सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १४८ मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे १३९ आणि महाबळेश्वरला ७४ मिलीमीटरची नोंद झाली आहे.
या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. सध्या साडेपाच हजार क्युसेक वेगाने पाणी येत आहे. जिल्ह्यात यावर्षी मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाला. मागील १५ दिवसांपासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
त्यातच सध्याही पूर्व भागात अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. यामुळे खरीप हंगाम पेरणीवर परिणाम झालाय. वापसा नसल्याने पेरणीला उशिरा सुरुवात होऊ शकते. तसेच ओढ्यांना पाणी वाहत असून बंधारेही भरले आहेत. तर विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
गतवर्षी पाऊस अन् पाणीसाठाही कमी- जिल्ह्यात पावसाला उशिरा सुरुवात झाली होती. २१ जूनपर्यंत कोयनेला फक्त ७७ मिलीमीटर पाऊस झाला होता तर नवजा येथे ८३ आणि महाबळेश्वरला १०० मिलीमीटर पाऊस पडलेला.- कोयना धरणात १०.८९ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यंदा पाऊसही अधिक झाला आहे. तसेच कोयना धरणामध्ये पाणीसाठाही जादा आहे.
अधिक वाचा: Kharif Sowing राज्यात १६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; पेरण्या किती झाल्या