नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात मागील महिन्यात २५ जानेवारी २०२४ ला ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आता पुन्हा २५ फेब्रुवारी २०२४ रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. निफाड संक्षिप्त पहाडी महत्व निफाड या शब्दाचा अर्थ एक ही ‘पहाड’ नसलेला भूभाग होय. निफाडचा वार्षिक सरासरी पाऊस ४८१ मिलीमिटर असला, तरी गेल्या तीन वर्षांपासून निफाड येथील पावसात लक्षणीयरित्या वाढ झालेली आहे. निफाड तालुक्यात लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. याशिवाय निफाड तालुक्यातील विशेषतः द्राक्षासाठी पिंपळगांव, विंचुर, निफाड आदी बाजारपेठा जगभर प्रसिद्ध आहेत. द्राक्ष, ऊस, टोमॅटो, भाजीपाला आदी कृषी उत्पादनात निफाड तालुका अग्रेसर आहे. याशिवाय निफाड तालुक्यात गहू, बाजरी, हरबरा, भात, सोयाबीन, कांदा, मेथी,शेपू, कोबी,मका ही प्रमुख शेती उत्पादने होतात त्यामुळे निफाड तालुका नाशिक जिल्हा व एकंदर राष्ट्रीय अर्थव्यवस्थता मजबूत करण्यासाठी महत्वाचा आहे.
निफाड येथे नाशिक मधील नीचांकी तापमानाची नोंद नेहमी असे का होते? याच्या कारणांचा वैज्ञानिक अभ्यास करण्याची संधी मला मिळाली. गेल्या १६ वर्षांचा अभ्यास पाहता वारंवार निफाड तालुक्याचे तापमान नाशिक जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यापैकी सातत्याने नीचांकी आढळते. ९ फेब्रुवारी २०१२ रोजी निफाड येथील तापमान २.७ अंश सेल्सिअस असे सर्वात कमी नोंदवले गेले होते व दुसर्या क्रमांकावर कमी तापमान हे ९ फेब्रुवारी २००८ रोजी ३.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. जवळपास १० वर्षानंतर पुन्हा २४ जानेवारी २०२२ रोजी निफाडच्या कुंदेवाडी येथे तिसऱ्या क्रमांकाचे ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यावेळी निफाड येथील नळाच्या पाईप मधील पाणी गोठून बर्फ बनले होते, असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ९ जानेवारी २०२३ रोजी राज्यातील नीचांकी ५ अंश सेल्सिअस किमान तापमान कुंदेवाडी (ता. निफाड) येथील गहू संशोधन केंद्रात नोंदविले गेले होते.
उत्तरेकडून येणाऱ्या शीतल वाऱ्यांचा एकत्रित प्रभाव पाहता येत्या काळात 'तापमान भोवरे' म्हणजे 'टेंपरेचर इडीज' करताहेत निफाडचे टेंपरेचर डाऊन! म्हणजे तापमान अजून घटू शकेल व नाशिकसह निफाडमध्ये तापमान घटत पुन्हा निफाडमध्ये पानांवर बर्फाचे कण दिसू शकतात त्यामुळे घाबरून न जाता काळजी घेणे आवश्यक आहे. गहू, हरभरा पिकांची वाढ जोमाने होण्यासाठी थंडीची मदत होणार आहे.
यावरील शास्त्रीय संशोधनातून पुढील वैज्ञानिक निष्कर्ष निफाड बाबत मिळालेत.१. निफाड हा समुद्र सपाटीपासून ५६९ मीटर उंचीवरील सखल भूभाग असून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे उंच डोंगर किंवा पर्वत नाहीत.२. निफाड मधील समतल भागावर हवेची घनता हि जास्त आढळून येते, याठिकाणी हवेचा थर साठून राहतो.३. जास्त घनतेची हवा हि जास्त दाबाचा भाग बनविते.४. जास्त दाबाचा भाग म्हणजेच कमी तापमान असे सूत्र आहे परिणामी निफाडचे तापमान नाशिक मध्ये नेहमीच कमी आढळते.५. या व्यतिरिक्त निफाड मध्ये हिरवीगार झाडे आणि बागायती शेतीची पिके (द्राक्ष, ऊस, कांदा, गहू, डाळिंब) यांची रेलचेल आहे जी निफाड मध्ये जास्त दाबाचा हवेचा थर टिकून ठेवते.थंड हवेमुळे आणि काळ्या कसदार जमिनीमुळे निफाड मध्ये दीपावलीनंतर लागवड होणारा रब्बी हंगामातील गहू देखील चांगल्या प्रकारे पिकतो.६. निफाड मध्ये वाऱ्यांची गती देखील कमी आढळते जी तापमान कमी ठेवण्यास पूरक आणि महत्वाचा भाग ठरते.७. निफाडला गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. त्यामुळे मोठा जलसाठा जमिनीत होतो. निफाडमध्ये पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे जी जमिनीचे तापमान कमी ठेवण्यास उपयोगी ठरतो आणि परिणामी हवेचे तापमान देखील घटते.८. निफाड मध्ये आकाश निरभ्र असते त्यामुळे दिवस जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता लवकर हवेत फेकली जाते आणि जमिनीलगतचा तापमान वेगाने घटते आणि थंडी वाढते.९. याशिवाय तापमान कमी होण्यासाठी निफाड मध्ये तापमान भोवरे म्हणजे 'टेंपरेचर इडीज' निर्माण होतात ज्यावर अधिक संशोधन गरजेचे आहे.
किकुलॉजी भाग २१: थंडीत पिकांना बसतोय कोल्ड शॉक, काय होऊ शकतात परिणाम
उपाय काय? उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा (वेस्टर्न डिस्टर्बन्स) थंडीचा 'रेड अलर्ट' महाराष्ट्रातील नागरीकांनी गांभीर्याने घेत 'हेल्थ अलर्ट'वर तातडीने कृती आवश्यक आहे. विशेषत: सर्दी-खोकला-ताप, सांधेवात, रक्तदाब, वयस्क नागरिक, गरोदर महिला, लहान मुलांनी तसेच मधुमेह, अस्तमा, हृदयविकार आदी रुग्ण नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी गरजेची आहे.
शेतीवरील तसेच सजीवांच्या शरीरातील इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा कोलमडून टाकत विपरीत परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना करणे शक्य आहेत. 'कोल्ड स्ट्रोक' मध्ये अचानक तापमानातील होणारा फरक हा सजीव शरीराची यंत्रणा झेलू न शकल्याने जीवघेणा परिणाम घडतो. तापमान नियंत्रणासाठी गरम पाणी पिणे, उबदार कपडे वापरणे, वेळेवर आहारविहार व औषधपाणी गरजेचे आहे. अचानक तापमान बदलाचा परिणाम टाळण्यासाठी मनुष्य, पाळीव जनावरे, पशूपक्षी तसेच वनस्पती व पिकांची काळजी घेणारी कृती करणे आवश्यक आहे.
थंडीच्या लाटेमुळे द्राक्षपंढरी गोठली असून उत्पादक धास्तावले आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता थंडीचा कडाका जास्त वाढल्यास कोल्ड स्ट्रोक पासून पिकांचे रक्षण करण्यासाठी पारंपरिक उपाय स्वानुभवाने करणे शक्य आहे.
केळीच्या पिकांना गोणपाट किंवा बारदान गुंडाळणे, तर शेतात पाणी भरत द्राक्ष पिकांची काळजी असे साधे उपाय आपल्या अनुभवानुसार करता येऊ शकते. पहाटे पडणाऱ्या दवबिंदूंमुळे द्राक्षबागांना धोका वाढतो. धुके व थंडीत होणारी वाढ आणि द्राक्षमणी फुटण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी सुयोग्य काळजी घेत द्राक्षबागेत शेकोट्या पेटवितात किंवा हॅलोजन बल्ब लावत, तर काही शेतकरी द्राक्षांना कागद किंवा कापड गुंडाळण्याचा उपाय करतात जो लाभ दायक ठरतो असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
प्रा. किरणकुमार जोहरेआंतरराष्ट्रीय हवामान संशोधक,क. का. वाघ कॉलेज, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग, नाशिक ४२२२९संपर्क : 9168981939, 9970368009, ईमेल: kirankumarjohare2022@gmail.com