हवामान बदलाचा खोलवर परिणाम पनामाच्या दुष्काळात योगदान देत आहे. जे मुलं जन्मलेच नाही त्याने घरात पसारा केला आहे, असे जर कोणी तुम्हाला सांगितले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? मग जो एल निनो जन्मलाच नाही त्याचे नाव घेत आधीच दुष्काळाचे खापर जर वैज्ञानिक आणि त्यांच्या हवाल्याने तुम्ही देखील नसलेल्या गोष्टींवर फोडू लागलात तर अशा 'विद्वत्तेला' काय म्हणायला हवे? थोडक्यात शास्त्रीय उत्तर शोधतांना लक्षात येते की एल निनो नव्हे तर सौर म्हणजे सुर्यावरील घडामोडी आणि सुर्याच्या पृष्ठभागावरील धुमारे अशी परिस्थिती याला जबाबदार आहे.
पनामा कालव्याची लांबी सुमारे ८२ किलोमीटर इतकी आहे. वातावरण बदलाचा फटका शेतीला जसा बसतो आहे. तसेच शेती संलग्न व्यापाराला देखील बसतो आहे. आज पनामा कालवा दुष्काळामुळे सुकत चालला आहे. त्याचा थेट परिणाम जहाज वाहतूक आणि विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर तसेच रोजगारावर देखील होतो आहे. पनामा कालव्याचे धोरणात्मक महत्त्व आणि सागरी व्यापारावर होणारा परिणाम यामुळे तो आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाचा ठरतो. जगभरातील माल पाठवण्याची किंमत वाढणार हे यामुळे आता अटळ आहे. परिणामीसर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके जगभर बसणार हे यथार्थ आहे.
पनामा कालवा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांमध्ये जहाजांचा प्रवास करण्यासाठी वेळ आणि अंतर मोठ्या प्रमाणात कमी करतो. दक्षिण अमेरिकेभोवती वळसा घालून करावा लागणारा सुमारे १२ हजार ८७४ किलोमीटर इतका लांबचा जहाजांचा प्रवासमार्ग शॉर्टकट बनवित वाचवला. पनामा कालवा म्हणजे अभियांत्रिकीचा चमत्कार म्हणावा लागेल. पनामा कालवा हा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडतो आणि जागतिक व्यापार सुलभ करतो. पनामा कालवा हा मानवी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या उत्तम नमुना आहे याची माहिती फार कमी लोकांना आहेत. इजिप्तमधील सुएझ कालव्याच्या बांधकाम करणारे फ्रेंच मुत्सद्दी फर्डिनांड डी लेसेप्स यांनीच पनामा कालवा बांधण्याचा प्रस्ताव बनविला होता.
हेही वाचा : किकुलॉजी भाग १९ : एआयचे तंत्र अन् शेतीत पैशांच्या पावसाचा जादूमंत्र
पनामा कालवा कार्यक्षम सागरी व्यापार मार्ग सुलभ करून जागतिक शेतीउदयोगामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. कृषी मालाची जलद आणि किफायतशीर वाहतूक सक्षम करून विविध देशांतील शेतकऱ्यांना पनामा कालव्याचा फायदा होतो. अमेरिकन शेतकऱ्यांना धान्य, सोयाबीन आणि मांस आशियाई बाजारपेठेत आयात-निर्यात करण्यास पनामा कालवा मदतनीस ठरतो. याशिवाय, लॅटिन अमेरिकन शेतकऱ्यांना उत्तर अमेरिकेत फळे आणि भाज्यांच्या जलद शिपमेंटचा फायदा पोहचवितो.
पनामा कालव्याचे बांधकाम १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंच नियंत्रणाखाली सुरू झाले. मात्र अडचणींचा पहाड समोर होता. इंजिनियरिंगची नवनवीन आव्हाने, मलेरिया आणि पिवळा ताप यांसारख्या रोगांमुळे वाढलेला प्रचंड मृत्युदर यांसह असंख्य अडचणी झेलत पनामा कालवा पुर्ण झाला. अमेरिकेने १९०४ साली मध्ये हा प्रकल्प ताब्यात घेतला आणि १९१४ मध्ये तो पूर्ण केला.
१५ ऑगस्ट १९१४ रोजी अधिकृत उद्घाटनासह कालवा पूर्ण होण्यास सुमारे १० वर्षे लागली होती. अभियांत्रिकी पराक्रमाच्या उत्तम नमुना म्हणजे पनामा कालवा बनविण्यासाठी अहोरात्र ४० हजार कामगार झटत होते.
पनामा कालवा वाहतूक
कालवा प्राधिकरणानुसार, दिवसाचे २४ तास, वर्षातील ३६५ दिवस, १३ हजार ते १४ हजार जहाजे दरवर्षी पनामा कालवा वापरतात. १९५० साला पासून पनामा कालवा प्राधिकरण (एसीपी) कडे पनामा कालव्याच्या पाण्यासाठी व इतरही विविध नोंदी उपलब्ध आहेत. 'एसीपी'च्या म्हणण्यानुसार, पावसाच्या पाण्यावर गॅटुन तलावातील पाण्याची पातळी अवलंबून आहे. हा जलाशय पनामा कालव्याच्या लॉक सिस्टममध्ये पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. पनामा कालव्याच्या कार्यासाठी पाण्यावर अवलंबून असल्यामुळे दुष्काळाचा परिणाम त्याच्यावर लक्षणीयरीत्या होतो.
अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांदरम्यान जहाजांचे परिवहन सुलभ करून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी कालवा लॉक आणि जलाशयांच्या प्रणालीवर अवलंबून आहे. प्रत्येक लॉकेज ऑपरेट करण्यासाठी सुमारे १८.९३ कोटी लिटर ताजे पाणी लागते, जे कालव्याच्या जटिल जल व्यवस्थापन प्रणालीला दर्शविते. पाऊस कमी झाला आहे आणि यांच्या थेट परिणामामुळे २०२३ च्या ऑक्टोबर मध्ये पनामा कालवा हा सर्वात कोरडा झाल्याचे स्पष्ट दिसते आहे.
२०२३ वर्षाच्या सुरुवातीला प्रथमच पनामाकालव्यातून जाणाऱ्या जहाजांची संख्या कमी केली गेली, जे अद्यापही सुरु असून जानेवारी २०२४ मध्ये दररोज होणाऱ्या बुकिंग स्लॉट्सची संख्या तुलनेने जवळपास निम्मी झालेली असेल. गेल्या काही महिन्यांत, 'एसीपी'ने टंचाईचे पाणी वाचवण्यासाठी विविध मार्ग अवलंबले आणि अनेक निर्बंध लादले आहेत.
थोडक्यात गेल्या ७३ वर्षांहून अधिक काळातील सर्वात भीषण दुष्काळाला पनामा कालवा सामोरा जात आहे. अभूतपूर्व घसरण होत जलपातळी निचांकी पोहचली आहे. भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा धैर्याने मुकाबला करावयाचा असेल तर सत्य सांगण्यासाठी व सत्य स्विकारण्यासाठी देखील धाडस दाखवावे लागते. येत्या काळात दुष्काळामुळे पनामा कालवा हा जलमार्ग वापरणाऱ्या जहाजांच्या संख्येत मोठी कपात केल्या शिवाय पर्यायच नाही हे येथील अधिकाऱ्यांनी देखील आता ठामपणे जाहिर केले आहे. पनामा कालव्यातील मिराफ्लोरेस लॉकमधून जहाज प्रवास करत असतानाची पीटर हॉस्किन्स यांची देखील एक स्टोरी बीबीसी ने प्रकाशित केली आहे.
भारताचे काय?
भारताला जागतिक व्यापारात गुंतवणूक करण्यासाठी, कृषी क्षेत्रासाठी आयात आणि निर्यातीचा अखंड प्रवाहाची खात्री देण्यासाठी पनामा कालवा महत्त्वाचा ठरतो. शेतकऱ्यांना विविध बाजारपेठा आणि तंत्रज्ञानात वेगवान प्रवेश मिळण्यास पनामा कालवा हा एक सेतू सारखे काम करतो. भारतीय शेतकऱ्यांच्या संदर्भात, पनामा कालवा खते आणि यंत्रसामग्री सारख्या आवश्यक गोष्टींची सुरळीत वाहतूक होते. परिणामीसुधारित कृषी उत्पादकतेमध्ये योगदान देऊन पनामा कालवा सहाय्यक ठरतो.
पनामा कालवा प्राधिकरण पाण्याच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण करते आणि नेव्हिगेशनमधील व्यत्यय कमी करण्यासाठी दुष्काळाच्या काळात जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना राबवते आहे. मात्र दुष्काळात, जलाशयांमधील पाण्याची पातळी कमी होते आहे. परिणामीजहाजांच्या सुरक्षित मार्गासाठी पुरेशी खोली राखण्याच्या कालव्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे जहाजांची वाहतूक सुव्यवस्थापनात अडथळे निर्माण होतात. पुर्वीपेक्षा दहापट जहाजांना कालवा वापरण्यासाठी प्रतीक्षा लागत आहे.
पनामा कालव्याच्या पाण्याच्या पातळीवर दुष्काळाचा लक्षणीय परिणाम होत आहे. शेतकरी हितासाठी सागरी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी पनामा कालवा काळजीपूर्वक जलव्यवस्थापन आवश्यक आहे. मात्र दुष्काळाचा हे सत्य आपण देखील आता स्विकारायला हवे. येत्या काळात भारताने सुयोग्य प्रकारे दुष्काळाचा सामना करण्यासाठी तयारी केली नाही तर त्याची फार मोठी किंमत जनतेबरोबरच विविध राज्यांतील राज्यकर्त्यांना मोजावी लागेल याचा हा अलर्ट आहे.
-प्रा. किरणकुमार जोहरे
आंतरराष्ट्रीय हवामान संशोधक, ढगफुटी तज्ज्ञ,
के.टी.एच.एम.कॉलेज, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग, नाशिक
संपर्क : 9168981939, 9970368009,
ईमेल: kirankumarjohare2022@gmail.com