सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी १२ दिवसांनंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातूनच २ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे, तर २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद नवजाला ९४ मिलिमीटर झाली आहे.
जुलैच्या मध्यावर सलग १० दिवस पश्चिम भागात पावसाने धुमाकूळ घातला. ऑगस्ट सुरू होईपर्यंत हा पाऊस कमीजास्त प्रमाणात सुरूच होता. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागला.
मात्र, मागील आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे प्रमुख धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. आता धरणे भरून घेण्यासाठी अनेक धरणांतील विसर्ग थांबविण्यात आला आहे, तर काही धरणांतून आवक पाहून अल्प प्रमाणात पाणी सोडले.
सांगलीत पावसाचा जोर ओसरलासांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे कृष्णा, वारणा या नद्यांचा पूर कमी होऊन मंगळवारी पुन्हा पात्रात पाणी गेले आहे. कृष्णा, वारणा या नद्यांवरील पूल, बंधारे खुले झाल्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
कोयना धरणाचा सर्व विसर्ग बंद करुन केवळ दोन हजार १०० क्युसेक विसर्ग सुरु आहे. यामुळे सांगली आर्यविन पूल येथे कृष्णा नदीची पाणीपातळी ३४.९ फूट झाली होती. कोयना, वारणा धरण क्षेत्रासह जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे.