सांगली : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पाच प्रमुख मध्यम आणि ७८ लघु प्रकल्पांत पाणीसाठा वाढला आहे. कोयना, वारणा धरण जवळपास ८८ टक्के भरले असून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ५१ टक्के पाणीसाठा झाला आहे.
चांगल्या पावसामुळे शेती सिंचनासह शहरी भागांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. जिल्ह्यात जून महिन्यात अडखळत हजेरी देणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार बॅटिंग केली होती.
तब्बल २१ दिवस पावसाने जिल्ह्यात हजेरी दिली होती. चालू ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे शेतीशिवारात कामांना गती आली आहे.
जिल्ह्यातील मध्यम आणि लघू असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. यापैकी २२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. शिराळा तालुक्यातील वारणा, तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे.
गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के जादा पाणीसाठा
जिल्ह्यात गतवर्षी दि. १६ ऑगस्टला २१ टक्के पाणीसाठा होता. यामुळे खरीप हंगाम वाया गेला होता. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली होती; पण यावर्षी दि. १६ ऑगस्टला ५१ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा ३० टक्के जास्त आहे.
२२ तलाव १०० टक्के, १५ तलाव ७५ टक्के
जिल्ह्यातील ८३ मध्यम आणि लघु प्रकल्पापैकी २२ तलावांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच १५ तलावांमध्ये ७५ टक्के तर १२ तलावांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. सहा तलावांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा जास्त तर आठ तलावांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे.
कोयना ८६ तर वारणा धरण ८८ टक्के भरले
जिल्ह्यातील नागरिक आणि शेतीसाठी उपयोगी असणारे कोयना धरण ८६ टक्के आणि वारणा धरण ८८ टक्के भरले आहे. तसेच जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या तलावांमध्येही सरासरी ५१ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असल्यामुळे खरीप पिकांचा प्रश्न सुटला आहे.