Join us

किकुलॉजी: गारपीटीसारख्या घटना शेतकऱ्यांच्या मोबाईलवर लाईव्ह कळणार, पण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 8:19 PM

(किकुलॉजी, भाग १७): शेतकरी बांधवांनी हवामान सजग व्हावे यासाठीचे हे सदर!

नैसर्गिक व मानवी आपत्तींचा मुकाबला करीत, अन्नसुरक्षिततेसाठी 'राष्ट्रीय एक्स बँड इलेक्ट्रॉनिक्स डॉप्लर रडार नेटवर्क' मध्ये सर्वच रडार हे 'पोलरीमेट्रिक कलर एक्स बँड इलेक्ट्रॉनिक्स डॉप्लर रडार' असणे कृषी अर्थव्यवस्था मजबुतीकरण, अन्नसुरक्षितता व जनहितासाठी खरंतर आवश्यक व अपरिहार्य गरज आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक येथे तर मराठवाड्यासाठी संभाजीनगर येथे एक्स बँडडॉप्लर रडार बसवावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विविध मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी गेली अनेक वर्षे वारंवार थेट संपर्क साधल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली आहे.

असे असले तरी शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रामबाण तोडग्यासाठी 'संजीवनी बुटी' सिद्ध असलेले तसेच नावासह जगभर १०० पेक्षा अधिक देशात वापरले जाणारे 'पोलरीमेट्रिक कलर एक्स बँड इलेक्ट्रॉनिक्स डॉप्लर रडार' अद्याप मंजुरी मिळूनही लालफितीच्या कारभारात काही झारीतल्या शुक्राचार्यांनी कसे अडकवून ठेवले आहे, याचा गुप्त तपास यंत्रणांनी छडा लावणे हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे. 

काय आहे 'पोलरीमेट्रिक टेक्नॉलॉजी'? 'पोलरीमेट्रिक टेक्नॉलॉजी' म्हणजे लहरींच्या 'ध्रुवीयतंत्रा'चा शोध फ्रान्समध्ये १८०८ मध्ये एटिएन-लुई मालुस यांनी लावला होता. मालूस यांनी शोधून काढले की प्रकाश लहरींचे विश्लेषण त्यांच्या ध्रुवीकरणाच्या आधारे केले जाऊ शकते.

...अशी वापरता येईल 'ॲडव्हॉन्सड‌् इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी’ 'ॲडव्हॉन्सड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी'ज म्हणजे  प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर (पीएलसी), पर्यवेक्षी नियंत्रण आणि माहिती अधिग्रहण (स्काडा), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर) आदींचा वापर तातडीने होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी 'राष्ट्रीय एक्स बँडइलेक्ट्रॉनिक्स डॉप्लर रडार नेटवर्क'च्या माध्यमातून हवामानाची अचूक माहिती घराघरातील मोबाईलवर घटना घडतांना 'लाईव्ह' उपलब्ध होणे सहज शक्य आहे. अन्नसुरक्षिततेसह कृषी अर्थव्यवस्था हे ध्येय शेतकरी सशक्तीकरण करीत भारताला नक्कीच मजबूत बनवेल.

'पोलरीमेट्रिक' यांचा अर्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक (विद्युत चुंबकिय) सिग्नलच्या ध्रुवीकरणाचे मोजमाप किंवा विश्लेषण करणे होय. 'पोलरीमेट्रिक डॉप्लर रडार' हे पारंपारिक डॉप्लर रडार बरोबर  'पोलरीमेट्री' तंत्र यांचा सुरेख मिलाफ आहे. एखाद्या घटनेचे विश्लेषण रियल‌टाईम (घटना घडतांना) अत्यंत सुस्पष्ट चित्र स्पष्ट सायंटिफिक पोलरीमेट्रिक डेटा अॅनालिसेस हे अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. म्हणूनच हवामानाच्या अचूक माहितीसाठी तसेच शेती अर्थव्यवस्था आणि जीवितहानी टाळण्यासाठी मानवी सभ्यतेसाठी महत्त्वाचे योगदान देत आले आहे.

किकुलॉजी : ढगांचा एक्सरे काढणाऱ्या रडार तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील शेतकरी कधी समृद्ध होणार?

'कलर पोलरीमेट्रिक रडार'च का? 'कलर म्हणजे रंगीत पोलरीमेट्रिक' यामध्ये मानवी डोळ्यांसाठी दृश्य व अदृश्य असणाऱ्या विद्युत चुंबकीय प्रकाश लहरी या पर्जन्य कण म्हणजे ढगातील पाणी, बर्फकण व बाष्प अशा विविध घटनांची बिनचूक माहिती सांगतात. यासाठी ॲडव्हॉन्स इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. परिणामी बदलत्या वातावरणातील (डायनॅमिक एनव्हार्यमेंटल) परिस्थितीत वेगवेगळ्या दिशांना विद्युत चुंबकिय लहरी या कशा प्रकारे कंपन करीत परावर्तीत होत विखुरतात, याचा प्रामुख्याने अभ्यास व डेटा विश्लेषण हे  विविध रंगांवर चटकन लक्षात येते. या तंत्रज्ञानाचा वापर डॉप्लर रडार सह ऑप्टिक्स, मटेरियल सायन्स आणि रिमोट सेन्सिंग सारख्या विविध क्षेत्रात देखील जागतिक स्तरावर विश्लेषणातून अत्यंत अचूक निष्कर्ष काढण्यासाठी होतो.

'पोलरीमेट्री' आणि 'पोलरीमेट्रीक' यातील फरक काय?

'पोलरीमेट्री' शेतीला मदत करण्यासाठी आणि अत्यंत बिनचुक हवामान व इतर शेती निगडीत घटक यांच्या विश्लेषणासाठी आपण हे समजून घ्यायला हवे की, 'पोलरीमेट्री' ही एक व्यापक संज्ञा आहे जी सर्वसाधारणपणे ध्रुवीकरणाचे मोजमाप आणि विश्लेषण या गोष्टींचा यात समावेश होतो. 'पोलरीमेट्री' हे ऑप्टिक्स, खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र यासह विविध वैज्ञानिक शाखांमध्ये लागू केले जाऊ शकते. रडारच्या संदर्भात, 'पोलरीमेट्री'चा वापर मुख्यतः विखुरणाऱ्या वस्तूंच्या वैशिष्ट्यांना समजून घेण्यासाठी आणि समज वाढवत नवीन ज्ञानार्जनासाठी केला जातो.

'पोलरीमेट्रिक''पोलरीमेट्रिक' हा शब्द तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात आणि शेतीसह जीवनातील इतरही अडचणी सोडविण्यासाठी होणारा वापर दर्शविते. अंदाज नव्हे तर बिनचूक हवामान माहिती याबरोबरच ऑप्टिक्स, रडार आणि रिमोट सेन्सिंग यांसारख्या विविध क्षेत्रात विद्युत चुंबकीय लहरींचे ध्रुवीकरण मोजमाप व प्रत्यक्ष त्यांच्या विश्लेषणाची वापर यासाठी केला जातो. ध्रुवीय किंवा पोलरीमेट्रिक रडार हे ढगफुटी, दुष्काळ यांची आगाऊ माहिती देण्यासाठी 'बापाब' कणांसारख्या बदलत्या माहितीवर 'लक्ष्य' केंद्रीत करते. यासाठी अधिकाधिक माहिती गोळा करीत अचूक पृथक्करण करण्यासाठी रेडिओ लहरींचे होणारी ध्रुवीकरण या वैज्ञानिक गुणधर्मांचा वापर करते.

जीवरक्षक देवदूतम्हणूनच पोलरीमेट्रिक कलर डॉप्लर रडार हे पारंपारिक डॉप्लर रडार तंत्रांसह पोलरीमेट्री एकत्र करीत शेतकऱ्यांना‌ पीक नियोजन, संरक्षण व उन्नतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. पर्जन्य कणांचा म्हणजे 'बापाब'चा (बाष्प, पाणी, बर्फकण) वेग आणि हालचाल मोजण्यासाठी, रडार सिग्नलच्या ध्रुवीकरण वैशिष्ट्यांसह अनमोल व जीवरक्षक देवदूत ठरते. ढगातील 'बापाब' डेटा ही आवश्यक माहिती हवामान शास्त्रज्ञांना पाऊस, बर्फ आणि गारपीट यासारख्या विविध प्रकारच्या पर्जन्यमानांमध्ये फरक करण्यास रियल टाईम मदत करते. तसेच ढगांचा एक्स रे काढत जणू अक्षांश रेखांशावर कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी किती वाजून‌ किती मिनिटे किती सेकंदांनी, कशा स्वरूपात म्हणजे किती मिलीमीटर पाऊस पडेल याची बिनचुक माहिती देत शेती व उदयोगधंद्यांना‌ जीवनदान व‌ आर्थिक समृद्धी प्रदान‌ करीत‌ राष्ट्रहितासाठी योगदान देणारे महत्त्वाचे‌ साधन ठरते.

- प्रा. किरणकुमार जोहरेआंतरराष्ट्रीय हवामान संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ,के.टी.एच.एम.कॉलेज, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग, नाशिक9168981939, 9970368009 kirankumarjohare2022@gmail.com

टॅग्स :हवामानगारपीटमोसमी पाऊसशेतकरी