परतीच्या पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले आहे. गेले सात-आठ दिवस परतीचा पाऊस पाठ सोडेना आणि शेतकऱ्यांना झोप लागेना, अशीच परिस्थिती जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.
काढणीला आलेले खरीप पीक पावसाने अक्षरशः उद्ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात कमीदाबाचा पट्टा तयार झाल्याने शुक्रवारी मान्सूनसारखे वातावरण राहिले आहे.
पाऊस थांबायला तयार नसल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. खरीप हंगामातील पिकांची काढणी करता येत नाही. तसेच, रब्बी हंगामाची पेरणी करता येत नसल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. सांगली जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये १८.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. शुक्रवारीही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.
कोयनेतून सध्या १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
जिल्ह्यात मान्सुनोत्तर पाऊस सुरूच असून, कोयना पाणलोट क्षेत्रातही हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने साठा १०५ टीएमसीवर पोहोचला. परिणामी, शुक्रवारी पहाटेच धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने उचलून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे कोयनेतून सध्या १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.