सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर असून, २४ तासांत नवजा येथे १५२, कोयनेला १४६ आणि महाबळेश्वरमध्ये १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असून, सोमवारी सकाळच्या सुमारास पाणीसाठा ९६ टीएमसीजवळ पोहोचला.
तसेच धरण ९१ टक्के भरले. परिणामी, धरणाने गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली आहे. तर धरणात २४ तासांत सुमारे साडेतीन टीएमसी साठा वाढला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील आकडेवारीनुसार जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे शेतशिवारात, भात खाचरात पाणी साचून राहिले आहे. तर २४ तासांत नवजा येथे १५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत नवजा येथे तब्बल ५ हजार ४९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
तसेच कोयनेला ४ हजार ६३४ आणि महाबळेश्वर येथे ५ हजार २६५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर कोयना धरणात २४ तासांत ३.४१ टीएमसी पाणीसाठा वाढला.
सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ९५.७९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ९१.०१ टक्केवारी साठ्याची आहे. आता धरण भरण्यासाठी ९ टीएमसीहून अधिक पाण्याची गरज आहे. तर धरणातील विसर्ग बंदच आहे.
गतवर्षी ९४ टीएमसी जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले होते. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांच्या आसपासच पाऊस होता, यामुळे अनेक प्रमुख धरणे भरली नव्हती. यामध्ये कोयना धरणाचाही समावेश आहे. कोयनेत गतवर्षी ९४ टीएमसीवर साठा झाला होता.