Join us

किकुलॉजी: मिशन 'नेट झिरो २०५०' काय आहे? त्याचा शेतीला काय फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 4:16 PM

(किकुलॉजी, भाग २३): शेतकरी बांधवांनी तंत्रज्ञान सजग व्हावे यासाठीचे हे सदर.

खरंतर दरवर्षी पावसाबरोबर हवेतील प्रदूषण कमी होते. वड, पिंपळ, चिंच आदी डेरेदार वृक्षवल्ली बरोबरच चौकाचौकातील पाण्याचे कारंजे किंवा फवारे हे प्रदूषण कमी करीत मानवी जीवन व शेतीला हातभार लावणाऱ्या जीवनदायी यंत्रणा आजही अनेक ठिकाणी भारतात व भारताबाहेर अस्तित्वात आहे.

शेती व एकंदर जनतेच्या आरोग्य हितासाठी वाढलेले प्रदूषण कमी करण्याचा प्रोजेक्ट म्हणजे 'नेट झिरो कार्बन उत्सर्जन'! नाशिक हे महाराष्ट्रातील निवड झालेल्या पाच पैकी एक शहर!

आवश्यकता का?कार्बन प्रदूषणामुळे हवामान बदल घडतोय आणि यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शेतीवर विपरित परिणाम होतो आहे, हे वास्तव आहे. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडच्या वाढीव पातळीमुळे तापमान वाढ होते, पर्जन्यमानाचे स्वरूप व वितरण बदलले तसेच ढगफुटी, दुष्काळ, हवामानातील चढ उताराचे भोवरे आदी 'एक्सट्रीम इव्हेंट'च्या तीव्र घटनांचा सामना शेतीला करावा लागतो. परिणामी पीक उत्पादन आणि गुणवत्तेवर असर होत आर्थिक झळ शेतकऱ्यांना सोसावी लागते. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड वाढ ही एसिड रेन म्हणजे आम्ल पाऊस व अधिक अम्लीय माती हे बदल घडविणे ज्याचा थेट परिणाम पिकांवर होतो.

'नेट झिरो कार्बन' म्हणजे निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाकडे जाणे हे कृषी क्षेत्र वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. कमी झालेल्या कार्बन उत्सर्जनाद्वारे हवामानातील बदल कमी करत‌ तापमान आणि पर्जन्यमानाचे स्वरूप स्थिर करणे शक्य होऊ शकेल.

वातावरण स्थिरता ही उत्तम पीक उत्पादन, जैवविविधतेचे रक्षण, मातीचे आरोग्य रक्षण, कीड आणि रोग नियंत्रण आणि एकूणच कृषी क्षेत्रासाठी लाभदायक ठरेल. म्हणूनच 'नेट झिरो २०५०' हे लक्ष्य महत्त्वाचे आहे.

नाशिक 'कॅप'!महाराष्ट्रातील नाशिक हे‌ 'कॅप' म्हणजे 'क्लायमेट चेंज एक्शन प्लॅन' साठी निवडले गेले असून हवामान बदल कृती सेलची स्थापना होत येणाऱ्या संकटांशी मुकाबला केला जाईल असे सध्या तरी कागदोपत्री दिसते आहे. या अंतर्गत प्रवाही व अखंडीत अंतर्गत व शहराबाहेरील वाहतूक व्यवस्था, हरित ऊर्जा यासाठी ठोस पावले आणि स्मार्ट शहर व स्मार्ट घरे असलेल्या इमारती, हवेची गुणवत्ता कायम राखत रोगराई टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रणाकरीता मुबलक वृक्षारोपण व ते जगविणे आणि हरित कव्हर सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. पेयजल आणि शेती तसेच औद्योगिक वापरासाठी चे जलसाठा नियोजन तसेच कचरा व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करणे हे आव्हान आहे. 

किकुलॉजी भाग २२: राज्यात निफाडमध्येच नीचांकी तापमानाची नोंद का होते? त्यावर काय उपाय करायचे? जाणून घेऊ

आशादायक गोष्ट ही आहे की राज्यात इतर चार शहरांसह पुढील २६ वर्षात म्हणजेच २०५० सालापर्यंत नाशिक हे शून्य कार्बन उत्सर्जन करेल असे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. द्राक्ष, कांद्याबरोबरच भाजीपाला व उद्योगधंदे यासाठी नाशिकची देशाला ओळख आहे.‌ आता पुणे, मुंबई, औरंगाबाद, बंगलोर आदी शहरांच्या बरोबरीने नव्हे तर त्यांनाही मागे‌ टाकत नाशिक जिल्ह्यात किमान एक हजार एकर वर इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय पटलावर एक नवीन अद्यावत स्मार्ट सिटी हे नाशिकचे नवे रूप असेल. केंद्र व राज्य सरकार यासाठीचा कृती आराखडा राबवित आहे. या प्रक्रियेत टप्प्याटप्याने नाशिक मधील सर्व सरकारी व गैरसरकारी संस्था तसेच शैक्षणिक व औद्योगिक संस्था या सामावून घेतल्या जात आहेत. 

मात्र हे करीत असतानाच शेती व एकंदर निसर्गावर परिणाम होणार‌ आहे आणि त्याचे दीर्घकालीन चटके नाशिक जिल्ह्यासह इतर प्रदेशाला देखील बसणार आहेत. मात्र थंड शहर असलेले नाशिक हे अबाधित रहावे तसेच वातावरण बदल आणि दीर्घकालीन हवामान बदल यांचे फटके नव्हे तर अचानक बसणारे मोठे धक्के सहन करीत नाशिक शहर हे तग धरून जिवंत रहावे व सुरळीत चालावे या करीता विविध उपाययोजना सुरू आहेत नव्हे तर यासाठी चाचपणी सुरु आहे.

हवामान बदल हा शेती बरोबरच नागरीकांच्या जीवितहानी थेट संबंधित आहे. त्यामुळे एकाबाजूला अन्नसुरक्षा, दुष्काळ व ढगफुटीची मुकाबला आणि भुकंप आदी नैसर्गिक व सायबर हल्ले अशा मानवी आपत्तींचा सामना‌ करण्यासाठी सक्षम व‌ मोठी 'टेक्नॉलॉजी वॉरियर्स'ची फौज उभी करावी‌ लागणार‌ आहे. यासाठी काय व कसे योजना आहे हे अद्याप बाहेर येणे बाकी आहे.

दूरदृष्टी ५०० वर्षाची!जपान, अमेरीका, जर्मनी, चीन आदी देशांतील खाजगी कंपन्या आणि काही प्रशासकिय अधिकारी हे पुढील किमान १०० वर्षे ते ५०० वर्षांचा विचार‌ करुन आपल्या योजना बनवित आहेत. १९८० पासून मुंबई समुद्रात बुडेल ही भिंती पसरविली जाते आहे.‌ आता पुन्हा मुंबई ही २०५० पर्यंत समुद्रात बुडालेली असेल असे  रिपोर्ट बातम्या पसरवित आहेत. 

येत्या काळात परदेशी विद्यापीठे, स्वायत्त विद्यापीठे यांची तीव्र स्पर्धा नाशिक अनुभवले. परिणामी सध्याच्या शैक्षणिक संस्था व त्यातील सक्षम मनुष्यबळ हे सुयोग्य दिशेने वळवित 'स्मार्टशहर‌' घडविणारी स्मार्ट माणसंही जपावी लागतील आणि त्यांच्या ज्ञानाचा अखंडीत फायदा नाशिक, महाराष्ट्र राज्य व एकंदर देशाला होणे आवश्यक आहे. शैक्षणिक अभ्यास क्रमात आवश्यकतेनुसार शेती व उद्योगधंदे यांवर हवामानाचा परिणाम व तो टाळण्यासाठी एक्स बॅंड डॉप्लर सारख्या विविध यंत्रणा आणि त्यांच्यातील समन्वय हे आव्हान पेलण्यासाठी टिमवर्क व सक्षम मनुष्यबळ अपरिहार्यपणे घडवावे लागेल. केवळ पोपटपंची व कागदी घोडे नाचविले ही येत्या काळात कायदे व सुव्यवस्थापनात जटिल प्रश्न व परत मागे जाऊन सुधार न घडविता येणारी अशी केयॉटिक परिस्थिती निर्माण करू शकते हे गांभीर्याने लक्षात घ्यायला हवे. नाशिक मधील ज्ञान हे बाहेरचे देश आपल्या फायद्यासाठी वापर करून घेत आहेत.

नेट झिरो २०५०उत्तर महाराष्ट्रातील द्राक्ष, कांदा, केळी, भाजीपाला आदींची बाजारपेठ असलेल्या सर्व जिल्हांतील शेतकरी, व्यापार व उद्योग धंदे यांना 'नेट झिरो २०५०' चा फायदा होईल. पर्यायाने राज्य व राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी येईल व एकंदर शेतकरी व नागरीक यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होत आत्महत्या देखील थांबतील असा विश्वास आहे. 

'नेट झिरो २०५०' उद्देश्य‌ साधण्यासाठी व सर्व कामे पूर्ण कसे करणार‌ आणि यात‌ काम करणारी तज्ज्ञ मंडळी कोणती त्यांचा या‌कामाबाबत अनुभव आणि संशोधन अभ्यास याबाबत सर्वच अजूनही ठरते आहे. यात खरोखर चांगल्या हवामान शास्त्रज्ञांना तसेच कागदोपत्री घोडे न नाचवता प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांना संधी मिळेल अशी आशा आहे. हवामान बदलांशी मुकाबला करतांना आवश्यकतेनुसार लवचिकता आणि प्रसंगी कठोर निर्णय घेत जनतेचे प्राण वाचविण्यासाठी ठोस निर्णयांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याबाबत योजनेवर काम करतांना राजकिय दबाव, घराणेशाही, भारतीयांची वर्णी लावणे आणि 'अर्थपूर्ण' लाभाच्या पलीकडे पहात जनहित व देश हितासाठी हवामान कृती सेल बनणे आवश्यक आहे. 

नवीन इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करीत हवामान बदलांचा मुकाबला करीत 'नेट झिरो कार्बन उत्सर्जन' हे ध्येय पुर्ण केले जाईल. शेतीला प्राधान्य देत तसेच लायक लोकांना संधी व स्वातंत्र्य  देत लोकांचे जीव वाचविण्याचे धोरण प्रत्यक्ष‌ उतरणे आवश्यक आहे. 'नेट झिरो २०५०' प्रकल्पाने कार्बन प्रदूषण शून्य होते आवश्यक आहे यात शंका नाही. ते नक्की शक्य होईल हा विश्वास नाशिककरांना यायला हवा. म्हणून धोरणांची नवी  शेती करीत 'लक्षणीय हवामान' बदल व चैतन्यमयी धोरणांच्या शेतीची अपरिहार्य गरज देखील आहे.

प्रा. किरणकुमार जोहरेआंतरराष्ट्रीय हवामान संशोधक, नाशिकसंपर्क : 9168981939, 9970368009, ईमेल: kirankumarjohare2022@gmail.com

टॅग्स :हवामानतापमानशेतकरीभाज्या