मुंबई : कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर करण्याबाबत, कोयना धरण परिसर सुशोभिकरण, जलाशय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे.
याबाबतचा सर्वसमावेशक प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महाकंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.
कोयना प्रकल्प विभागाच्या स्थानिक प्रश्नांबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अ.ह.धुमाळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे. कोयना धरण हे महत्त्वाचे धरण असल्याने या धारणाच्या जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नाव दिल्यास राज्यातील प्रत्येक नागरिकास याचा अभिमान वाटेल, त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा.
तसेच हुंबरळी पाझर तलावासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. या पाझर तलावासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतोसाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा.
कोयना धरण पायथा (डावा तीर) विद्युत गृहाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. कोयना परिसरातील नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या थकीत भाड्याबाबत संबंधित संस्थेने कार्यकारी मंडळाची बैठक घ्यावी. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.
कोयनानगर ता.पाटण येथील व्यापाऱ्यांच्या समस्येबाबतही सकारात्मक विचार केला जाईल. तसेच पूर नियंत्रणाबाबतही जलसंपदा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.
या बैठकीत उरमोडी धरण प्रकल्पासंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यात आली. ज्या पुनर्वसित वसाहतींचे गावठाण अद्यापि तयार नाही त्यांना उदरनिर्वाह भत्ता सुरु ठेवण्यात यावा. तसेच गावठाण तयार करणेबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा अशा सूचना जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
अधिक वाचा: राधानगरी तालुक्यातील या तीन जावांची चर्चा भारी; उसाच्या पट्ट्यात केली झेंडूची शेती