Join us

Koyna Dam पावसाचा जोर ओसरला, कोयनेत आलं किती पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 9:44 AM

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे ५१ मिलीमीटर झाले. तर एक जूनपासून ७२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना येथे दिवसांत १६ तर आतापर्यंत ५४२ मिलीमीटर पाऊस पडला.

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस थांबला असून पश्चिमेकडे ही जोर कमी झाला आहे. २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ५१ मिलीमीटरची नोंद झाली. त्यातच धरण क्षेत्रातही कमी पाऊस आहे. त्यामुळे कोयनेत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. तर साताऱ्यात ऊन पडले होते. दुपारनंतर पाऊस सुरू झाला. त्यामुळे सातारकरांची पळापळ झाली.

जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीस पूर्व तसेच पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत तर जूनमध्येच बेगमी झाली. यामुळे खरीप हंगाम पेरणीची चिंता मिटली.

सध्याही अनेक गावांत पेरणीसाठी जमिनीला वापसा नाही. त्यामुळे पेरणी पुढे गेली आहे. तसेच ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे. बंधारे ही भरल्याने जमिनीतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना अडचण येणार नाही. तर पश्चिम भागात पावसाची उघडझाप आहे.

पश्चिमेकडील कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, कास, तापोळा, बामणोली परिसरात पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यातच धरणक्षेत्रा ही पावसाची उघडझाप आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान नवजा येथे ५१ मिलीमीटर झाले. तर एक जूनपासून ७२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना येथे दिवसांत १६ तर आतापर्यंत ५४२ मिलीमीटर पाऊस पडला.

महाबळेश्वरला २४ तासांत १३ तर जूनमध्ये आतापर्यंत ४५३ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. कोयना धरणक्षेत्रात ही अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ६९० क्यूसेक पर्यंत खाली आली आहे. तर धरणात १६.५४ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

अधिक वाचा: Pik Karj शेतकऱ्यांना मिळणार आता 'सिबील' शिवाय पीककर्ज

टॅग्स :कोयना धरणधरणपाणीपाऊससातारा