Join us

Konkan Weather Update: पाऊस, वाऱ्यामुळे कोकणातील या जिल्ह्यात लाल बावटा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 11:02 AM

कोकणात तब्बल दोन महिने होत आले आहेत. १ जूनपासून सुरू झालेल्या पावसाचे सातत्य जिल्ह्यात अजूनही कायम आहे. १ जुलैपासून तर पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे.

रत्नागिरी : पावसाचा जोर पुन्हा वाढू लागला असून पावसाबरोबरच वाऱ्याचाही मारा जोरदार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात घरे, गोठे यांच्या पडझडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे.

बुधवारी पावसाचा जोर कमी असला तरीही खेडमधील जगबुडी नदीच्या पात्राने अजूनही धोका पातळी ओलांडलेली असल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. रात्रभर विश्रांती घेतलेल्या पावसाने वाऱ्यासह गुरुवारी दुपारपासून जोर वाढविला आहे.

हवामान खात्याने शुक्रवार, दि. २५ जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तब्बल दोन महिने होत आले आहेत. १ जूनपासून सुरू झालेल्या पावसाचे सातत्य जिल्ह्यात अजूनही कायम आहे. १ जुलैपासून तर पावसाने जिल्ह्यात संततधार धरली आहे.

मुसळधार पावसामुळे शेतीची कामे वेळेत झाली असली तरी आता काही भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीत पाणी भरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अजूनही पावसाचा जोर तसा वाढलेला आहे. बुधवारी दिवसभर हलक्या सरी वगळता पावसाने विश्रांती घेतली होती.

रात्रीही पाऊस थांबला होता. मात्र, गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. जोडीला जोरदार वारे असल्याने सरींचा जोर असला तरी हलक्या प्रमाणात येत होत्या. दिवसभर पावसाळी वातावरण कायम होते.

पाऊस आणि जोडीला वारा यामुळे जिल्ह्यात अनेक भागांत घरे, गोठे, दुकाने, शाळा यांची अपरिमित हानी होत आहे. अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडत आहेत. यंदा पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. दोन महिन्यांच्या आतच ६८ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

सरासरीत मोठी भर येथील जिल्हा नियंत्रण कक्षात गुरुवारी प्राप्त झालेल्या जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ७६.९१ टक्के सरासरी पाऊस पडला आहे. बुधवारी दापोली तालुक्यात ११९ मिलिमीटर आणि खेड तालुक्यात सर्वाधिक १२१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. आतापर्यंत २३०० मिलिमीटर (६८.३७ टक्के) पाऊस पडला आहे. अजूनही पावसाचा जोर कायम आहेच.

तिलारी धरण झाले फुल्लतिलारी धरणक्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असल्याने नागरिकांनी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सतर्कतेचा उपाय म्हणून नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. जाधव यांनी केले आहे.

प्रसिद्धीपत्रकच म्हटले आहे की, गेल्या काही तासांत धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा व तिलारी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी मुख्य धरणाच्या पाण्याचा खळग्यातील धरणातून तर उन्नेयी बंधाऱ्याच्या थेट नदीपात्रात १५ जुलैपासून विसर्ग सुरू आहे.

त्यात आज गुरुवारपासून वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला नदी इशारा पातळीच्या ०.९५ मीटर खाली असून येत्या एक-दोन दिवसांत जर अशीच अतिवृष्टी होत राहिली तर हा विसर्ग आणखीन वाढविला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये. तसेच शेतकऱ्यांनी आपली गुरे नदीपात्राशेजारी नेऊ नयेत, असे आवाहन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :हवामानरत्नागिरीपाऊसकोकणपाणीधरण