते व तिघे साधारणतः एका सरळ रेषेत येतात, तेव्हा पृथ्वीची चंद्रावर पडणाऱ्या सावलीमुळे चंद्र किंवा चंद्राचा काही भाग झाकला जातो.
या सावलीमुळे चंद्राच्या पौर्णिमेला दिसणाऱ्या स्थितीला 'चंद्र ग्रहण' असे म्हणतात. चंद्रग्रहण पौर्णिमेच्या आसपास होते, जेव्हा पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्यामध्ये येते. चंद्राची कक्षा ही पृथ्वीच्या कक्षेशी जवळजवळ ५ अंशाचा कोन करते. त्यामुळेच प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि प्रत्येक अमावास्येला सूर्य ग्रहण होत नाही.
चंद्रग्रहण खंडग्रास आणि खग्रास अशा दोन प्रकारचे असते. चंद्र शंभर टक्के झाकला जातो, ते खग्रास, तर चंद्र ९० टक्क्यापर्यंत झाकला जातो ते खंडग्रास प्रकारचे चंद्रग्रहण असते. चंद्र विरळ छायेमधून जाणार असल्यास अशा ग्रहणाला मांद्य किंवा छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणतात. तर चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये आल्याने सूर्य दिसत नाही व अशावेळी खंडग्रास, खग्रास आणि कंकणाकृती अशा तीन प्रकारची सूर्यग्रहणे पहायला मिळतात.
…असा आपला चांदोबा!
सोम, शशांक, शशिन्, सुधांशु, इंदु, कुमुदबांधव, चंद्रमा, निशाकर, निशापति, मृगांक, रजनीनाथ, रोहिणीकांत अशी आपल्या लहानपणच्या चंदामामाची विविध नावे होय. चंद्र म्हणजेच आपला 'चांदोबा' हा आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील सरासरी अंतर ३,८४,४०३ कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे. चंद्राचे उपपृथ्वी म्हणजे पृथ्वी पासूनचे कमीतकमी अंतर ३,६३,१०४ कि.मी. तर चंद्राचे अपपृथ्वी म्हणजे पृथ्वी पासूनचे जास्तीत जास्त अंतर ४,०५,६९६ कि.मी. इतके आहे. चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे ३,४७४ कि.मी. आहे. याचाच अर्थ असा की चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २ टक्के आहे व चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७ टक्के इतकी आहे.
'सारोस चक्र' म्हणजे काय?
खगोलशास्त्रज्ञांनी वेगवेगळी गणिते करून असा निष्कर्ष काढला आहे की सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहण हे दर ६,५८५.३ दिवसांनी (१८ वर्षे, ११ दिवस व ८ तास) होते. या कालावधीला 'सारोस चक्र' असे म्हणतात.
काय आहे नेमकी 'आर्टेमिस’ मोहीम?
नासाच्या अपोलो ११ अंतराळयानातून चंद्रावर उतरून अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग याने २० जुलै १९६९ रोजी इतिहास घडविला होता. तो चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील पहिला मानव ठरला होता.
आर्मस्ट्रॉंग हे दोन तास ३२ मिनिटे आणि त्यानंतर आल्ड्रिन हा चंद्रावर दुसरे पाऊल ठेवणारा त्याचा त्यांचा दुसरा सहकारी त्यांच्यापेक्षा १५ मिनिटे कमी काळ चंद्रावर होता. दोघांनी मिळून अमेरिकेचा ध्वज चंद्रावर फडकावला. 'ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,' असे आर्मस्ट्रॉंग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे त्यावेळी सांगितले होते.
मागील भाग:किकुलॉजी: 'हामून' नंतर 'मिथिली' येतेय.. चला समजून घेऊ चक्रीवादळांचे शास्त्र !
‘आर्टेमिस’ या नासाच्या मोहिमेत सध्या १२ महिला चंद्रावर उतरून प्रत्यक्ष पाऊल ठेवण्याची तयारी करीत आहेत. २०२४ पर्यंत अमेरिकेतील किमान एक महिला आणि एक पुरुष चंद्रावर पाठवायचा आहे. ‘आर्टेमिस’ हे नाव अपोलोच्या जुळ्या बहिणीच्या नावावरून देण्यात आलंय. ग्रीक पुराणांनुसार ‘आर्टेमिस’ ही चंद्र देवता आहे.
ग्रहण कालावधी नेमका असतो तरी किती?
खग्रास किंवा खंडग्रास सुर्यग्रहणाचा जास्तीतजास्त कालावधी हा ७ मिनिटे ३१ सेकंद इतका तर कंकणाकृती सुर्यग्रहणाचा कालावधी हा १२ मिनिटे २९ सेकंद इतका असू शकतो.
चंद्रग्रहण कालावधी किमान २० ते ३० मिनिटे तर जास्तीतजास्त १ तास ४७ मिनिटे हा सर्वसाधारणपणे आणि कधीकधी लांबत हा ४ तास इतका देखील भौगोलिक व खगोलीयस्थितीनुसार दिसून येतो.
ग्रहणे आणि पिकपाणी!
जे पासाचॉफ हे एक प्रमुख ग्रहण संशोधक आहेत ज्यांनी असंख्य ग्रहणांचा आणि वातावरणावर आणि सौर क्रियाकलापांवर प्रभाव अभ्यासला आहे. फ्रेड एस्पेनाक हे अमेरिकेतील नासा या संस्थेचे सेवानिवृत्त ग्रहण अंदाज आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्व यावरील विस्तृत कार्य करणारे खगोलभौतिकशास्त्रज्ञ आहेत. गॉर्डन ई. ब्रुकेनर यांनी सूर्यग्रहणांच्या वेळी पृथ्वीच्या आयनोस्फियरवरील संशोधन आणि रेडिओ लहरींच्या प्रसारावर त्याचा प्रभाव यासाठीच्या संशोधनासाठी ओळखले जातात. तर बार्ट व्हॅन एस हे एक वायुमंडलीय शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी सूर्यग्रहण दरम्यान तापमान आणि वाऱ्यातील बदलांवर संशोधन केले आहे. अकिटो डेव्हिस कावामुरा या संशोधकाने वातावरणाचा दाब आणि तापमानावरील ग्रहणांच्या प्रभावाचा अभ्यास केला आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर ग्रहणांचा पुढील परिणाम पिकपाण्यावर होतो.
सूर्यग्रहण आणि पीकपाणी परिणाम
हवामानाचा विचार केला तर लक्षात येते की, एकूण सूर्यग्रहण दरम्यान, तापमान सुमारे १० ते १५ अंश फॅरनहिट म्हणजे ५ ते ८ अंश सेल्सियस किंवा त्याहून कमी-अधिक बदल तापमानात होऊ शकते, ज्यामुळे तात्पुरते म्हणजे काही मिनिटे वातावरण थंड होते. तसेच सौर किरणोत्सर्ग कमी झाल्यामुळे वातावरणाचा दाब थोडासा कमी होऊ शकतो, ज्यामुळे स्थानिक वाऱ्यावर परिणाम होतो.
कृषी पिकांचा विचार केला तर केवळ तेवढ्यापुरते काही मिनिटे पिकांची प्रकाश संश्लेषण ही अन्ननिर्मिती प्रक्रिया वेग कमी होऊ शकतो. जर एकंदर भुभागातील शेतीचा विचार केला तर पीक उत्पादनात किरकोळ घट सूर्यग्रहणांमुळे होते, असे गणितीय आकडेमोड करीत कॉम्प्युटर मॉडेल दाखवितात. कृषी उत्पादनावर हा परिणाम सुमारे १ ते ५ टक्के इतका होत शेती उत्पादन घट दिसू शकते.
चंद्रग्रहण आणि पीकपाणी परिणाम
हवामानाचा विचार केला तर चंद्रग्रहणांचा हवामान आणि तापमानावर अत्यंत नगण्य थेट परिणाम होतो. यामुळे वातावरणात चंद्रग्रहणाच्या वेळी कोणतेही महत्त्वपूर्ण वातावरणीय परिणाम किंवा हवामान बदल होत नाहीत. कृषी पीक उत्पादनात चंद्रप्रकाश हा प्रकाश संश्लेषण क्रियेत सूर्यप्रकाशासारखी भूमिका पार पाडत नाही परिणामी चंद्रग्रहणांचा पिकांच्या वाढीवर लक्षणीय परिणाम मुळीच होत नाही. त्यामुळे चंद्रग्रहणांचा कृषी उत्पादनावर फारसा परिणाम होत नाही, असे म्हणण्यापेक्षा कुठलाच परिणाम होत नाही असे म्हटलेलेच योग्य ठरेल.
आतापर्यंतच्या अभ्यासानुसार सूर्य ग्रहण आणि चंद्रग्रहणांचे हवामान, वातावरण, शेती आणि पीक उत्पादनावर अत्यंत किरकोळ तसेच अल्पकालीन परिणाम होऊ शकतात हे लक्षात घेणे आणि यावर अधिक सखोल संशोधन होणे महत्त्वाचे आहे.
प्रा. किरणकुमार जोहरे
आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ व हवामान संशोधक
मो. नं. 9168981939, 9970368009
kirankumarjohare2022@gmail.com