श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून मंगळवारी सकाळी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन सुरुवातीला ५०० क्युसेकने सोडले असून, दोन दिवसात टप्प्याटप्प्याने १ हजार ४०० क्युसेकने करण्यात येणार आहे.
मागील आठवड्यात पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पिंपळगाव जोगे व येडगाव धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाकडे लक्ष वेधले होते.
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलसंपदा विभागाने परवानगी घेतली आणि कुकडीचे आवर्तन १० डिसेंबरपासून सोडण्याची कार्यवाही केली.
यासंदर्भात कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या पुणे येथील दालनात कार्यकारी अभियंता यांची बैठक होऊन हे आवर्तन टेल टु हेड पध्दतीने करण्याचा निर्णय झाला.
१४ जानेवारीपर्यंत आवर्तन
• कुकडीचे चालू आवर्तन ३५ दिवसांचे असून, १४ जानेवारीअखेर कालव्याला पाणी चालू राहणार आहे.
• हे पाणी उभ्या पिकांना मागणीनुसार देण्यात येणार आहे. ओढे-नाल्यात पाणी सोडण्यात येणार नाही.
घोडला गळती
घोड धरणाच्या उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या गळतीमुळे धरणातील पाणी पातळी दररोज कमी होत आहे. ही गळती थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
माझा कालवा माझी जबाबदारी
कुकडी प्रकल्पाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांच्या नेतृत्त्वाखाली येडगाव धरणाच्या २४९ कि. मी. लांबीच्या कालव्यातील गाळ, माती, दगड, झुडपे काढण्यासाठी माझा कालवा माझी जबाबदारी या अभिनयातून कालव्यातील पाणी वहन अडथळे दूर करण्यात आले आहेत.
अधिक वाचा: कांदा पिकातील करपा व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी घ्या ह्या कमी खर्चातील फवारण्या