Join us

Rain : राज्यात धरण पाणीसाठ्यात कोकण आघाडीवर, मराठवाडा पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 12:27 PM

राज्यातील संपूर्ण धरणांमध्ये एकूण ६७.२८ टक्के पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा २७ हजार २४०.१३ दशलक्षघनफूट इतका आहे.

राज्यात एक जून ते आज १६ सप्टेंबरपर्यंत राज्यातील धरणांमधील सर्वात जास्त पाणीसाठा हा कोकण विभागात आहे, तर सर्वात कमी पाणीसाठा हा औरंगाबाद विभागात आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाकडून प्राप्त माहितीनुसार राज्यातील संपूर्ण धरणांमध्ये एकूण ६७.२८ टक्के पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा २७ हजार २४०.१३ दशलक्षघनफूट इतका आहे. मागच्या वर्षी याच दिवशी राज्यातील एकूण पाणीसाठा हा ८७.५९ टक्के इतका होता.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाला उशिरा सुरूवात झाली, अनेक ठिकाणी ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडला. त्याचा परिणाम धरणांच्या साठ्यावरही झाला आहे. अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाला. मात्र मुंबई व कोकण विभागात तुलनेने चांगला पाऊस झाल्याने तेथील धरणांचा साठाही मागच्या वर्षीच्या तुलनेत सुधारलेला आहे. कोकण विभागात ९२.७८ टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी याच काळात हा साठा ९०.४५% इतका होता. 

कोकण विभागाखालोखाल नागपूर विभागात धरणांचा पाणीसाठा असून आजच्या तारखेपर्यंत हा साठा ७७.६०% इतका आहे. मागच्या वर्षी नागपूर विभागात याच दिवशी ८३.७४ % इतका पाणीसाठा होता. अमरावती विभागात ७४.९९% पाणीसाठा असून मागच्या वर्षी ९०.७६% इतका होता.

पुणे विभागात ७२.१३% पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी ९१.३३ % पाणीसाठा होता. नाशिक विभागात आजपर्यंत ६८.४८% इतका पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी याच काळात नाशिक विभागातील धरणांमध्ये ८३.९१ टक्के इतका साठा होता.

सर्वात कमी पाणीसाठा औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये आहे. आजच्या दिवसापर्यंत या विभागात ३२.६०% पाणीसाठा आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५० टक्क्यांनी हा पाणीसाठा कमी आहे. मागच्या वर्षी औरंगाबाद विभागात ८२.१३% इतका पाणीसाठा होता.

दरम्यान राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण पाणीसाठा ७३.५९%, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ६३.०१ % तर लघुप्रकल्पातील ४०.२१ इतका आहे. 

टॅग्स :धरणपाटबंधारे प्रकल्पपाणीखरीपलागवड, मशागत