सातारा जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान अधिक राहिले आहे. कोयनानगर येथे ७२०, नवजाला ५३४ आणि महाबळेश्वरला ११८ मिलिमीटर पाऊस जादा झाला आहे.
तर कोयना धरणातही गतवर्षीच्या तुलनेत ११ 'टीएमसी'ने साठा अधिक आहे. सध्या धरणात ३४.६० टीएमसी साठा झाला आहे, तर शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला ११९ मिलिमीटर झाला होता.
जिल्ह्यात गेल्यावर्षी मान्सूनचा पाऊस उशिरा सुरू झाला होता; तसेच त्यानंतरही पावसाची उघडझाप होती. त्यामुळे जुलै महिन्यातच पावसाचा जोर वाढलेला; पण गतवर्षी एकूणच पाऊस कमी झालेला. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्जन्यमानाने १०० टक्क्यांची सरासरीही गाठली नव्हती.
सर्वच तालुक्यांत कमी पाऊस झालेला. यामुळे बहुतांशी प्रमुख धरणे भरली नव्हती. कोयना धरणातही ९५ 'टीएमसी' पर्यंतच साठा झालेला. परिणामी गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झालेली; मात्र यंदा आतापर्यंत तरी पाऊस चांगला झालेला आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे गेल्यावर्षी १३ जुलैपर्यंत कोयनेला ९२८ मिलिमीटर पर्जन्यमान झाले होते. यंदा १ हजार ६४८ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.
तसेच नवजा येथे मागील वर्षी १ हजार ३२९ मिलिमीटर पाऊस झालेला, तर आतापर्यंत नवजा येथे १ हजार ८३३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. तसेच महाबळेश्वरलाही अधिक पाऊस झाला आहे. एक जूनपासून आतापर्यंत येथे १ हजार ५१५ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात ६६ मिलिमीटर पाऊस• जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कमी-अधिक फरकाने पाऊस पडत आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.• सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तालुक्यात ६६.८ मिलिमीटर पडला, तर सातारा तालुक्यात ४.७, जावळी १३.९, पाटण ६.९, कऱ्हाड तालुक्यात ३.२, कोरेगाव ३.२, खटावला १.४, माणमध्ये ०.४, फलटण तालुक्यात १.७, खंडाळा ५.२ आणि वाई तालुक्यात सरासरी १४.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.