सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असून, २४ तासांत नवजाला ६५, तर कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ३६ मिलिमीटरची नोंद झाली. तसेच कोयना धरणातही पाण्याची आवक कमी झाल्याने विसर्गात घट झाली आहे.
धरणाचे दरवाजे एक फुटापर्यंत खाली घेतले असून, त्यातून ९ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणात १०३.८४ टीएमसी पाणीसाठा होता. जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहिले.
यामुळे पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोयनेसह धोम, बलकवडी कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख धरणात ८० टक्क्यांवर पाणीसाठा झाला होता. तर ऑगस्ट महिन्यातही पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी होते.
त्या तुलनेत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वच धरणे काठोकाठ भरली आहेत. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजाला सर्वाधिक ६५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.
तर पावसाळ्यात आतापर्यंत नवजाला ६ हजार २६०, महाबळेश्वरला ५ हजार ९७० आणि कोयनानगर येथे ५ हजार २०९ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. त्यातच पश्चिमेकडील धरण क्षेत्रातही पावसाची हजेरी आहे. यामुळे धरणांत पाण्याची आवक होत आहे.
२९ हजार क्युसेक पाण्याची आवककोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा मंदावलाय. धरणातील विसर्ग कमी केला. शनिवारी सकाळी धरणात २९ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर दरवाजे साडे तीन फुटांवरून एक फुटापर्यंत खाली घेण्यात आले. दरवाजातून ९ हजार २१४ आणि पायथा वीज गृह २ हजार १००, असा एकूण ११ हजार ३१४ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत होता.