कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून धुवाधार पाऊस कोसळत असल्याने पुराचे पाणी वाढू लागले आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदी ३८.४ फुटांवरून वाहत आहे. पहाटेपर्यंत ३९ फूट ही इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे.
पावसाचा वाढणारा और आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. तब्बल ८५ बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर सायंकाळी तीन ठिकाणी पाणी आल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
रविवार सकाळपासून जिल्ह्यात संततधार सुरू आहे. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस आहे.
कोल्हापूर शहरात तर रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. एकसारखा पाऊस आणि हवेत कमालीचा गारठा जाणवत होता. राज्य, प्रमुख जिल्हा व ग्रामीण असे ३३ मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
म्हणूनच पुराच्या पाण्याला संथ गती
राधानगरी', 'दूधगंगा, वारणा ही धरणे भरलेली नाहीत. राधानगरी' व 'वारणा'तून वीजनिर्मितीसाठीच विसर्ग सुरू आहे. त्यात अलमट्टीतून विसर्ग प्रतिसेकंद दीड लाख घनफूट सुरू असल्याने पुराचे पाणी संथगतीने वाढत आहे. त्यामुळेच रविवारी दिवसभरात 'पंचगंगे'ची पातळी अवघ्या दोन इंचांनी वाढली आहे.
'राधानगरी ८०, तर 'वारणा' ७२ टक्क्यांवर
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने जलाशयात झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत जांबरे, घटप्रभा, 'जंगमहट्टी. आंबेओहोळ ही चार धरणे भरली आहेत, कडवी ९५ टक्क्यांवर असून, ते कोणत्याही क्षणी भरू शकते. राधानगरी धरण ८० टक्के, तर वारणा ७२ टक्के भरले आहे. आणखी दोन दिवस असाच पाऊस सुरू राहिला; तर दोन्ही धरणे भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला महापुराला सामोरे जावे लागणार आहे.
सांगलीत कृष्णा नदीची पातळी १८ फुटांवर
सांगली जिल्ह्यात तसेच धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम असून कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सांगलीतील नदीपातळी १८ फुटांवर गेली होती. अलमट्टी धरणातील विसर्गही आता दीड लाखाने सुरू करण्यात आला आहे.